shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय फलंदाजांची आशादायक कामगिरी ; चमत्कार घडवेल ?



                     इंग्लंडविरुद्ध लिडस येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत आपल्या डावात केवळ ७८ धावांत सर्वबाद झाला आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजही इंग्लिश फलंदाजांना काबूत ठेवण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघासमोर अडचणी उभ्या राहील्या. इंग्लंडमधील हवामानही मोठे चमत्कारीक आहे. तेथे उन्ह पावसाचा लपंडावीचा खेळ सतत सुरू असतो. या सामन्याचेच बघा ना, भारताने नाणेफेक जिंकून हिरव्यागार खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार कोहलीने कमजोर इंग्लिश फलंदाजांना प्रथम फलंदाजीस पाचारण करायला हवे होते परंतु त्याने त्या ताज्यातवाण्या खेळपट्टीवर स्वतः खेळणे पसंत केले व कसलेल्या इंग्लिश गोलंदाजांनी आपल्या सवयीच्या वातावरणाचा अचूक लाभ उठवत पहिल्याच दिवशी भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले.


                        इंग्लंडच्या सलामीवीरांनी मजबूत पायाभरणी केल्यानंतर मालान व रूटने त्यावर सोनेरी कळस चढविला. कर्णधार रूटच्या बॅटला या वर्षात तर परिसच चिटकला का काय ? असे वाटू लागले. या वर्षातील त्याचे हे सातवे शतक असून भारताविरूध्दचे चौथे तर या मालिकेतील सलग तिसरे शतक त्याने फटाकविले आहे. रूटला बाद करणे भारतीय गोलंदाजांसमोर एक मोठाच प्रश्न बनला आहे.
                       इंग्लंडने भारतावर पहिल्या डावात ३५४ धावांची भली थोरली आघाडी घेवून भारताला प्रचंड दडपणात टाकले. परंतु भारतीयांची महान परंपरा येथेही कायम राहीली. गळ्यावर सुरी आल्याशिवाय आपले सर्वस्व झोकायचे नाही. परंतु उक्तीला जगायला हिच योग्य असल्याचे भारतीय फलंदाजांनी हेरले. केएल राहुल या मालिकेच्या सहापैकी दोनच डावात यशस्वी झाला आहे. तर चार डावात तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावरची टांगती तलवार अजूनही कायम आहे.
                       या मालिकेपूर्वी रोहीत शर्माच्या एक सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये यशस्वी होण्याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या, परंतु रोहीतने  आपल्या तंत्रात अमूलाग्र बदल करत परिस्थितीनुसार खेळण्याची कला अवगत केली आहे. रोहीत या सामन्याच्या दोन्ही डावात चांगला खेळत असताना बाद झाला. दुसऱ्या डावात त्याला शतक खुणावत होते परंतु " अंपायर्स कॉल " या चुकीच्या नियमाचा तो बळी ठरला.
                         चेतेश्वर पुजारा गेले दोन वर्षापासून त्याच्याच पूर्वीच्या लौकीकाप्रमाणे खेळत नसल्याने त्याला संघातून काढण्याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु त्याने या डावात आपला " टिपीकल पुजारा " बाजूला ठेवला व नवीन अवतार धारण करत स्वतःलाही शतका जवळ नेऊन ठेवले आहे. पुजाराने कालचाच खेळ आज पूर्ण दिवस भर केला तर भारत निव्वळ मजबूतच बनणार नाही तर सामन्यात विजयी चमत्कार करू शकेल.
                         कर्णधार कोहलीही पुजाराप्रमाणेच दोन वर्षांपासून शतकाचा भुकेला आहे. आज त्यालाही दोन वर्षांचा शतकी दुष्काळ संपविण्याची नामी संधी आहे. आज जर तो योग आला तर कोहलीला स्वतःच्या कर्णधार पदावर होत असलेल्या टिकांना प्रत्युत्तर देता येईल.
                         भारताच्या सर्वच फलंदाजांनी आज जर खारीचा वाटा उचलला तर भारत धावांचा डोंगर सहज उभा करू शकेल. त्यासाठी आज पुजारा व कोहलीने जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहाणे गरजेचे आहे. त्यानंतर इंग्लंडला बाद करण्यासाठी भारताचा तोफखाना सक्षम असल्याचे आपणा सर्वांना ठाऊकच आहे.
                         असे सर्व योग जर जुळून आले तर सन २००१च्या कोलकाता कसोटीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कोणीही डावलू शकत नाही. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे असे समजून प्रत्येक खेळाडूने जीवाची बाजी लावणे गरजेचे आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close