पर्यावरण जनजागरणाचा दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता सिंह राशीच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष पळस हा आहे. उन्हाळ्यामध्ये सर्व रान सुकलेले असताना पळसाच्या वृक्षाला केशरी रंगाची फुले येतात. ही फुले लांबून ज्वालांसारखी दिसतात म्हणून फ्लेम ऑफ द फॉरेस्ट या नावाने हा वृक्ष ओळखला जातो.
पळसाला पाने तीन अशा प्रकारची म्हण आहे. पळसाची पाने गोलाकार चांगली लांब, रूंद एका फुटव्याला तीन असतात. म्हणजे कफ, पित्त, वाताचे संतुलन करणारा हा वृक्ष आहे. पळसाची पाने जेवणासाठी पत्रावळी म्हणून वापरली जातात.
समुद्रसपाटीपासून नऊशे ते पंधराशे मीटर उंचीपर्यंत व ६०० ते ४५०० मिलिमीटर सरासरी पर्जन्यमानाच्या प्रदेशात हा वृक्ष आढळतो.पळसाची पाने नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गळतात आणि नंतर जानेवारीपासून मे पर्यंत येत असतात. पळसाला केशरी रंगाची फुले येतात व मे महिन्यामध्ये शेंगा येतात..
पळसाचे लाकूड पांढरट रंगाचे हलके असते. हे पाण्यामध्ये बरेच दिवस टिकते.पळसाला छेद दिला असता सालीमधून लाल रंगाचा डिंक निघतो त्याला किनो असे म्हणतात.पळसाच्या फुलांचा, पानांचा, सालीचा, बियांचा आणि गोंदाचा औषधी उपयोग होतो.
विंचू दंशावर पळसाचे बी उगाळून लावतात. चर्मरोगात बिया आणि फुले यांचा काढा पोटात घेतात. फुले रात्री भिजत घालून सकाळी त्याचे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि लघवी साफ होते. सालीचा काढा कफविकारावर उपयुक्त आहे. पळसाच्या सालामध्ये टॅनीन असते. लाखेचे किडे पळसावर पोसले जातात.
पळसाची पाने प्राणवायू शिवाय जळू शकतात.पळसाची फुले खाऊन तहान भागते. पळसाची पाने पत्रावळी, द्रोण तसेच घराचे छप्पर आच्छादन करण्यासाठी, वाळवी नियंत्रणासाठी वापरतात. गाई म्हशीचे दूध वाढवण्यासाठी पळसाच्या पानाचा वापर होतो. अतिसार, हगवण झाली असेल तर पळसाचा डिंक पोटात घ्यावा.
पळस आणि भूमी यांचे अतूट नाते आहे. भूमीची धूप थांबवायचे काम पळस करतो म्हणून पळसाची झाडे बांधावर लागतात. पळसाच्या मुळांपासून पक्का दोर बनवला जातो. आणि खायचा केशरी रंग पळसाच्या फुलांपासून तयार करतात. केतू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी केतूला अत्यंत प्रिय असे पळसाचे फुल वापरावे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

