राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजयकुमार राजेघोरपडे यांची मागणी
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा :(दि .९ ) : साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी सार्वजनिक सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर चा वापर करून डोळे तपासणी शिबीर भरवण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना राजेघोरपडे यांनी मत व्यक्त केले साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बहुजन समाजाचे प्रबोधन करून त्यांना देशाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करून त्यांचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले पाहिजे यासाठीच लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने सन्मानित केले पाहिजे असे मत भारत हायस्कूल जेऊर येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षक संजय कुमार राजेघोरपडे यांनी आपले विचार मांडले.
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असे विचार मांडून श्रमिकांसाठी कष्टकरी लोकांसाठी मानसन्मान मिळवून देणारे आणि गोरगरिबांच्या कष्टाची जाणीव असणारे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवायचे असेल तर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अभ्यासक्रमात आणले पाहिजे असे मत मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन कांबळे यांनी व्यक्त केले .
या पुढे बोलताना किसन कांबळे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते हा इतिहास आहे त्यांना लगेच शाळेत जी वागणूक मिळाली ती त्यांच्या बालमनाला आवडली नाही म्हणून त्यांना नाईलाजाने शाळा सोडावी लागली हा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहेच म्हणून प्रतिकूल परिस्थितीत ही आपले शिक्षण पूर्ण करणारे व्यक्ती म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या कडे आपण एक प्रेरणात्मक व्यक्ती म्हणून पहात असतो.
अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम होते पण त्यांना आदराने सर्वजण अण्णाभाऊ असे म्हणतात ही माहिती किसन कांबळे यांनी पुढे बोलताना दिली .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब टकले उपस्थित होते .यावेळी बाळासाहेब टकले म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे बंडखोर व्यक्तिमत्व होते त्यांनी अन्याय कधीच स्वीकारला नाही अण्णाभाऊ साठे यांनी देशातील गोरगरीब जनतेची अवस्था पाहून मिळालेला स्वातंत्र्याचा निषेध नोंदवताना सांगितले होते की यह आझादी झुठी है देश कि जनता भूखी है इंग्रजांच्या ताब्यातून मिळालेले स्वातंत्र्य ते फक्त उच्चवर्णीय लोकांना मिळाले होते आणि बहुजन समाज उच्चवर्णीयांच्या गुलामीत होता याची जाणीव करून देण्यासाठी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 ला देशव्यापी मोर्चा काढला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून करमाळा आरपीआयचे तालुका अध्यक्ष अर्जुन राव गाडे उपस्थित होते.
अध्यक्ष भाषणाच्या वेळी अर्जुनराव गाडे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता यासाठीच अण्णाभाऊ म्हणत जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव या जगाला बदलायचे असेल तर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य असे शिक्षणाचे घाव घातले पाहिजेत असा विचार अण्णाभाऊंनी आपणा सर्वांना दिला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका चे अध्यक्ष किसन कांबळे यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय धनगर समाजाचे सोलापूर चे कार्य अध्यक्ष बाळासाहेब टकले संभाजी ब्रिगेड सोलापूर येथील कार्यकर्ते अमोल गवळी अनिल कसबे, मातंग एकता आंदोलन चे ता.अध्यक्ष शरद पवार, रोशेवाडीचे माजी सरपंच अध्यक्ष दत्ता आलाट युवा नेते युवराज भाऊ जगताप आदी उपस्थित होते.

