भारत व इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका तीन सामन्यानंतर एक एक अशी बरोबरीत आली असून उर्वरीत दोन सामन्यात दोन्ही संघात तुंबळ द्वंद्व होण्याचे सर्व लक्षणं दिसून येत आहेत. आता पर्यत या तीनही सामन्यात दोन्ही संघाचे गोलंदाज वरचढ ठरले असून आपल्या बळावर त्यांनी आपापल्या संघांना एक एक सामना जिंकून दिला आहे. दोन्ही संघानी या मालिकेत एकएक सामना गमावला तो फलंदाजांच्या अपयशामुळेच !
कागदोपत्री भारताची फलंदाजी अतिशय मजबूत दिसते. रोहीत शर्मा, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, दि ग्रेट किंग कोहली, अजिंक्य राहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा या फलंदाजाची नुसते नावं जरी ऐकले तरी जगातल्या मातब्बर गोलंदाजांच्या काळजात धडकी भरायची. परंतु या मालिकेतील पाच डावातील यांची कामगिरी बघीतली तर शाळकरी पोऱ्ह यांच्या पेक्षा भारी ठरतील असे कोणीही म्हणून जाईल. अगदी तशीच गत या भारतीय महारथींची या मालिकेत झाली आहे.
के एल राहुल २५२, रोहित शर्मा २३०, चेतेश्वर पुजारा १६२, रविंद्र जडेजा १३३, विराट कोहली १२४, अजिंक्य राहाणे ९५, रिषभ पंत ८७ यांच्या धावा पाहिल्यानंतर त्यांचा संघ कुठेही जिंकू शकणार नाही हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकेल. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटला या मालिकेत आंब्याच्या झाडाला मोहर यावा तसा धावांचा बहर आला आहे. त्याच्या एकटयाच्या पाच डावात ५०७ धावा असून त्यात तीन सलग कसोटी शतकांचा समावेश असून भारताच्या फलंदाजीचे आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोहली, पुजारा व राहाणे या तिघांच्या मिळून केलेल्या धावांच्या बेरजेपेक्षा ( ३८१ धावा ) रुटच्या ( ५०७ ) धावा अधिक आहे, आणि आश्चर्याची बाब म्हणजे इंग्लंडच्याही केवळ जॉनी बेयरस्टो १४७, व रॉरी बर्न्स १२८ या दोघांनाच पाच डावात मिळून शंभरी पार करता आली आहे. यावरून ज्यो रुटच्या गोल्डन मिडासची कल्पना लगेच येते. विशेष म्हणजे कोहली, पुजारा व राहाणेने तिन कसोटयात मिळून १६ डाव खेळले तर रूटने केवळ पाच डाव खेळले आहे.
सन २०२१ च्या पूर्वार्धात इंग्लंडने भारत दौरा केला होता. त्या दौऱ्यातही रूटने एक द्विशतक ठोकले होते. ही पाच सामन्यांची मालिका पूर्ण होईपर्यंत रूट एका कॅलेंडर वर्षात भारताविरूध्द हजार धावा पूर्ण करू शकतो. असं जर झालं तर भारताविरूध्द अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला फलंदाज बनू शकतो.
भारत व इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी एक भिती व्यक्त केली जात होती की, भारताची फलंदाजी इंग्लंडच्या ढगाळ वातावरणात स्विंग होणाऱ्या गोलंदाजी पुढे कोलमडेल. ही भिती आतापर्यंत तरी शब्दशः खरी ठरली आहे. इंग्लंडच्या जीमी अँडरसन, ओली रॉबिनसन व क्रेग ओव्हरटन यांच्या माऱ्यासमोर भारताची फलंदाजी प्रत्येक वेळी पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली आहे. आता तर पुढील दोन कसोट्यांसाठी त्यांचे दुखापतीतून बरे झालेले वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स व मार्क वुड परतल्याने इंग्लिश गोलंदाजीची धार आणखी तेज होणार असून भरात नसलेल्या भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताच सर्वात अधिक दिसते.
भारत चौथ्या कसोटीत फलंदाजांच्या फळीत तरी बदल करण्याची शक्यता दिसत नसून आहे त्याच रोहीत, राहुल, पुजारा, राहाणे, कोहली व पंत यांच्यासह उतरण्याची शक्यता असून जखमी रवींद्र जडेजा व फेल गेलेला ईशांत शर्मा यांना संघातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता असून विनाकारण डावलेले गेलेले रवीचंद्रन आश्विन व शार्दूल ठाकूर संघात येण्याची शक्यता असून या दोघांमुळे गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही मजबूत होऊ शकते.
ज्यो रूटच दोन्ही संघांमधील मोठा फरक असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले असले तरी उर्वरीत दोन सामन्यात त्याची बॅट भारतीय गोलंदाजांवर भारी भरण्याचीच शक्यता अधिक दिसते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

