तेराव्या आयपीएल सत्राच्या दुसऱ्या पर्वात अबुधाबी मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्यात आरसीबी केकेआरचा सामनाच करू शकले नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार कोहलीवर चांगलाच उलटला. जेमतेम ९२ धावांत भुईसपाट झालेला आरसीबी २० पूर्ण षटकेही खेळू शकला नाही. कोहलीच्या नेतृत्वात या वर्षात भारत दोनदा कसोटीत तर एकदा आयपीएलमध्ये शंभरीच्या आत बाद झाला असून यात कोहली फलंदाज व कर्णधार म्हणून सफसेल फेल गेलाच पण त्याच्या संघाला तिनही वेळा नामुष्कीजन्य पराभव चाखावे लागले. विशेष म्हणजे हा कोहलीचा दोनशेवा आयपीएल सामना होता.
केकेआरने ९३ धावांचे लक्ष केवळ एका गडयाच्या मोबदल्यात फक्त दहा षटकात पार केले आणि उंच धावगतीसह गुण तालिकेत पाचवे स्थान मिळविले. केकेआरच्या विजयात मौल्यवान कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर एक दृष्टीक्षेप टाकूया.
टि २० विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान मिळालेल्या विस्मयकारी फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीच्या चक्रीवादळात आरसीबीचे नावालेले फलंदाज पालापाचोळ्या सारखे उडून गेले. वरुणने तर क्षेत्ररक्षणातही चपळाई दाखवत एक झेल व एक धावबाद करत आरसीबीच्या शिडातली हवाच काढून घेतली. वरूणचे १३ धावात तीन बळी त्याला सामनावीर पुरस्कार मिळवून देण्यात पुरेसे ठरले. मात्र त्याची हॅट्रीक हुकल्याने सर्वांनाचा चुटपूट लागली.
चक्रवर्ती शिवाय विंडीजचा हरफनमौला खेळाडू आंद्रे रसेलने तीन षटकात अवघ्या नऊ धावात तीन फलंदाज बाद केले. त्यातही विशेष म्हणजे श्रीकर भरत व एबी डिव्हीलर्सला एकाच षटकात बाद करत आरसीबीला जोरदार झटके दिले.केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल व पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरने झकास सलामी देत ८२ धावा ठोकून संघाला दहा गडयांच्या विजयाच्या समीप आणले होते परंतु ३४ चेंडूत ४८ धावा ठोकणाऱ्या शुभमन गिलचा एक साहसी फटका चुकला व त्याचे अर्धशतक व केकेआरचा दहा गड्यांचा विजय हुकला.
आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने २७ चेंडूत नाबाद ४१ धावांची विजय मिळवून देणारी खेळी करत सर्वांना प्रभावीत केले. त्याचे आक्रमक रूप आरसीबीच्या गोलंदाजांवर भारी पडले.मिळालेल्या संधीचा अचूक फायदा उठवित न्यूझिलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने तुफानी मारा करताना चार षटकात २४ धावा देत दोन महत्वाचे फलंदाज डग आऊटमध्ये पाठवून केकेआरला मजबूती मिळवून दिली.
आठ सामन्यात केवळ ३ विजयांसह ६ गुण मिळविणाऱ्या केकेआरच्या या विजयामुळे प्लेऑफच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र त्यांना या सामन्यात केला असाच किंबहुना यापेक्षा सरस कामगिरी करावी लागेल. तर आससीबी ९ सामन्यात १० गुण मिळवित तिसऱ्या स्थानी असले तरी सध्या त्यांचा कर्णधार विराट कोहली काहीशा दडपणाखाली असल्याने नेतृत्वाबरोबरच फलंदाजीतही त्याच्याकडून लक्षणीय कामगिरी होत नसल्याने आरसीबी विषयी चिंता वाटते. त्यांच्याकडे एबी डिव्हिलर्स, ग्लेन मॅक्सवेलसारखे मातब्बर खेळाडू असूनही त्यांच्या कामगिरीत नसलेले सातत्य त्यांच्यासाठी काळजी वाढविणारी बाब आहे. आरसीबीने वेळीच स्वतःला सावरले नाही तर त्यांना गुण तालिकेतून खाली सरकावे लागेल म्हणजे विजेतेपद मिळविण्याच्या त्यांच्या आशा विरळ होऊ शकतात.
एक गोष्ट मात्र खरी वाटते, ती म्हणजे कर्णधार म्हणून विराट कोहलीचे स्वारस्य कमी झाल्यासारखे दिसते. शिवाय फलंदाजीत तो तांत्रीक चुका करतो की प्रतिपक्ष त्याच्या फलंदाजीचा भक्कम गृहपाठ करून येतो ? हेही न समजण्या पलिकडचे होऊन बसले आहे. कोहलीला त्याच्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नाहीतर कर्णधार म्हणून शेवट गोड होण्याऐवजी विपरीत होऊ शकतो. त्यासाठी कोहलीने या आयपीएल नंतर कर्णधार पद सोडण्याची केलेली घोषणा लागलीच अंमलात आणली तर नवा कर्णधार यंदाच्या सत्रात आयपीएलला विजेते बनवू शकेल. अजून वेळ गेलेली नाही. मात्र कोहलीने झटपट निर्णय घेण्याची गरज आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

