shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रियांची सक्षम होण्यासाठी प्रमुख भूमिका काय असायला हवी..!

लेखिका
सौ.भारती दिलीप सावंत
      
 बंदिनी स्त्री असे ही बंदिनी.. 
 हृदयी पान्हा नयनी पाणी..!
 जन्मोजन्मीची ही कहाणी..
 बंदिनी स्त्री असे ही बंदिनी..!!
                    भारतात परकीय सुलतानी आक्रमणे होऊ लागली आणि स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होऊ लागला.त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या काळी स्त्रियांना पडद्यात बंदिस्त केले गेले. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. स्त्रियांनी फक्त 'चूल आणि मूल' एवढेच सांभाळायचे असा जणू नियमच पडुन गेला. त्यांचे आयुष्य गतीहिन झाले. त्यात जुन्या परंपरा रूढी आणि अंधश्रद्धा मूळ धरू लागल्या.

           ऋषीमुनींच्या काळातील स्त्रियांना साक्षरतेचे वारे लागले होते. विदुषी असणाऱ्या कित्येक स्त्रियां भारतात राहत होत्या.
        गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा रत्नावली
        होत्या पुरातन काळातही साक्षर 
        मग सुलतानी काळातच कशा
        राहिल्या समस्त नारी निरक्षर
                    यवन शत्रुसैनिक स्रियांच्या अब्रूवर हात उचलत. याचाच परिणाम त्यांना शिक्षण किंवा व्यवहारी जगापासून वंचित रहावे लागले. पुढे राजस्त्रिया गादीवर बसून राज्यकारभारही करू लागल्या. ताराराणी, येसूबाई,अहिल्याबाई होळकर ,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धकौशल्य आत्मसात करून गनिमाला आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पेशवाईतही स्त्रियांना मानाची वागणूक मिळाली गेली.
          पुढे समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षण आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर चांगलाच प्रकाश टाकला. त्यांना साक्षर करण्याचा विडाच उचलला. ज्योतिराव फुल्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना साक्षर बनवून स्त्रियांना शिकविण्यासाठी ठेवले. पहिल्या स्त्रीशिक्षिका म्हणुन आजही त्यांचा गौरव होतो.त्याकाळी मात्र सावित्रीबाईंना खूप त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी न डगमगता आपले कार्य चालूच ठेवले. स्वातंत्र्यपूर्व काळातील आनंदीबाई जोशी, रमाबाई टिळक ,ताराबाई शिंदे, सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई यांनी साक्षरतेचे धडे घेऊन देशाच्या स्वातंत्र्याला हातभार लावला. घराच्या चार भिंतीत अडकलेली स्त्री पडद्याबाहेरच्या जगात प्रवेशली. तिची वैचारिक क्षमताही सुधारली. तरीही मनाला खटकत रहाते की स्त्री खरोखऱच स्वतंत्र झालीय कां? मुठ्भर लोकांनी आपापल्या पत्नींना साक्षर केले तर समाजातल्या सगळ्या स्त्रिया स्वतंत्र झाल्यात कां? यां प्रश्नाचे उत्तर आज एकविसावे शतक संपण्याच्या काळातही नाही असेच म्हणावे लागेल. 
      याला कारणीभूत आहे पुरुषांची सर्वत्र दिसणारी मक्तेदारी, दंडेलशाही वृत्ती. प्रत्येक घरातील, कुटुंबातील कारणे वेगळी असतीलही. पण प्रत्येक घरातील पुरुष आजही पत्नीला बरोबरीचे मानत नाही. तिच्या विचारांच्या पंखांना छाटले जाते. उंच आकाशात भरारी मारणाऱ्या बाईला तुझी जागा पायताणाजवळ म्हणून हिणवले जाते. तिच्या विचारांना भले तें योग्यही असतील पण दुधातल्या माशीप्रमाणे लांब फेकले जाते. तिचा सल्ला ग्राह्य न मानता तु स्वयंपाकघराचे पहा,बाहेरच्या व्यवहारात नाक खुपसू नकोस असे बोलून तिचे खच्चीकरण केले जाते. हिला किंमत दिली तर ही डोईजड होईल ही वृत्ती जोपासली जाते. 
         पण आज संगणक युगातल्या मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत काम करतांना दिसत आहेत. 'आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे' यां उक्तीप्रमाणे त्यांच्या पंखात आता खूप बळ एकवटलेय. दडपशाहीला न जुमानता ती 'हम भी कुछ कम नही' हें सिद्ध करू पाहतेय. आज सगळ्या क्षेत्रात त्या हिरीरीने भाग घेतेच पण पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही भाग घेतेय....... नाही जिंकतेय. स्वतःची जीवनाची जबाबदारीची लढाई स्वतःच लढतेय...... पण मागे हटत नाही. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी तरी गगनाला हात टेकवण्याचे साहस केलेय. विज्ञान क्षेत्राने अधुनिक युगातल्या मुलींच्या जीवनवाटा उंचावल्यात.त्या पायलट किंवा मोटरवूमन बनल्यातच. संशोधिका, लेखिका, कवयित्री बनून आपल्या तलवाररुपी लेखणीने शब्दांचे वार करतात. याही पुढे सांगायचे तर पुलवामा मध्ये निष्पाप जवानांवर बॉम्बस्फोट करणारे आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात अग्रेसर असणारी धडाडीची एअरक्राफ्ट पायलटने शौर्याची कमाल करून पुरुषांच्या मक्तेदारीला छेद दिला. 
       शहरात नि सुशिक्षित कुटुंबात मुलीच्या पंखांना विशेष बळ दिले जाते. माणसाला सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग नाही करता येत. खेड्यात आजही बरीच कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. इच्छा असूनही परिस्थितीने गांजलेली ही कुटुंबे मुलींच्या शिक्षणाकडे कानाडोळा करतात. एकापेक्षा अनेक मुले असतील तर मुलगा हा 'वंशाचा दिवा' 'म्हातारपणाची काठी' मानून मुलाला शिक्षण देतात तो मुलीपेक्षा अभ्यासात कच्चा असूनही. पण मुलीच्या प्रगतीचे दोर कापले जातात. अशीही धारणा असते की जास्त शिकलेली मुलगी डोईजड होईल किंवा तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही. सर्वांगाने विचार करता मुलीच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यापेक्षा तिला कमीपणा देण्याचेच प्रयोजन अधिक असते. त्यातून बंड करणारी मुलगी आगाऊ म्हणून गणली जाते. तिची समाजात बदनामी केली जाते. तिने आपल्या हेतुपासुन ढळण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. काही घरांत मुलगी स्वतंत्र विचारांची असेल तर तिला ठार मारण्यासही कमी केले जात नाही. काही वेळेस तिला कोंडून ठेवणे, मारहाण करणे असले अमानुष प्रकार केले जातात. मग ती मुलगी असू की पत्नी. आज संगणक युगात मुली खूप आघाडीवर आहेत. त्या पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे अत्याचार सहन करत नाहीत तर त्या विरोधात आवाज उठवतात. पुरुषप्रधान संस्कृतीत त्या स्वतःचे स्थान पक्के करू पहात आहेत. त्यांच्या यां साहसाला कायद्याचीही साथ आहे. त्या स्वतःवरील अन्यायाला स्वतःच वाचा फोडतात.
            गरीब गायीप्रमाणे असणारी नारी वेळेला नागीण बनून डसायलाही मागेपुढे पहात नाही.हुंडाबळी असो की पतीकडून शोषण असो, त्या अन्यायाविरोधात ठाम उभ्या राहातात. एकेकाळी खाली मान घालून शेळीसारखी वावरणारी मुलगी वाघिणीचे रूप कधी घेईल सांगता येत नाही. आज 'पहिली बेटी धनाची पेटी' म्हणून स्वीकारण्यातच धन्यता आहे. मुलगी म्हणून गर्भात हत्या करणाऱ्या पुरुषाला मुलींच्या कार्यकर्तृत्वाने चांगलीच चपराक बसवली आहे. तिच्या यशाची भरारी हिमालयाहून उंच, सागराएवढी विस्तीर्ण नि गगनाला गवसणी घालणारी आहे. गर्भातून येणारी तिची हाक तिच्या यशोशिखराची नांदी आहे. वात्सल्यतेचा झरा असणारी ही स्त्री स्वाभिमानाला धक्का लागताच वाघिणीप्रमाणं चवताळून उठणार आहे. कारण तिच्या रगारगात तुळजाभवानीच्या तलवारीची तळपती धार आहे. ती महिषासुरमर्दिनी नार आहे.
        महान हा भारत देश
        नांदतेय येथे संस्कृती
        नको बाधा परकीयांची
        पसराया घातक विकृती
                  आता मुलीं प्रगतशील आणि साक्षर बनण्यासाठी जी आभाळाला गवसणी घालू पहात आहेत,ते खरोखरीच प्रशंसनीय आहे.तिच्या भावी जीवनासाठी ते अत्यावश्यक आहे.
          मारा मुलींनो प्रगतीस्तव
          उंच भरारी तुम्ही नभांतरी
          एक पाऊल पुढे टाकताना
          होईल तुमची कसोटी खरी
              मनामनांमध्ये साक्षरतेचे वारे घुमत असताना स्त्रियांनी पाऊल पुढेच टाकायला हवे." दुनिया मेरी मुठ्ठीमें" असे म्हणत पुढचे पाऊल टाकावयास हवे म्हणजे समाजही आपला हात पुढे करेल.तेव्हाच स्त्रियांचा प्रगतीचा मार्ग सुकर,सफल होईल.

सौ.भारती दिलीप सावंत, मुंबई
फोन - 9653445835
close