अतिभारीत रोहित्रामुळे विजेची समस्या
प्रतिनिधी :रफिक शेख
पारनेर: ( दि .१२) : तालुक्यातील अळकुटी उपकेंद्र अतिभारीत असल्यामुळे या परिसरातील विजेची समस्या मोठया प्रमाणात निर्माण झालेली आहे. ती दुर करण्यासाठी आ. लंके यांच्या सुचनेनुसार ३.१५ एम. व्ही. ए. क्षमता असलेल्या रोहित्राची क्षमता ५ एम. व्हि. ए. करण्याचा प्रस्ताव पाठवूनही त्यास मंजुरी मिळत नसल्याने आ. नीलेश लंके यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सत्ताधरी आमदारानेच आंदोलनाचा बडगा उगारल्याने खडबडून जाग्या झालेल्या अधिकायांनी बुधवारीच ५ एम. व्हि. ए. क्षमतेचे रोहित्र अळकुटी उपकेंद्रामध्ये पाठवित संभाव्य संघर्षास पुर्णविराम दिला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर आ. नीलेश लंके यांनी महावितरणच्या अधिक्षक कार्यालयाकडे या उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. अधिक्षक कार्यालयाने तसा प्रस्ताव मुुंबईतील प्रकाशगढ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यानंतर मात्र पुढे त्यास प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरूच असल्यामुळे आ. लंके यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. बुधवारी राष्ट्रवादी विदयार्थी आय टी सेल विभागाचे राज्याचे प्रमुख जितेश सरडे, माजी सभापती सुदाम पवार, महावितरण समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या पारनेर येथील कार्यालयात आंदोलन केेले. याच प्रश्नावर शुक्रवारी देवीभोयरे फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
एकीकडे संतप्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असताना दुसरीकडे आमदार लंके यांनी याच प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिल्याने महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली. नगर कार्यालयाने तांत्रीक त्रुटी दुर करून प्रस्ताव नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला होता. तेथून कल्याण येथील व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविण्यात आला. पुढे तो मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडेही पाठविला होता. तरीही उपकेंद्रामध्ये रोहित्र बसविण्यात आले नव्हते. आ. लंके यांनी उपोषणाचे हत्यार उपसताच तसेच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बुधवारी पारनेर येथील कार्यालयात अधिकायांना जाब विचारताच बुधवारी दुपारीच हे रोहित्र औरंगाबाद येथून अळकुटीकडे रवाना करण्यात आले.
सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतामधील उभे पिक जळू लागले आहे. उपलब्ध पाण्याच्या मदतीने पिक वाचविण्याची शेतकरी धडपड करीत असताना विजेचा खोळंबा होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष होता. आगोदरच कोरोनामुळे शेतमालाच्या भावात मोठया प्रमाणात घसरण होउन शेतकरी आर्थिक अडचणीत असताना विजेच्या खोळंब्यामुळे हातातील पिकही वाया जाते की काय अशी भिती निर्माण झाली होती. शेतकरी वर्गाच्या या तिव्र भावना लक्षात घेत आ. लंके यांनी याप्रकरणी आक्रमक भुमिका घेत अळकुटी उपकेंद्रात रोहित्र बसविण्यास महावितरणला भाग पाडले. शेतकरी वर्गाकडून आ. लंके यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

