shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाने बीसीसीआयसह सर्वांनाच हदरवले तर दिल्लीने हैद्राबादला हरविले !



                        तेराव्या आयपीएल सत्राच्या ३३ व्या सामन्यात या मोसमातील दोन टोकाच्या संघात गाठ पडली. गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील दिल्ली कॅपिटल्स व तळाच्या म्हणजे आठव्या क्रमांकावरील सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झालेला सामना सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत त्यांच्यातील फरक दर्शवित होता.

                        
प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादने जेमतेम १३३ धावा फलकावर लावल्या तेंव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. हैद्राबादच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर स्थिरावण्यात स्वारस्य दाखविले नाही. याचा फायदा दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांनी उठविला. खास करून दिल्लीच्या जलदगती गोलंदाजांनी अतिशय तिखट मारा केला तर अक्षर पटेल व रविचंद्रन आश्विननेही किफायतशीर गोलंदाजी केली व हैद्राबादला डोके वर काढण्याची कुठलीही संधी दिली नाही. त्यांना दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनीही चांगली साथ दिली.
                       
हैद्राबादच्या धावा कमी जरी असल्या तरी या पर्वातील पहिल्या तिनही सामन्यात उलटफेर करणारे निकाल लागल्यामुळे या सामन्यासाठी प्रेक्षक त्याच अपेक्षेने बघत होते. दिल्लीचा फॉर्मात असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ झटपट बाद झाल्याने तसं वातावरणही तयार झालं होतं. परंतु सलामीवीर शिखर धवनच्या ४२ धावा व दुखापतीमुळे या तेराव्या आयपीएलचे पहिले पर्व खेळू न शकलेल्या पदच्युत कर्णधार श्रेयस अय्यरने झालेल्या शारिरीक व मानसिक दुखापतीचा कुठलाही परिणाम आपल्या खेळावर होऊ न देता नाबाद ४७ धावांची शानदार खेळी करताना संघाला विजयी करूनच मैदानाबाहेर गेला. अय्यरला दमदार साथ देत कर्णधार रिषभ पंतनेही नाबाद ३५ धावांची खेळी केली. 
                     
हैद्राबादवर आठ गडी राखून विजय मिळवत दिल्लीने चौदा गुणांसह गुणातालिकेत  अव्वल स्थान मिळवित प्ले ऑफ मधील आपले स्थान जवळ जवळ पक्केच केले. तर या पराभावने हैद्राबाद ९ सामन्यात दोन गुणांसह शेवटच्या स्थानावर असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपल्यासारखेच आहे. मात्र त्यांना नियमाप्रमाणे स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळावेच लागतील.
                    
हा सामना सुरू होण्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली. ज्याची सर्वात मोठी भिती होती त्या कोरोनाने या पर्वातही आपली हजेरी लावली.  या वेळी पुन्हा एकदा हैद्राबादलाच कोरोनाने आपल्या विळख्यात घेरले. हैद्राबादचा जलदगती गोलंदाज टि नटराजन कोरोना पॉझिटीव्ह सापडला आणि संपूर्ण यंत्रणेचीच धांदल उडाली. नंतर सुरक्षेचा उपाय म्हणून नटराजनच्या घनिष्ट संपर्कात असलेला अष्टपैलू खेळाडू विजय शंकरसह संघ व्यवस्थापक विजय कुमार, फिजिओ डॉ. श्यामसुंदर, टिम डायरेक्टर अंजना वन्नान, लॉजिस्टिक इनचार्ज तुषार खेडकर व नेट गोलंदाज पेरीयासामी गणेशन यांना आयसोलेट करण्यात आले.
                       
एप्रिल - मे २०२१ कालावधीत आयपीएल नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतात खेळविली जात असताना केकेआर, हैद्राबाद, दिल्ली व  मुंबई संघातील खेळाडू व सपोर्टींग स्टाफमधील काही व्यक्ती कोरोना संक्रमीत आढळल्याने ५ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. नेमके त्याच कालखंडात कोरोनाची दुसरी लाट अतिशय उग्र रूप धारण करून मिळेल त्याला आपल्या जाळ्यात घेत होती. त्या भिती पोटी आयपीएल थांबवावे लागले होते. शिवाय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी टि२० विश्वचषक स्पर्धा भारतातून हलवून युएईत घेण्याचे ठरले.
                      
भारतात बायो बबल लिक झाले होते तसे युएईत होऊ नये म्हणून अतिशय कडक उपाय योजना आखण्यात आल्या होत्या तरीही हैद्राबादच्या गोटात कोरोनाने कसा काय प्रवेश केला ही बाब बीसीसीआयची डोकेदुखी वाढविणारी आहे.
                      
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येणारे काही दिवस बीसीसीआयसाठी अतिशय महत्वाचे ठरणार असून कोरोनाचे रूग्ण जर आणखी वाढले तर हे आयपीएल पर्वही रद्द करावे लागेल. जर असे झाले तर बीसीसीआयला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. शिवाय याचा दुष्परिणाम आयपीएलनंतर लगेच सुरू होणाऱ्या टि२० विश्वचषकावरही होऊ शकतो. आयपीएल रद्द झाली तर याचा मोठा फटका बीसीसीआय बरोबरच स्टार या ब्रॉडकास्टींग कंपनीला, फ्रँचाइजी व इतर स्टेक होल्डर्सलाही बसू शकतो.
                        
त्यामुळे येणारा काळ बीसीसीआय बरोबर आयपीएलशी संबंधीत सर्वांसाठीच महत्वाचा असून प्रत्येकाने सावधगिरी बाळगून कोरोनाशी लढा द्यायचा आहे. ही मोहीम जर यशस्वी झाली तर आयपीएलच काय तर टि २० विश्वचषक स्पर्धाही निर्विघ्न पार पडेल.

 
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close