shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीलंका दौऱ्यात नेमका कोणाचा फायदा झाला ?



                 कोरोना संक्रमण काळातही क्रिकेट जोरात सुरू आहे. येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये टि-२० विश्वचषक स्पर्धा युएईत होणार आहे. वास्तविक ही स्पर्धा भारतात होणार होती परंतु बीसीसीआयने सदर स्पर्धा आयोजन करण्यास असमर्थता दर्शविल्या नंतर ती युएईत घेण्याचं निश्चित झालं. याचं मुळ कारणही आपल्या लक्षात आलं असेलच. हो, कोविड-१९ हेच या विश्वचषक स्पर्धेच्या स्थलांतराचं प्रमुख कारण आहे. भारतात आजही कोरोनाची परिस्थिती ठिक नसून येत्या काही दिवसात ती नियंत्रणात येण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने बीसीसीआयला हा धाडसी निर्णय घ्यावा लागला.
                  
याच टि-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी सर्वच देशांनी कंबर कसले असून मिळेल त्या देशाविरूद्ध खेळण्याचा व प्रयोग करण्याचा एक भाग म्हणून कोरोना परिस्थिती अतिशय बिकट असतानाही क्रिकेट सामन्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर मागील दोन महिन्यांपासून भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. 

या संघातील काही खेळाडूंचे टि-२० संघात स्थान पक्के आहे. त्यांना कसोटी सामन्यांच्या माध्यमातून का होईना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळणार आहे.
तर काही खेळाडू भारतात मॅच प्रॅक्टीस पासून वंचित राहू नये म्हणून बीसीसीआयने श्रीलंकेविरूध्द श्रीलंकेत प्रत्येकी तीन एकदिवसीय व टि-२० सामन्यांची मालिका खेळविण्याचे ठरविले. या दौऱ्यासाठी भारताने २० खेळाडूंचा संघ निवडताना ५ राखीव खेळाडूही संघासोबत श्रीलंकेला पाठविले.

                     
या दौऱ्यात भारताने वनडे मालिका २-१ अशी जिंकली तर याच फरकाने टि-२० मालिका गमावली. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने आघाडी घेतल्यावर तिसऱ्या सामन्यात ५ नवोदितांना पदार्पण करविले. परंतु तो सामना भारत पराभूत झाले.
                     
 टि-२०चा पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली खरी मात्र त्या सामन्यानंतर कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो व त्याच्या संपर्कातील आठ जण तातडीने मुळ संघापासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर कमजोर बनलेल्या भारताने दोन्ही सामन्यांसह मालिकाही गमावली. हे आपणास ज्ञात आहेच.

                     
या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेचा संघ बांगलादेश, इंग्लंड दौऱ्यात चांगलाच मार खाऊन आला होता. तसेच आयसीसी मानांकनात सफेद चेंडूच्या खेळात ते अगदी तळाला होते. शिवाय त्यांचा कोणताही खेळाडू आयसीसी रँकींगमध्ये नव्हता. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड व त्यांच्या खेळाडूंमध्ये करारावरून वाद सुरू होता. एवढेच नाही तर श्रीलंकेला आगामी टि-२० विश्वचषकात पात्रता फेरी खेळण्याची नामुष्कीही ओढवली आहे. त्यामुळे श्रीलंका संघाची स्थिती बिकट होती. 

परंतु त्यांच्या नवोदित खेळाडूंनी वनडेत भारताला जोरदार प्रतिकार केला. तर टि-२० मालिका खिशात घातली. सध्या आयपीएलमध्ये श्रीलंकेचा एकही खेळाडू नाही. मात्र त्यांचा अष्टपैलू खेळाडू व लेगस्पिन गोलंदाज वानेंदू हसरंगाला भारताविरूध्दच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर बेंगलुरू कडून एडम झांपाच्या ऐवजी बोलावणे आले आहे. वास्तविक श्रीलंकेला अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका, चरिथ असलंका, दासुन शनाका, दुष्मंता चामिरा, चामिका करूणारत्ने व वानेंदू हसरंगा सारखे भविष्यातले खेळाडू मिळाले.

                    
 या मालिकेत भारताकडून सुर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, दिपक चहार, राहुल चहार व यजुवेंद्र चहल, ईशान किशन यांनी प्रभावी कामगिरी केली असून आगामी टि-२० विश्वचषकासाठी त्यांनी भारतीय संघात आपली दावेदारी मजबूत केली.
                     
दौऱ्यावरील कर्णधार शिखर धवन, संजू सॅमसन यांनी संधी मातीमोल केली. तर देवदत्त पडिक्कल, नितेश राणा, ऋतूराज गायकवाड, चेतन सकारीया, कृष्णप्पा गौतम, वरूण चक्रवर्ती यांना अजून खूप काही शिकायचे आहे. त्याचबरोबर उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला फिटनेसवर काम करावे लागणार आहे. तसेच कुलदिप यादवला आत्मविश्वास वाढवून कामगिरीत सुधारणा करावी लागेल. 
                      
एकंदर या श्रीलंका दौऱ्यावर  बारकाईने कटाक्ष टाकला तर भारतापेक्षा श्रीलंकेलाच अधिक लाभ झाला असल्याचे दिसते. शिवाय श्रीलंकेची आर्थिक परिस्थितीही काही अंशी सुधारली आहे..
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close