चोरांना पकडताना अंगावर काटा आणणारा थरार.. डिझेल चोरांचा पाठलाग करताना घडलेली घटना.
इंदापूर प्रतिनिधी: बुधवार ( दि.११) रात्री २:५० वाजण्याच्या सुमारास लोणी देवकर एमआयडीसी चौकातून डिझेल चोरी करून भिगवन दिशेने वेगात निघालेले संशयित ट्रकची माहिती पोलिसांना मिळाली असता गस्त घालणाऱ्या पोलीस शिपाई विठ्ठल नलवडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांनी तात्काळ डिझेल चोरांच्या गाडीचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनीही स्वतःच्या गाडीतून पोलिसांबरोबर डिझेल चोरांचा पाठलाग केला.
डिझेल चोरांचा पाठलाग करताना डाळज नजीक हायवे रोडवर चोर व पोलिस यांच्यामध्ये अंगावर काटा आणणारा थरार सुरू झाला. यावेळी चोरांनी पोलिसांच्या अंगावर ट्रकमधील एक जणांनी पाठीमागच्या बाजूला येऊन डिझेल रस्त्यावर सांडले तसेच रिकामे ड्रम व टायर पोलीस गाडीवर फेकून मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार भरधाव गाडी चालू असताना घडत होता तर पुढे ट्रक भिगवन गेट तोडत राशीन रोड ने वेगात निघाला. ट्रक चालकाने राशीन रोडवरील रेल्वे फाटक तोडून ट्रक पुढे घेत अंधारात ट्रक रस्त्यात सोडून चोरांनी पळ काढला . यावेळी डिझेलसह ट्रक ताब्यात इंदापूर पोलिसांनी घेऊन सुमारे १०लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत.
लवकरात लवकर आरोपींना अटक करू - पो नि. धन्यकुमार गोडसे.
सदर घटनेचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर आरोपींना अटक करून पुढील कारवाई करीत असल्याचे इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.

