दोन जुनला भारताचा संघ इंग्लंडला गेला असून मागील जवळ जवळ तीन महिन्यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात भारताने चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील एक वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझिलंड विरूध्द झाला. भारताची परदेशात दौऱ्यावरील पहिला सामना हरायची महान परंपरा कोहलीच्या संघाने विराट मनाने यावेळीही जपली. त्यानंतर इंग्लंडविरूध्द पाच कसोटींची मालिका सुरू झाली. नॉटींगहॅमचा पहिला सामना पावसाला भेट चढला. त्या सामन्यात शेवटच्या दिवशी भारत विजयाच्या समिप होता परंतु वरूण राजाने दिवसभर स्वतःच भर मैदानात खेळ केल्याने सामना निकालाविना संपला.
लॉर्डस कसोटीत पहिल्या डावात भारत पिछाडीवर होता. भारताचा दुसरा डावही संकटात होता. तेंव्हा प्रथम चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणेने संघाला संकटातून बाहेर काढले तर शेवटी जसप्रित बुमराहा व मोहम्मद शमीने एक स्वप्नतीत खेळी करून भारताला विजयी पथ दाखविला. सामन्याच्या शेवटच्या सत्रात भारताच्या गोलंदाजांची चमत्कारीक कामगिरी एक ऐतिहासिक विजय मिळवून गेली. या दोन्हीही कसोटयात भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना चार वेळा सर्व बाद केले. मात्र त्यांचा कर्णधार ज्यो रूट काटयासारखा भारतीय गोलंदाजांच्या रस्त्यात रुतला होता. भारताच्या फलंदाजांनी या दोन्हीही सामन्यात सातत्य दाखविले नाही. मालिकेत भारत आघाडीवर असल्यामुळे फलंदाजांचे अपयश झाकले गेले.
दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे उंच मनोधैर्याने विनाबदल तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ हेडींग्लेच्या मैदानात उतरला खरा. परंतु या सामन्यात इंग्लिश गोलंदाज वेगळ्याच जोशात होते. मागील पराभवाने पोळलेल्या इंग्लिश संघांने भारतीय फलंदाजांवर नांगरच फिरविला. त्यानंतर इंग्रज फलंदाज भारतीय संघावर अक्षरशः बरसले. इंग्लिश कप्तान ज्यो रूटने मालिकेतील तिसरे शतक ठोकून इंग्लंडला शिखरावर पोहचविले. इंग्लंडची भली थोरली आघाडी मागे सारून भारताला मार्गक्रमन करायचे होते. अपेक्षेनुरूप भारताने चौथ्या दिवसअखेर सुस्थितीही मिळविली. परंतु शेवटच्या दिवशी देशवासियांना निराश केले. पाचव्या दिवशी भारताचे आठ खेळाडू मात्र ६३ धावांत बाद झाल्याने भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
मालिका १-१ बरोबरीत आल्यानंतर राहीलेल्या दोन सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून इंग्लंडने आपला संघ मजबूत करताना ख्रिस वोक्स व मार्क वुडला चमूत घेतले आहे. तर भारतीय संघात मोठी खळबळ उडाली असून कर्णधार कोहलीला आपल्या नेतृत्व शैलीबरोबरच स्वतःच्या फलंदाजी तंत्रातही मोठे बदल करावी लागणार आहे. कोहली संघाचा प्रमुख फलंदाज असल्याने त्याचे अपयश संघासाठी घातक ठरत आहे.
रोहीत शर्मा सोडून एकाही भारतीय फलंदाजाच्या खेळात सातत्य व विश्वसनियता नाही. केएल राहुलने ८६ व १२९ करून आशा वाढविल्या असल्या तरी ४, ५, ० व ८ या त्याच्या इतर चार डावातील धावा संघाच्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. चेतेश्वर पुजाराने ९१ धावा तिसऱ्या सामन्यात जमविल्या खऱ्या परंतु लॉर्डसवर केलेल्या ४५ धावांशिवाय त्याचेही उखळ उघडे पडले आहे. उपकर्णधार अजिंक्य राहाणे सातत्यपूर्ण खेळत नसल्याने तो टिकेचा धनी बनला असून चौथ्या सामन्यात त्याच्यावरच कुऱ्हाड कोसळली जाऊ शकते. ज्या रिषभ पंतवर मोठा भरवसा ठेवला जात होता त्या पंतने पाच डावात केवळ ८४ धावाच काढल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविंद्र जडेजाही त्याच्यावर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. त्याला फलंदाजी बरोबरच गोलंदाजीत आलेले अपयश भारतासाठी क्लेषदायक ठरले आहे.
रवीचंद्रन आश्विनला संघाबाहेर ठेवण्याची चाल अंगलट आल्यानंतर चौथ्या सामन्यात त्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाढली आहे. तर थकलेला ईंशात शर्मा संघाबाहेर जायला हवा. त्याच्या गोलंदाजीत ना जोश ना होश शिल्लक आहे. आता त्याला कायमचा नारळ देऊन ताज्या दमाच्या शार्दूल ठाकूरला संघात घ्यायला हवं तर जसप्रित बुमराहालाही आरामाची गरज वाटत असून जोशातील उमेश यादवला संधी मिळायला हवी. सुर्यकुमार यादव देखील आपल्या बॅटला धार लावून बसला असून इंग्लिश गोलंदाजांची कत्तल करण्याची संधी त्याला देखील देण्याची वेळ आता आली आहे.
हे सर्व करताना मात्र संघाची घडी व खेळाडूंचा आत्मविश्वास तुटला जाणार नाही याची दक्षता संघ व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. असे झाले तरच पुढील दोन सामन्यात भारताला इंग्लंडला लोळविता येईल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com


