भारतीय समाजव्यवस्था ही मुळातच अनादी काळापासून विषमतावादी, वर्णवर्चस्ववादी आणि जातीव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये चिखलात रूतलेल्या चाकासारखी गट्ट घट्ट धरून बसलेली आहे. त्यामुळेच उपेक्षित, शोषित, पीडित असलेल्या भटक्या-विमुक्तांच्या जीवनाची शोकात्मगाथा अगाध असल्याचे दिसते. भटक्या-जातींमध्ये २८ जाती तर विमुक्त जातींमध्ये १४ जमातींचा समावेश होतो.
त्यातील विमुक्त जमातींमध्ये वडार समाज हा आज २१ व्या शतकातही राहायला घर नाही, अंग झाकण्यासाठी पुरेसे वस्त्र नाही, अशा अवस्थेत जीवन जगतो आहे. या गोंष्टींची जाणीव समाजाला आणि इथल्या व्यवस्थेला व्हावी म्हणून श्रीकांत मुद्दे यांच्या तळमळीच्या, एकनिष्ठेच्या कार्याचे अभिनंदन करावे लागेल.
श्रीकांत मुद्दे हे स्वत: वडार समाजातील असल्याने त्यांनी जे भोगले, पाहिले आणि अनुभवले त्याचीच अनुभूती ग्रंथातून व्हावी, वडार समाजावर लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखणीची धार तीव्र व्हावी आणि समाजाला अज्ञानरूपी अंध:कारातून ज्ञानरुपी प्रकाशझोताकडे घेऊन जावे या प्रांजळ भूमिकेतून ‘वडार समाज : स्थिती आणि गती’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. ही अतिशय धाडसाची बाब आहे.
प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या भागात वडार समाजाच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे ७ लेख आणि दुसऱ्या भागात वडार समाजाच्या गतीवर प्रकाशझोत टाकणारे ९ लेख आहेत. संपादकीय मनोगतात श्रीकांत मुद्दे यांनी समाजाविषयीची चिंतन करून परिवर्तनाची ज्ञानगंगा पेटवली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी गावगाड्याच्या शिल्पकाराच्या व्यथा-वेदनांचा हुंकार आणि वडार समाजाच्या पाऊलखुणा शब्दशिल्पांनी वाचकांच्या हृदयावर कोरल्या आहेत, त्याला डॉ.अशोक पवार यांनी ‘दोन शब्द’ लिहून गावगाड्याच्या उपेक्षित शिल्पकारांमध्ये परिवर्तनाची आशेची ज्योत पेटवली आहे.
प्रस्तुत ग्रंथातील बहुतांश लेखक वडार समाजाव्यतिरिक्त असूनही गावगाड्याच्या उपेक्षित शिल्पकाराला आपल्या लेखणीच्या जोरावर शब्दशिल्पांनी कोरून परिवर्तनाची व चळवळीची धार तिक्ष्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच १६५ पृष्ठांमध्ये साकारलेला हा ग्रंथ या ग्रंथाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे आणि मलपृष्ठावरील..
"दगडाशी झुंज माझी दगड-मातीशीच इमान
अंतरीच्या उमाळ्यांना तरी कुठे सन्मान !शिल्पकार मी गावगाड्याचा आणिक पाषाणातील शिल्पकृतींचा मात्र येथला उपेक्षित वेदनेशी नाळ माझी
प्रत्येक वेदनेचा आक्रोश एकच उजाडले पण काळोख केव्हा संपणार..?"
ह्या पंद्यपंक्ती गावगाड्यातील उपेक्षित शिल्पकाराच्या व्यथा-वेदनांची नाळ सांगणाऱ्या आणि समाजातील कोणत्याही जातीच्या, व्यक्तीच्या ह्दयाला भिडणाऱ्या आणि डोळ्यातून दु:खाच्या अश्रूधारा येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. याशिवाय गावड्याच्या शिल्पकाराला मदतरूपी हाताने पुढे नेणाऱ्या, दिशा देणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना आणि चळवळीला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला आहे. त्यावरून श्रीकांत मुद्दे यांचा समाजाविषयीचा प्रांजळ, निस्वार्थी तळमळ प्रस्तुत ग्रंथातून दिसून येते. हेच त्यांच्या ग्रंथाचे मुख्य सूत्र, गाभा आणि सामर्थ्य आहे.
प्राचीन काळापासून भारतीय स्थापत्य कलेच्या इतिहासाची पाने चाळली तर वास्तु, मंदिरे, रस्ते, मूर्ती, लेणी, विहार, स्तुप, विहीर, दुर्ग यांची कोरीव बांधणी वडार समाजाच्या श्रमसंपत्तीने आजतागायत झालेली दिसून येते. याशिवाय उखळ, जातं, पाटे, वरवंटे अशा जीवनोपयोगी असणाऱ्या वस्तुंची निर्मिती करून गावगाड्याच्या गरजा भागविणारा वडार समाज आजही पोटात भूकेची आग, डोळ्यात दु:खाच्या अश्रुधारा घेऊन भटकंती करताना दिसतो आहे.
आज जागतिकीकरण, आधुनिकीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, औद्योगिकीकरण, शहरीकरण, पाश्चिमात्यिकरण आणि विषमतावादी समाजरचना अशा विविधांगी कारणांमुळे वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा ऱ्हास झालेला दिसून येतो. परिणामी वडार समाजातील बहुतांश लोक पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊन छोटे-मोठे काम करताना दिसत आहेत. त्यामुळेच या समाजाची प्रगती खुंटलेली दिसते; म्हणूनच आजही गावगाड्याचा शिल्पकार उपेक्षितच आहे.
प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून श्रीकांत मुद्दे यांनी वडार समाजाच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि परिवर्तनरूपी चळवळीची विचारशलाका शब्दशिल्पाने पुढे घेऊन जाण्याचे मनोधैर्य दाखविले ही कौतुकास्पद बाब आहे. थोडक्यात, आज २१ व्या शतकातही वडार समाज हा रूढी,प्रथा, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यांच्या गर्तेत अडकलेला दिसतो. त्यामुळेच त्यांच्यात शिक्षणाचा अभाव, जनजागृती व एकजुटीचा अभाव दिसतो. म्हणजेच स्वातंत्र्याची पहाट होऊन ७० वर्षे उलटली तरी विमुक्त भटका वडार समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्राबद्दल अनभिज्ञच दिसतो.
अशा या वडार समाजाकडे शासन, प्रसारमाध्यमे, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष असलेले दिसते. याशिवाय वडार समाजातील स्त्रियाही अलक्षित, दुर्लक्षित असलेल्या दिसतात. म्हणून श्रीकांत मुद्दे यांनी वडार समाजाच्या लोकजीवनाचा, संस्कृतीचा जागर अखंड रहावा, त्यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा अखंडित रहाव्यात आणि गावगाड्याला ज्या वडार समाजाने घडविले त्या गावगाड्याच्या उपेक्षित शिल्पकाराला न्याय देण्यासाठी ‘वडार समाज : स्थिती आणि गती’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ साहित्यिक, वाचक, अभ्यासक, विचारवंत अशा सर्वांसाठी एक आदर्श संदर्भग्रंथ ठरावा असा हा अमूल्य ठेवा आहे.
एकंदरीत, श्रीकांत मुद्दे यांनी एक अजोड असा ग्रंथ साकारलेला आहे. ही प्रशंसनीय व उद्बोधक बाब आहे. पुढील काळात त्यांच्याकडून असेच सृजनशील लेखन व्हावे, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!
डॉ.शेटकार रामशेट्टी वडार समाज : स्थिती आणि गती मराठी विभाग संपादक : प्रा.श्रीकांत मुद्दे
दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर. प्रकाशन : प्रवर्तन पब्लिकेशन,लातूर.
मो. ९९२२१९१८०५ पृष्ठे : १६५, मूल्य : १६०

