shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येेथील ग्रामदैवता श्री लक्ष्मीआईचा वार्षिक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा..!!


---------------------------------------
नगर प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के) नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठिकाणी शनिवार (दि.७) ऑगस्ट रोजी  सालाबादप्रमाणे लक्ष्मीआईचा जत्रा उत्सवाचे नियोजन समस्त मातंग समाज व गुंडेगाव ग्रामस्थांनी केले.आषाढी पौर्णिमेच्या नंतर एखादा मंगळवार किंवा शुक्रवार यासाठी ठरविण्यात येतो.हा उत्सव प्रामुख्याने गावच्या रक्षणकर्त्या देवता श्री लक्ष्मीआई व मरीआई यांचा असतो.
  
गाव म्हटलं की गावगाड्याच्या रूढी, परंपरा, चाली-रीती आल्याच त्यापैकीच एक साथीची जत्रा किंवा आखाड जत्रा तसेच 'गाव बाहेर निघणे' असेही म्हणतात. आपल्या गावच्या रक्षक शक्तींना मानपान देण्याचा व वाईट शक्तींची शांतता करण्याचा दिवस.
    
गुंडेगावमध्ये लक्ष्मीआईचे मंदिर 'गावशिवालगत'आहे.लक्ष्मीआईचे मंदिराचे जिर्णोउद्धाराचे काम सध्या चालू आहे.
देवीची दोन तांदळा शिळा आहेत. त्यांनाच शेंदूर लावलेला आहे‌.

 
सकाळी - सकाळी गावातील महीला लक्ष्मीआईच्या मंदिरात गोड नैवेद्य दाखवण्यासाठी व नारळ वाढविण्यासाठी लगबग सुरू होते. 
दुपारी १२ नंतर सर्व पुरूष मंडळी  ग्राम- प्रदक्षिणेची तयारी करतात व ४ वाजता या वेढ्यास सुरुवात होते. गावातील  मराठा, गुरव,वडारी, धनगर,कोळी, सुतार, कुंभार, परिट, शिंपी, लोहार, रामोशी, कैकाडी, मातंग, हरिजन या सर्व समाजातील ग्रामस्थ हजर असतात.गाव वेढ्याच्या वेळी सर्वजण उपस्थित राहून देवीची साथ काढतात.
 
या उत्सवात मुख्य मान हा मातंग समाजाला असतो, इतर सर्वजण समाज त्यांच्या उत्सवात सहभागी असतात.बारा बलुतेदार समाजाच्या तरूणांचा विशेष सहभाग असतो.

यावेळी पोतराज शंख फुंकित असतो.यावेळी तांदळाचे आंबिल व ज्वारीच्या घुगऱ्या शिंपडल्या जात असतात.हा वेढा गावच्या मांगवाडयातील चावडी पासून सुरू होऊन गावातील प्रमुख रस्त्यांने गावच्या मुख्य चौकात येऊन गाव वेशीला नारळबांधुन लागलीच श्री लक्ष्मीआईच्या मंदिराजवळ नेला जातो.नतंर श्री लक्ष्मीआईच्या मंदिराला  प्रदक्षिणा होऊन सर्वजण मंदिरात येतात. वेढा गावाबाहेर पडल्यापासून लक्ष्मीआईच्या मंदिराच्या समोर गोंधळाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. वेढा मंदिरात आल्यावर एका भक्ताच्या अंगात देवीचा संचार होतो त्यानंतर आरती होते. आरती झाल्यानंतर बलिदानाने उत्सवाची सांगता होते. 

पूर्वी या उत्सवाला 'रेड्याचा बळी दिला जात होता त्याला रेड्याची साथ असे म्हणत' असे जुने लोक सांगतात. आता मात्र कोंबड्याचे बळी दिले जातात..  

अशी ही गावगाड्याची एक दिवसाची जत्रा आणि विशेष म्हणजे हा उत्सव इतर सणवारांप्रमाणे पंचांगातील ठराविक तिथीला कधीही येत नाही मात्र दरवर्षी नक्कीच येतो.या उत्सवासाठी श्री रामदास सकट,आनंदा सकट, संतोष सकट, संजय सकट,डाॅ.विलास सकट,शरद सकट,कानिफ सकट,यांनी परिश्रम घेतले आहे.यावेळी उपस्थितांमध्ये सुभाष कोतकर,ईश्वर हराळ मेजर, दादासाहेब आगळे,के.डी.हराळ,आदी गावातील महीला,पुरुष उपस्थित होते.
close