श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र रस्ते खराब झाले आहेत, मात्र त्यावर किमान मुरुम टाकून तरी रस्त्याची तात्पूर्ती डागडुजी करुन नागरीकांच्या ज्वलंत समस्या दुर करण्याची कामे नगर पालिका प्रशासनची असते,मात्र श्रीरामपूर शहरात सध्या रस्त्याची गत एखाद्या लावारीस सारखी झाली आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यावर पावसामुळे कमालीचे खड्डे पडले असून यातून मार्ग क्रमण करताना नागरीकांच्या नाकी नऊ येत आहे,मात्र शहरवासियांच्या या गंभीर समस्येप्रकरणी ना खासदार पुढे येतो, ना आमदार पूढे येतो,जे नगरसेवक होते तेही सध्या अद्रृष्य झाले आहेत,मग श्रीरामपूरच्या नागरी समस्या खरोखरच राम भरोसे झाल्या की काय याचा प्रत्येक्ष अनुभव सध्या श्रीरामपूरकरांना अनुभवयास मिळत आहे,गत ४ वर्ष आपले कृष्णवर्णिय मुखदर्शन काही नगर सेवकांनी आपल्या वार्डाला दिलेले नाही.
किमान समोर पालिकेची निवडणूक उभी ठाकली असल्याने आता तरी आपल्या लाडक्या नगरसेवक भाऊचे (भाऊ म्हणजे समजतायना वाचकांनो) बंधूचे मुखदर्शन घडतील आणी आपली समस्या ऐकून घेतली जाईल या प्रतिक्षेत शहरवासी आहेत. किमान शेवटच्या वर्षी तरी त्यांच्या अपेक्षा पुर्ण होणार का ?, हा प्रश्न मात्र सध्या अजूनही अनुत्तरीतच आहे.

