तेराव्या आयपीएल सत्राचे दुसरे पर्व आता रंगात आले असून पहिल्या आठवडयात प्रत्येक संघ किमान सामने आपसात खेळले आहेत. त्यानंतर गुणतालिकेतही बरीच मोठी उलथापालथ झाला असून दिल्लीने सोळा गुणांसह अव्वल स्थानावर हक्क सांगितला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या दुसऱ्या स्थानावर असून या दोन संघातच शेवटपर्यंत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. रॉयल चँलेजर्स बंगलोरचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर असला तरी मागील काही सामन्यात त्यांचे झालेले पराभव, कामगिरीत नसलेले सातत्य यामुळे हा संघ अंतिम संघात राहीलच याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. तर गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला युएई मानवल्यासारखे दिसत नाही. मागच्या वर्षी याच युएईत आपले विक्रमी पाचवे व सलग दुसरे विजेतेपद मिळविणारा मुंबई संघ चौथ्या स्थानावरून घसरून सहाव्या क्रमांकावर आल्याने मुंबईला उर्वरित पाच सामन्यात जीवाची बाजी लावून खेळ करावा लागेल. परंतु आजपर्यंत जी फलंदाजी त्यांचा हुकमी एक्का सिध्द व्हायची तीच फलंदाजी प्रत्यक्ष सामन्यात चालेनाशी झाल्याने मुंबईच्या संकटात भर पडली आहे.
हे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वी शाहरूख खानचा कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष असे कोणी गांभीर्याने बघत नव्हते. मात्र युएईत आल्यावर त्यांच्या संघात एक चमत्कारीक बदल झाला. अनेक गणमान्य सलामीवीर वापरून थकलेल्या केकेआरला कर सल्लागार म्हणून सेवेत असलेला व्यंकटेश अय्यर हा तरणाबांड पोरगा सलामीवीर म्हणून संघात आला व केकेआरचे नशिबच पालटले. व्यंकी नावाने आपल्या मित्र परिवारात परिचीत असलेला अय्यरने आरसीबीविरूध्द २७ चेंडूत नाबाद ४२ तर मुंबई इंडियन्सविरूध्द झंझावाती अर्धशतकी खेळी साकारून केेकेआरला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. तर मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीने दोनही सामन्यात करिश्माई गोलंदाजी करताना केकेआरसाठी स्वप्नांचा दरवाजा उघडून दिला. या कामी त्याला सुनिल नारायण या दुसऱ्या फिरकीपटूची मोलाची साथ मिळाली. तर लॉकी फर्ग्युसन व प्रसिद्ध कृष्णाने उत्कृष्ठ जलदगती मारा करत मुंबई व बंगलोरच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवले.
राजस्थान रॉयल्य, पंजाब किंग्ज व सनरायझर्स हैद्राबाद संघ अस्थिर, अनिश्चित व अनियंत्रित कामगिरीमुळे सध्या तरी प्लेऑफच्या फेरीसाठी स्पर्धेत नसल्यासारखेच भासत आहे. युएईत आल्यानंतरही या तीन संघाना आपल्या कामगिरीत विशेष सुधारणा न करता आल्याने त्यांना पराभवाचे विजयात रूपांतर करणे मुश्किल झाले आहे.
सन रायझर्स हैद्राबादचंच बघा, युएईत येण्यापूर्वी तळाला आठव्या क्रंमावर होते ते आजही तेथेचे आहेत व या चालू सत्रात तरी ते तेथेच राहाण्याची शक्यता आहे. या हैद्राबाद संघाची फलंदाजी इतकी कमजोर आहे की, सव्वाशे धावांचं लक्ष देखील हा संघ पार करू शकत नाही.
अशीच गत राजस्थान रॉयल्स संघाची आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, शेवटी ख्रिस मॉरीस हा यंदाचा सर्वात महागडा खेळाडू संघात नसल्याने त्यांची अवस्था बिकट बनली. पंजाब विरूध्द निर्णायक टप्प्यात कार्तिक त्यागी या नवोदित जलदगती गोलंदाजाने शेवटचं षटक अफलातून मारा केला त्यामुळे राजस्थान दोन धावांनी जिंकले तर दिल्ली विरूध्द जिंकलेला सामना फलंदाजांच्या हाराकिरीने गमावला.
पंजाब किंग्ज संघाने आपले पूर्वीचे नाव " किंग्ज इलेव्हन पंजाब " हे बदलले खरे. पण त्यामुळे त्यांचे भाग्य, खेळ व इतर संकटं कमी झालेच नाही. उलट जिंकत आलेले सोपे सामने कसे हरायचे याचे जिवंत प्रात्यक्षिक शिकवण्याचे त्यांचे काम जोमात चालू असल्यासारखे वाटत आहे. राजस्थान विरूध्द सहा चेंडूत चार धावा हव्या होत्या व ८ फलंदाज हातात होते. शिवाय एडन मार्करम व निकोलस पुरन हे नामांकित फलंदाज फलंदाजी करत असताना कार्तिक त्यागी सारख्या नवोदित गोलंदाजाने यातील पुरनला बाद केले व मार्करमला डांबून ठेवले. कितीही चांगला खेळाडू असला तर पंजाबच्या गोटात गेल्यावर अपंग झाल्यासारखा का वागतो ? हे न समजण्या पलिकडचे झाले आहे. भविष्यात यावर तोडगा निघाला नाही तर त्याच तिकीटावर तोच खेळ कायमच सुरू राहील.
या स्पर्धेतील प्रत्येक संघांचे जवळ जवळ पाच सामने बाकी असून अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे असल्याने बरेच काही स्थित्यंतरे घडू शकतात. मात्र या सर्व पडझडीत मुंबई इंडियन्सला दुर्लक्षित करून चालणार नाही.
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विक्रमी पाच विजेतेपद मिळविले असून यातील पहिले चार विजेतेपदं पिछाडीवर असताना मुसंडी मारून पटकविले आहेत. त्यामुळे आता जरी हा संघ सहाव्या स्थानावर दिसत असला तरी कोणत्याही क्षणी तो गियर बदलण्याची क्षमता बाळगूण आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचे जसे जगभर चाहते आहेत तसेच इतर सहभागी फ्रँचाईजी पेक्षा काकणभर जास्त फॅन्स मुंबई इंडियन्सचेच आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com


