अहमदनगर दि. 12 :- जिल्हयातील वृद्धांसाठी (राष्ट्रीय हेल्पलाईन) एल्डर लाईन-14567 प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकरिता मंत्रालय, भारत सरकार, मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 सर्व राज्यात सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (एनआयएसडी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्टांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशनव्दारे चाचवली जाईल. सदर हेल्पालाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार देते. तसेच बेघर वृध्द व्यक्तीस मदत म्हणून वध्दाश्रमांमध्ये निवारा प्रदान केला जात आहे. आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या बाबतची प्रतिसाद यंत्रणा (रिस्पोन्स सिस्टीम) लवकरच राज्यात सुरु होणार आहे आणि संबंधित बाबींवर काम करणार आहे ज्याव्दारे निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर अनु वृध्दांवरील अत्याचार आणि वध्दांना सोडून देणे इत्यादींची माहिती व मदत देण्यात येईल.
या हेल्पलाईनच्या देशभरात सेवा वाढविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोवृध्दांना सेवा उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (एफआरओ) यांनी जिल्हयात काम सुरु केले आहे. असे देविदास कोकाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.


