शेरकरबाबा समाधी मंदिर वाचवा ; स्वातंत्र्यदिनी करणार एक दिवसीय उपोषण
इंदापूर प्रतिनिधी: अकलूज – इंदापूर मार्गावरील वकिलवस्ती(सुरवड) येथील वै.शेरकरबाबा महाराज समाधी मंदिर श्री.संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग ९६५ जी मध्ये गट नं. १० भूसंपादनामध्ये बाधीत होणार आहे. हे मंदीर समस्त वारकरी सांप्रदायाचे दैवत असून ते वाचवण्यात यावे अशी मागणी वै.शेरकरबाबा सेवाभावी ट्रस्ट व वै. शेरकरबाबा समाधी मंदिर बचाव समिती तसेच समस्त वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने सोमवारी दि.०९ रोजी इंदापूरचे तहसिलदार अनिल ठोंबरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या मागणी संदर्भात रविवार दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी समाधी मंदिर परिसरात त्यांचे भक्तगण एक दिवशीय लाक्षणिक उपोषण ही करणार आहेत.
शेरकरबाबा महाराज यांचे वंशज ज्ञानदेव नामदेव शेरकर म्हणाले,की शेरकरबाबा महाराज समाधी मंदिर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजमितीला संपूर्ण वारकरी सांप्रदायाचे दैवत, आशास्थान, प्रेरणास्थान, श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आहे. ही समाधी हलविण्याचा जर प्रयत्न झाला तर समस्त वारकरी सांप्रदायाच्या भावनेला तडा जाईल. हे मंदिर वाचवण्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान,श्रीक्षेत्र देहू यांनी दि.१५ जाने २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिफारस पत्र पाठवले आहे.
श्री.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा येथून जाताना या मंदिरामध्ये आरतीसाठी पालखी थांबून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. शेरकरबाबा महाराज हे आमचे दैवत असून या ठिकाणाहून जाणारा पालखी महामार्ग हा मंदिराला बाधा न होता आपण इतर मार्गाने नियोजन करुन मंदिर वाचविण्याचा प्रयत्न करावा. मंदिर वाचविण्यासाठी पूर्व बाजूस असलेले शेतकरी पालखी महामार्गासाठी स्वतःची जमीन देण्यास तयार आहेत आणि ती जर जमिन वापरात आली तर पालखी महामार्गास जे वळण बसणार आहे ते सरळ होण्यास मदत होणार आहे.
याच्यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही रविवार दि. १५ ऑगष्ट २०२१ रोजी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामरुपी जागर शेरकरबाबा महाराज समाधी मंदिरासमोर करित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत.

