shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्लंडविरूध्द पहिल्या कसोटीत पावसाने भारताला विजयाची संधी नाकारली..!!

भारताच्या पूर्णपणे कक्षेत आलेला विजय वरूण राजाच्या अवकृपेने जलार्पित झाला. इंग्लंडमधील नॉटींगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना चौथ्या दिवसाचा खेळ सोडल्यास पूर्णपणे पाऊस, खराब वातावरण व अपुरा सुर्यप्रकाश यांच्या स्वाधीन गेला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी तब्बल ९८ षटकात केवळ १५७ धावांची गरज होती तर भारताचे ९ फलंदाज बाद होणे बाकी होते. मात्र वरूणराजाने दिवसभर मैदानावर आपले साम्राज्य राखले व भारताला विजयाची संधीच नाकारली ! त्यामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपला.

                          


भारताने या सामन्यात चार जलदगती गोलंदाज खेळवून वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपच्या अंतिम सामन्यात केलेली चुक सुधारली. या चालीचा फायदाही भारताला मिळाला. भारताच्या चारही वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडचे सर्वच्या सर्व वीस गडी बाद केले व इंग्लंडला त्यांनीच खोदलेल्या खड्डयात ढकलले. या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडला प्रत्येक कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टयांवर खेळावे लागले. इंग्लिश फलंदाजांचे फिरकी खेळण्याचे कसब कमकुवत असल्याने त्यांना ३-१ अशी मालिका गमवावी लागली होती व पर्यायाने त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची संधी दवडावी लागली.

                           

हा राग डोक्यात धरून व भारतीय फलंदाजांची उसळत्या खेळपट्टीवर खेळण्यात होणारी अडचण लक्षात घेता इंग्लिश क्रिकेट बोर्डाने हिरवीगार खेळपट्टी " ग्रीन टॉप '' पहिल्या सामन्याला दिली.  परंतु इंग्लंडचा हा डाव त्यांच्यावरच बुमरँग झाला. भारताच्या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव पहिल्याच दिवशी केवळ १८३ धावात गुंडाळून इंग्लंडलाच पेचात पाडले.

                          

भारताचा पहिला डावही चांगल्या सुरुवाती नंतर गडगडला परंतु सलामीवीर लोकेश राहुल व रविंद्र जडेजा सह तळाकडच्या मुळच्या गोलंदाज असलेल्या फलंदाजांनी १०८ धावा जोडून भारताला इंग्लंडवर ९५ धावांचा अनपेक्षित पुढावा मिळवून दिला.

                         

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला कर्णधार ज्यो रूटच्या शतकी खेळीमुळे बाळसं आलं खरं पण भारतापुढे केवळ २०९ धावांचं लक्ष मिळाल्याने इंग्लंडपुढे पराभव "आ " वासून उभा होता. त्यातच भारताने राहुलला गमावून ५२ धावा केल्याने शेवटच्या दिवशी केवळ १५७ धावा बनविण्याचे काम होते. त्यामुळे इंग्लंडवर पराभवाचे तर भारतासमोर पावसाचे ढग उभे होते. शेवटी पावसाच्या ढगांनीच इंग्लंडचा शाश्वत पराभव वाचवला व भारताचा नक्की असलेला विजय नाकारला.

                       

मयंक अग्रवालच्या दुखापतीमुळे लोकेश राहुल दोन वर्षानंतर संघात परतला, या संधीचे त्याने दोन्ही हाताने स्वागत केले व भारताला निश्चिन्त केले. तर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनल मधील अपयश जसप्रित बुमराहाने पुसून टाकले. सामन्यातील त्याचे नऊ बळी भारतासाठी विजयाचे दार उघडून गेले होते. तर नवख्या शार्दूल ठाकूरने दोन्ही डावात २-२ बळी घेऊन प्रत्येक वेळी इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडून सामन्याला कलाटणी दिली.

                        

मोहम्मद शमी चांगला मारा करूनही अपेक्षित बळी मिळविण्यात कमनशिबी ठरला. तर सिराजलाही जास्त बळी मिळाले नसले तरी त्याने इंग्लिश फलंदाजांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य राहाणे व चेतेश्वर पुजाराचे अपयश होय. या तिघांनाही तातडीने आपला खेळ उंचवावा लागणार आहे. 

                        

भारतासारखेच इंग्लंडलाही फलंदाजांचे अपयश सतावत असून कर्णधार ज्यो रूट शिवाय इतर फलंदाजाच्या खेळात नसलेले सातत्य त्यांच्या पिछेहाटीचे कारण बनू शकेल. या गहण प्रश्नावर त्यांनी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे कारण दरवेळेस पाऊस मदतीला येईल याची कोणतीही हमी नाही. कारण मालिका पाच कसोटींची आहे.

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close