shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🚩 राधेय अर्थात कर्ण 🚩 युद्ध आणि कर्णाचा मृत्यू..!


मध्याहृकाळचा सूर्य आकाशात तळपत असता रणभूमीवर शंखनाद उठला. जयभेरी वाजू लागल्या. आनंदाने भानरहित झालेल्या पांडव वीरश्रेष्ठांच्या शंखनादांनी आकाश व्यापून गेले. कौरवसेना भयचकित मुद्रेने पांडवसेनेचा आनंद पाहत होती. 

युद्धाचे भान कुणालाच राहिले नव्हते. पांडवां कडील बाजूने अचानक उठलेले शंखनाद, रणभेरी ऐकून दुर्योधनाचा रथ थांबला. दक्षिण-दिशेला ते नाद प्रकर्षाने उठत होते. भीतिग्रस्त अंत:करणाने दुर्योधनाने तिकडे रथ वळविण्याची आज्ञा केली.
रथ वेगाने जात होता. पराजयाच्या भीतीने कौरवसेना धावत सुटली होती. दुर्योधन सुन्न होऊन ते रणभूमीचे परिवर्तन पाहत असता त्याचे लक्ष स्थिरावले. शल्यराज दोन अश्व धरून येत होता. कर्णरथाचे ते अश्व पाहताच दुर्योधनाचा धीर सुटला. त्याने विचारले,

‘शल्यराज! अजिंक्य कर्णाचे घोडे घेऊन कुठं निघालात? कर्णरथ कुठं आहे?’ शल्यराजाचे डोळे भरून आले.

‘दुर्योधना, धीर धर!’ दक्षिण दिशेला हात दाखवीत तो म्हणाला, ‘पराजिताला दिशा एकच! तुझ्या मित्राला अर्जुनानं गाठलं.’

पुढे ऐकण्याची दुर्योधनाला शक्ती राहिली नाही. त्याने सारथ्याच्या हातचे वेग खेचून घेतले आणि रथ पूर्ण वेगाने दक्षिणेकडे जाऊ लागला. ज्या ठिकाणी कर्णरथ दिसला, तेथे दुर्योधनाचा रथ येऊन थांबला. जेथे कर्ण उभा असायला हवा होता, ती रथामधली जागा मोकळी होती. सदैव विजयाने तळपणारा, साखळदंड चिह्न असलेला रथध्वज त्या रथावर दिसत नव्हता. अश्वहीन, एकाकी पडलेला रथ पाहून दुर्योधनाच्या मनाचे बांध फुटले. डोळ्यांतून अश्र् ओघळणाऱ्या दुर्योधनाने रथाखाली उडी घेतली आणि त्या रणरणत्या उन्हात तो कर्णरथाकडे धावला.

रथाजवळ जाताच दुर्योधनाची पावले मंदावली. कर्णाचा गौर देह पालथा पडला होता. कर्पुरगौर रुंद पाठीवर एकही जखमेचे चिन्ह दिसत नव्हते. गाढ निद्रेत गेल्यासारखा कर्ण अचल झोपी गेला होता. मस्तकीचे शिरस्त्राण पडल्याने त्याचे काळेभोर केस मानेभोवती विखुरलेले होते. दुर्योधन सावकाश जवळ गेला. अश्रु आवरण्याचा प्रयत्न करीत त्याने रथाखाली पडलेल्या कर्णाचे दोन्ही खांदे पकडले. कर्णाला त्याने रथाबाहेर ओढले. कर्णाला उताणे करताच त्याच्या मुखातून दुःखोद्गार निघाला. कर्णाच्या मानेतून आरपार गेलेल्या बाणावर त्याचे डोळे जडले होते. आपल्या शेल्याने कर्णाचे मुख स्वच्छ करीत असता तो कर्णाला पाहत होता. असामान्य दीप्तिमान रूप लाभलेला तो कर्ण पाहून दुर्योधनाचा संयम सुटला.

‘कर्णा! तू गेलास! या मित्राला सोडून! काय केलंस हे? मित्रा, तुझ्याविना हा दुर्योधन पोरका झाला, रे! अंगराजा, तुझ्या बळावर मी कुरुक्षेत्रावर रणांगण उभारलं. तूच मला विजयाची ग्वाही दिली होतीस ना? मग, मृत्युंजया, दिल्या वचनाची आठवण विसरून कुठं गेलास? तुझ्याविना मी पराजित झालो, रे! शत्रूच्या नावाच्या उच्चारानं देखील तुझ्या अंगाचा दाह होत होता. मग आज तुझ्या पतनाचा विजयोत्सव साजरा करणारे पांडव तुला दिसत नाहीत का?’

कर्णाचे मिटलेले विशाल नेत्र कमलदल उमलावे, तसे उघडले. ते पाहून दुर्योधनाच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला. गडबडीने हळुवार हातांनी त्याने कर्णाचे मस्तक मांडीवर घेतले. आवंढा गिळत तो म्हणाला,
‘मित्रा, तू जिवंत आहेस? तू आहेसऽऽ!’

अश्रुंनी भरलेल्या नेत्रकडांवर उमटलेला आनंद पाहून कर्णाच्या ओठांवर स्मित उमटले. तो कष्टाने म्हणाला, ‘मित्रा, तू आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. तुला भेटल्याखेरीज मी जाईन कसा?’

दुर्योधनाचे अश्रु गालांवरून ओघळले.
‘अंगराज! मी हरलो! पराजित झालो. तुझ्या पतनानं माझं सारं यश हिरावून नेलं.’

कर्णाला बोलताना जड जातंय, हे पाहून दुर्योधनाने हळुवार हाताने गळ्यात रुतलेल्या बाणाला स्पर्श केला. एक वेदना कर्णाच्या मुखावर उठली. तो म्हणाला, ‘नको, युवराज!  तो तसाच राहू दे. मला बोलायचं आहे.’

कर्णाने श्वास घेतला. 
दुर्योधनाच्या काव-याबावच्या नेत्रांना डोळे भिडवीत कर्ण बोलू लागला.

‘दुर्योधना, या रणभेरी, शंखनाद होतो ना, तो त्यांच्या विजयाचा नाही. तो आपल्या विजयाचा आहे.’

‘सर्वनाशी हा कसला विजय?’

‘हाच खरा विजय! मित्रा! वृद्धापकाळी, शय्येवर, कुठल्यातरी असाध्य रोगांशी झगडत या नश्वर जगाचा निरोप घेणं म्हणजे का कृतार्थ जीवन! रणांगणावरची वीरशय्या हेच खरं सफल जीवन. ते आपण मिळवलंय्. आपल्या विजयाला...’

‘अंगराज!’ 

‘मित्रा, असा व्यथित होऊ नकोस. तुला लौकिक विजयच हवा का? तोही आता दूर नाही.’

‘कर्णा, गेल्या सतरा दिवसांत भीष्माचार्य, द्रोणाचार्या सारखे असंख्य योद्धे मी गमावले. माझ्या उरलेल्या सैन्याचं बळ तुझ्या पतना बरोबरच ढासळलं. ते सैरावैरा वाट फुटेल तिकडं धावत सुटलंय्. आता विजय कुठला?’

‘नाही, दुर्योधना! असा भयव्याकुळ होऊ नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. तुला हाच विजय हवा असेल, तर...’

‘तर काय?

‘माझ्या नंतर शल्याऐवजी अश्वत्थाम्याला सेनापती कर. तोच तुला हा विजय प्राप्त करून देईल.’

‘जे भीष्म-द्रोण-कर्णाला जमलं नाही, ते तो अश्वत्थामा काय करणार?’

‘लक्ष देऊन ऐक. सेनापतीच्या ठायी निष्ठा असावी लागते. राजाच्या कल्याणाची चिंता असावी लागते. तू मोठा दुर्दैवी आहेस. तुझ्याशी निष्ठा बाळगणारा सेनानी तुला मिळाला नाही. भीष्म, द्रोण दोघांचीही मनं पांडवप्रीतीनं, त्यांच्या कल्याणानं भरलेली. त्यांच्या संहाराला रिपुसंहाराची धार कोठून येणार?’

‘कर्णा, पण तू तरी...’

‘नाही! दुर्योधना, मीही त्यांतलाच. त्या निष्ठेत माझ्याकडूनही कमतरताच पडली. केव्हा ना केव्हा तरी तुला ते समजेल. तो शल्यराज पांडवांचा आप्त. त्याच्या हाती सूत्रं न देता अश्वत्थाम्याला युद्धाचा सेनापती कर. विजय तुलाच मिळेल.’

‘नाही, अंगराज, ते होणार नाही. मी शल्यराजाला वचनबद्ध आहे. एक वेळ मी पराजय स्वीकारीन; पण वचनभंग अशक्य!’

‘दुर्योधना, हे मी जाणलं होतंच. धर्माची भावना आम्हांला कधी सोडता आली
नाही अन् शत्रूनं ती कधी पाळली नाही.’

कर्णाची मूठ मिटली गेली.  दुर्योधनाकडे पाहत तो म्हणाला, ‘युवराज! तुसा डोळ्यांतले अश्रु पाहत मृत्यू येतो, यापरतं दुसरे भाग्य नाही.जीवनात माझ्या कुलामुळं मी पुष्कळ अवहेलना सोसली.माझा पराक्रम, माझं दातृत्व, माझं चारित्र्य मला उपयोगी पडलं नाही. जीवनात ताठ भावनेनं जगता आलं, ते फक्त तुझ्या स्नेहामुळं. त्या स्नेहाचा मी सदैव कृतज्ञच राहीन. मित्रा, एक काम करशील?’

कर्णाने थकव्याने डोळे मिटले.

‘सांग, मित्रा, बोल S’

कर्णाने कष्टाने डोळे उघडले. ‘अवधी फार थोडा आहे. तिथं शेला पडला आहे. निळा... तो घेऊन ये अन् मला वीरशय्या प्राप्त करून दे.’

दुर्योधनाने पाहिले.

कर्णापासून ब-याच दूरवर एक निळा शेला वा-यावर हेलकावे घेत होता.

दुर्योधनाने कर्णाचे मस्तक अलगद खाली ठेवले. शेला उचलीत असता त्याने पाहिले. शेला भारी होता. त्यावर सुवर्णधाग्यांचा कशिदा विणला होता.

दुर्योधनाने आणलेला शेला पाहून कर्णाची प्रसन्नता वाढली.

तो शेला दुर्योधनाने पायापासून पांघरीत गळ्यापर्यंत आणला. सारे बळ सारून तो अश्रु ढाळीत कर्णाजवळ गुडघ्यांवर बसला.

‘युवराज, मी तृप्त आहे. माझ्यासाठी अश्रु ढाळू नका.’

कर्णाची दृष्टी आकाशातल्या सूर्याकडे गेली. 

डोळे ताठरले गेले. सारे बळ एकवटून तो म्हणाला, 

‘युवराज! भर मध्याहृकाळी सूर्यास्त होताना कधी तुम्ही पाहिलात का?’

दुर्योधनाने भीतीने आकाशातल्या सूर्याकडे पाहिले. 

सूर्य तळपत होता. त्याची दृष्टी कर्णाकडे वळली. 

कर्णाचे डोळे तसेच उघडे होते. सूर्यबिंबाकडे पाहत.

दुर्योधनाची मान खाली झाली. कर्णाने मिटलेली उजवी मूठ उघडली होती...

दुर्योधनाचे अश्रु त्या हातावरून ओघळत होते. कर्णाच्या उघड्या तळहातावर पडणारे अश्रु जमिनीकडे ओघळत होते. 

-जणू त्या मोकळ्या हाताने कर्ण शेवटचे दान देत होता.

*🙏समाप्त🙏*
close