प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :- ========================================
केज शहरातील समर्थ नगर, कानडी रोड, वकिलवाडी तसेच बीड रोडकडील शिक्षक काॅलनी परिसरात रोडरोमिंओचा धुमाकूळ चालू आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शिकवणीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी या भागात येत असतात. याच गोष्टींचा फायदा मोकार, टुकार रोडरोमिंओ घेत आहेत. व मुलींची छेड काढून रस्त्यावर तुफान वेगाने टुव्हिलर पळवणे, हाॅर्नचा क्रकश आवाज करणे हे प्रकार राजरोसपणे होत आहेत. कुणी हाटकले तर टुकार गॅंग गोळा करून त्या व्यक्तीलाच दाबदडप व मारहाण सुद्धा करण्यात येत आहे. आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या कारणास्तव पालक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत नाहीयेत. तरी केज पोलीसांनी या रोडरोमिंओ वरती कडक कारवाई करून या टुकारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच केज शहरातील पाटबंधारे कार्यालय हे शहरातील मोकाट तरूणाचा अड्डा बनला असून यावर कोणाचाही अंकूश राहीलेला नाही.पाटबंधारे कार्यालयाच्या मैदानात मद्य सेवन करणे, अर्वाच्च भाषेत बोलणे, मोबाईल अश्लील गाणे वाजवून नाचणे हे प्रकार राजरोसपणे चालू आहेत.
पाटबंधारे कार्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्ता हा शुक्रवारचा बाजार व विविध शैक्षणिक संस्था क्लासेस कडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असून या रस्त्यावर फारशी घरे नाहीत या रस्त्यावर महिला व मुलींची जास्त वर्दळ असते पाटबंधारे कार्यालयामध्ये पत्र्याचे शेड असून यामध्ये हे रोडरोमिओ रात्री बारा वाजेपर्यंत धिंगाणा घालत असतात.पाटबंधारे कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर बसून हे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिला व मुलींची छेडछाड करत असतात. याबाबत सदर कार्यालयाच्या कर्मचारी अथवा नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना धमकावले जाते. अशा घटनेबाबत सदरील कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजते. अशा घटनांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकाला, महिलांना खूप त्रास होत असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

