shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (५७): बहुगुणी बेहडा....!



पर्यावरण रक्षणातील नक्षत्रवनाचा विचार करता मेष राशीच्या तिसऱ्या कृतिका नक्षत्राचा पर्यायी आराध्य वृक्ष बेहडा (Terminalia bellerica) हा आहे. भरपूर उंच वाढणारा म्हणजे जवळजवळ शंभर फूटाहून जास्त आणि सुमारे दहा फुटाचा परीघ, असा हा वृक्ष विस्तारलेला असतो. या झाडाचे विशेष म्हणजे या झाडावर नेहमी मधमाशांचे आग्या मोहोळाचे पोळे लागलेले दिसते. याला लहान फळे येतात. हा वृक्ष भरपूर पावसाच्या डोंगराळ भागात वाढणारा असला तरी थंड हवेच्या ठिकाणी हा सहसा आढळत नाही. मात्र डोंगर सपाटीवर चांगलाच वाढतो. या झाडाची पाने मोहाच्या अथवा वडाच्या झाडासारखी लांबरुंद असतात आणि मार्च मेमध्ये याला फुले येतात.

बेहडा यालाच वेहळा किंवा धटिंग असेही म्हणतात. याची गोलाकार फळे असून फळावर कवच असते हे कवच काढले या आत मध्ये टणक भाग असतो आणि तो टणक भाग फोडला की आत एक बी असते. बी चविष्ट असते पण अति खाल्ल्याने नशा येते. रानातील माकडे ही फळे आवडीने खातात तसेच साठवून ठेवतात. बेहड्याचा वापर त्रिफळा चूर्णामध्ये कफनाशक म्हणून होतो. डोळे आले असतील तर बेहड्याचा लेप डोळ्यावर लावतात. बेवड्याची साल ही आवाज सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. स्वरयंत्रांमध्ये आजार असेल तर बेहड्याची साल गुणकारी आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने या झाडाचे विशेष महत्त्व म्हणजे याचा गोलाकार विस्तार फार मोठ्या प्रमाणात असतो याच्या फळाची साल काढली की आतमध्ये टणक बी असते. हे बी पाण्यात भिजवून पेरले  की यापासून रोप तयार होते मात्र बी जुने असेल रोपे तयार होत नाहीत.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
#कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close