shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (६०)कृष्णागरु / आगरू..!!


पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता तिसरी रास मिथुन ही असून या राशीचे नक्षत्र आर्द्रा हे आहे. याचा आराध्यवृक्ष कृष्णागरु/अगरू (Aquilaria agalocha ) हा आहे .

मिथुन राशीचे आर्द्रा हे नक्षत्र कार्तिक, मार्गशीर्ष, पौष महिन्यात दिसते. या नक्षत्राचे चारही चरण मिथुन राशीत येतात.मिथुन राशीचा आराध्यवृक्ष अगरु कृष्णागरु हा ब्रह्मदेशात तसेच ईशान्य भारतातील आसाम ,मेघालय, अरुणाचल आणि नागालँड या सदाहरित वन क्षेत्रात आढळून येतो.

हा वृक्ष ३०फुट उंचीचा आणि ७/८ फुट घेराचा ,मोठा असतो. यामध्ये काळा कृष्णागरु सुगंधी, जड आणि पाण्यात बुडणारा म्हणून सर्व श्रेष्ठ समजला जातो.
कृष्णागरु दाहगरू, काष्टगरु, मांगल्यगरु असे या झाडाचे प्रकार आहेत. या झाडाची फुले एप्रिल-मे महिन्यात पांढरी व गुच्छाने येतात.या झाडाची फळे १ ते २ सेंटीमीटर लांबीची , मृदूस्पर्शाची जून जुलै  महिन्यात येतात. 

झाडाची पाने ५ ते ७ सेंटीमीटर लांबीची असतात, हाताला चांबड्यासारखा स्पर्श जाणवतो. या झाडाचा उपयोग प्रामुख्याने सुगंधासाठी म्हणजे अंगाला उटी लावण्यासाठी, देवपूजेसाठी तसेच नेत्ररोग, त्वचारोग, अंगाचा दाह, यासाठी होतो. संधिवाताचे दुखणे असल्यास  उद बाहेरून लावतात. भुकेसाठी पोटामध्ये देतात, तोंडाला वास येत असेल तर याचे तुकडे तोंडात धरून चावतात. चवीला कडवट आणि  मेणासारखे  असे हे तुकडे असतात. 

श्वासाचे आजार, उचकी लागणे, थंडी ताप यामध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. या झाडाच्या लाकडाचे विशेष म्हणजे हे लाकूड जमिनीवर ठेवले तर टिकत नाही आणि पाण्यात ठेवले तर खराब होत नाही. याचा रंग पांढरट-पिवळसर-तपकिरी असतो. मात्र या लाकडाला कडक  गाभा  तयार होत नाही.

आर्थिक दृष्ट्या भरपूर कमवून देणारा हा वृक्ष आहे. याचे विशेष म्हणजे पावसामुळे या झाडाचा बुंधा आतून सडतो आणि त्यामध्ये बुरशी आणि पोकळी तयार होते.
ही बुरशी ओलिओरेसिन हा पदार्थ तयार करते आणि त्यामुळे लाकडाचा रंग बदलून लाकूड जड होते.    कृष्णागरूच्या लाकडाला वास नसतो तर त्या लाकडामध्ये तयार होणाऱ्या बुरशीला वास असतो. ही बुरशी अत्यंत सुगंधित असते. 

कृष्णागरुचा गाभ्यातील भाग हा एवढा सुगंधित असतो कि त्याचा दर सोन्याहून जास्ती आहे. 
अगरु या शब्दावरून अगरबत्ती हा शब्द तयार झालेला आहे .तसेच अरब देशात अगरू ला उद असे म्हणतात यावरून उदबत्ती असे नाव तयार झाले आहे. हा पदार्थ आत्यंतिक सुवासिक असल्याने अरब देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतो.वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..
close