आयपीएलच्या तेराव्याच्या सत्राच्या दुसऱ्या स्पर्धेत शारजा येथे एकंदर साठ सामन्यांपैकी ३५ वा सामना चेन्नई सुपर सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात खेळला गेला. शारजात वाळूच्या वादळामुळे उशीरा सुरू झालेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कलसह सलामीला आलेल्या कोहलीने झंझावाती शतकी सलामी देताना १३.४ षटकात १११ धावांची भागीदारी नोंदविली. बऱ्याच दिवसानंतर कोहली फलंदाजीच्या खास मुडमध्ये दिसला. ४० चेंडूत ५३ धावा केल्यानंतर कोहली बाद झाला. कोहली खेळत होता तो पर्यंत चेन्नई दोनशेच्या घरात जाईल असे वाटत होते. मात्र कोहलीचे बाद होताच चेन्नईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या डावाला लगाम घातला.
शार्दूल ठाकूरची करिश्माई गोलंदाजी या सामन्यातही जादू दाखवून गेली. शार्दूलने एबी डिव्हीलर्स ११ व ७० धावांची शानदार खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला एकाच षटकात बाद करून आरसीबीला संकटात ढकलले. अखेर आरसीबीला वीस षटकात जेमतेम १५६ धावांवरच समाधान मानावे लागले. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने दोन तर ड्वेन ब्राव्होने ३ फलंदाज डग आऊटमध्ये पाठविले.
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या १५७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सीएसकेचे सलामीवीर फाफ ड्यू फ्लेसिस व ऋतूराज गायकवाडने ८.२ षटकात झंझावाती ७१ धावा जोडून सीएसकेच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर हे दोन्ही सलामीवीर झटपट परतल्याने चेन्नईच्या गोटात खळबळ उडाली. त्यानंतर मोईन अली २३ व अंबाती रायडू ३२ यांनी जोरदार खेळ करत विजयी लक्ष जवळ आणले. मात्र ते दोघेही लगोलग बाद झाले. मात्र सुरेश रैना १७ व कर्णधार धोनी ११ यांनी नाबाद राहात संघाला सहा गडयांचा मोठा विजय मिळवून देत. उत्कृष्ठ सरासरीसह दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या स्थानावर ढकलले व स्वतः गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान गाठले. चेन्नईचे प्ले ऑफ फेरीत पोहोचण्याचे यामुळे जवळजवळ नक्की झाले आहे.
आरसीबीचा मागील पाच सामन्यात हा तिसरा पराभव असून सध्या ते दहा गुणांसह चौथ्या स्थानावर असले तरी त्यांची सध्याची कामगिरी बघता त्यांचे प्ले ऑफ मध्ये पोहोचणे जरा अवघड दिसत आहे. आरसीबीची फलंदाजी केकेआर विरूध्द साफ कोलमडली होती तर चेन्नईविरूध्द शतकी सलामीनंतर दिडशेत अडकली. शिवाय त्यांचे गोलंदाजही निष्प्रभ ठरत असताना केकेआर विरूध्द नऊ तर चेन्नईविरुद्ध सहा गडयांनी पराभव पत्करावा लागला.
कर्णधार विराट कोहली या आयपीएल सत्रानंतर आरसीबीचे नेतृत्व सोडणार आहे. परंतु कोहलीने या सामन्यातील त्याचा खेळ वगळता फलंदाजीत विशेष कामगिरी केली नाही. शिवाय त्याचे नेतृत्वही फिके ठरत आहे. सध्या या सत्रातील बराचसा खेळ बाकी असून कोहलीने तातडीने नेतृत्व सोडल्यास त्याचा लाभ आरसीबीला होऊ होईल. शिवाय कोहली स्वतःची इज्जतही राखू शकतो.
तिच गत कोहलीची भारतीय संघाच्या नेतृत्वाबाबत असून या आयपीएल सत्रानंतर लगेच होणाऱ्या टि-२० विश्वचषकानंतर कोहली भारताच्या टि२० संघाचेही नेतृत्व सोडणार आहे. सध्याचा कोहलीचा फलंदाजीतील अनिश्चित फॉर्म, भारतीय खेळाडूंमध्ये त्याची खराब झालेली प्रतिमा, सफेद चेंडूच्या खेळातील निष्प्रभ ठरत चाललेले नेतृत्व व आयसीसी स्पर्धात सातत्याने मिळणारे अपयश बघता कोहलीने टि२० वर्ल्ड कपनंतर नेतृत्व न सोडता विश्वचषकापूर्वीच सोडले तर संघाच्या मनोबलासाठी ते फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कोहलीला स्वत: बरोबरच देशाचा गौरव राखून नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात भारताला याच वर्षी वर्ल्ड कप जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात खरा दिलदारपणा ठरेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

