लॉर्डस कसोटी जिंकल्यानंतर हवेत उडालेल्या भारतीय संघाला हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने उचलून आपटले. त्यानंतर भारतीय संघ भानावर येऊन इंग्लंडवर पलटवार करेल असे सर्वांनी ग्रहीत धरले होते. परंतु ओव्हल येथील चौथ्या कसोटीतही इंग्लिश गोलंदाजांनी पहिल्या डावात ससेहोलपट केल्यानंतर भारतीय संघ पुर्णपणे कोलमडून जाईल असे जगभरातील जवळ जवळ सर्वच क्रिकेट जाणकारांनी भाकित केले होते. परंतु आपला केवळ चौथाच कसोटी सामना खेळणाऱ्या मुंबईच्या धडधाकड शरीरयष्टीच्या शार्दूल ठाकूरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निव्वळ ओव्हलवरीलच नव्हे तर समस्त इंग्लंडमधील आठव्या क्रमाकांच्या फलंदाजाचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट इतिहासातील दिग्गज स्फोटक फलंदाज सर इयान बोथम, कपिलदेव व विरेंद्र सेहवागलाही मागे टाकले. त्याने केलेल्या ५७ धावा सामन्याला कलाटणी देणाऱ्या धावा ठरल्या.
संघातील सर्वच मातब्बर फलंदाजानी हात टेकवल्यानंतर नऊ महिन्यांनी संघात पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवसह ६३ धावांची भागीदारी करून एकवेळ ७ बाद १२७ वर लोंबकळलेला भारताचा डाव १९१ इतक्या लाज वाचविणाऱ्या धावांवर थांबला. इंग्लंडने आपल्या डावात २९० धावा फटकावून भारतावर ९९ धावांचं लिड मिळविलं. मात्र या गडबडीत शार्दूलने गोलंदाजीत केवळ एकच बळी मिळविला. मात्र त्याने मिळविलेला बळी इंग्लंडला आणखी मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवण्यास महत्वाचा ठरला. अन् तो महत्वाचा बळी होता इंग्लंडच्या डावात सर्वाधिक ८१ धावा करून शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ओली पोपचा ! या बळीनंतर इंग्लिश संघ लवकर बाद झाला होता.
पहिल्या डावातील पडझड व इंग्रजांनी मिळविलेल्या आघाडीनंतर भारताचे फलंदाज भानावर आल्यासारखे खेळले. सलामीवीर रोहीत शर्मा व लोकेश राहुलने जोरदार अशी ८३ धावांची सलामी दिली. राहुल मोठी खेळी खेळू शकला नाही. मात्र त्याच्या ४६ धावा संघासाठी महत्वाच्या होत्या.
राहुल नंतर रोहीत शर्माने चेतेश्वर पुजारासह दिडशतकी भागीदारी करत परदेशातील स्वतःचे पहिले कसोटी शतक ठोकले. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराही चांगलाच पेटला. त्याने आपला जुना साचेबद्ध खेळ बाजूला ठेवून धडाकेबाज ६१ धावा कुटल्या. हे दोघेही एकामागोमाग बाद झाल्यानंतर भारताचा डाव अडचणीत आला. कोहली ४४, जडेजा १७, राहाणे शुन्यावर परतल्यानंतर इंग्रज गोलंदाज डोकं वर काढू लागले होते तेंव्हा आठव्या क्रमांकावर येत शार्दूल ठाकूरने परत एका ६० धावांची अर्धशतकी खेळी साकारली. परंतु यावेळी त्याने आक्रमकतेला संयमाची जोड देत देखणे स्ट्रेट ड्राईव्ह मारत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडताना रिषभ पंतसह शतकी भागीदारी करत संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थिती मिळवून दिली. शार्दूल कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासातील केवळ सहावा खेळाडू बनला आहे की त्याने दोन्ही डावात आठव्या क्रमांकावर येत अर्धशतके ठोकली.
तळाचे फलंदाज उमेश यादव व जसप्रित बुमराहानेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत भारताला इंग्लंडवर ३६७ धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लिश सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात करून संघाला आशादायक स्थितीत नेऊन ठेवले. मात्र कर्णधार विराट कोहली शार्दूल ठाकूरला गोलंदाजी देण्याचे विसरला.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी बर्न्स व हमिद यांनी आपला जोर दाखवत सर्वच भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ करत शतकी सलामी दिली. त्यानंतर कर्णधार कोहलीला शार्दूलची आठवण झाली. मात्र ठाकूर आपल्या कर्णधाराला निराश न करता फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही आपला गोल्डन हॅंड दाखवत आपल्या पहिल्याच षटकात अर्धशतक ठोकणाऱ्या सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद केले.
पहिला बळी मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांमध्ये वेगळाच जोश संचारला. मग बुमराहाने पोप व बॅरीअस्टोला झटपट पिटाळून सामना भारताकडे झुकविला. मात्र सध्या तुफान फॉर्मात असलेला इंग्लिश कर्णधार ज्यो रूट या मार्गातला प्रमुख अडसर बनला असताना पुन्हा एकदा शार्दूलने रूटचे मुळ बुडखापासून उखडले व भारताचा विजयी मार्ग सुकर केला.
या सामन्यात संघाच्या संकट समयी ५७ व ६० धावांच्या महत्वपूर्ण खेळ्या व संघाला नितांत गरज असताना पहिल्या डावात १ व दुसऱ्या डावात २ बळी मिळवून दिले. शार्दूलच्या या अष्टपैलू खेळाने प्रभावित होत त्याच्या फॅन्सनी त्याला चक्क " लॉर्ड " उपाधी देवून टाकली.
शार्दूलच्या अशाच झंझावाती कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला ३३ वर्षानंतर ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानावर हार पत्करावी लागली होती. त्या सामन्यात पहिल्या डावात संघ संकटात असताना ६७ धावा काढताना दोन्ही डावात मिळून ३ व ४ असे ७ बळी मिळविले होते. तरी तेंव्हा देखील तो सामनावीर पुरस्कारापासून वंचित राहीला होता. तेंव्हा शेवटच्या क्षणी रिषभ पंत ८९ धावांची खेळी खेळून हिरो व सामनावीर बनला. तशीच गत या सामन्यातही झाली बॅट व बॉलने जोरदार खेळ करूनही एका डावात शतक ठोकणारा रोहीत शर्मा हिरो बनला. मात्र हा सामना शार्दूल ठाकूरचा सामना म्हणून चिरकाल स्मरणात राहील एवढे मात्र नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

