प्रतिनिधी : रफीक शेख
पारनेर : २३ / करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर प्रशासनही हातबल झालेले असताना आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे लोकसभागातून सुरू केलेले १ हजार १०० बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर देशातच नव्हे तर जगात कौतुकाचा विषय ठरले. रूग्णसंख्या घटू लागल्यानंतर राज्यासह देशभरातील कोव्हिड सेंटर कधीच बंद झालेले असताना आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणीचे हे आरोग्य मंदीर आजूनही सुरूच आहे. सध्या तेथे ८३ रूग्ण उपचार घेत अतापर्यंत २३ हजार ७३८ रूग्णांनी तेथे उपचार घेऊन करोवर मात केली आहे. रूग्णांमधील करोनाची भिती दुर करण्यासाठी आ. नीलेश लंके यांनी रूग्णांना आधार दिल्याने या कोव्हिड सेंटरमध्ये एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही हे देखील विशेष ! किंबहूना रुग्णाच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी आ. लंके यांनी तेथेच मुक्काम ठोकून केलेले समुपदेशन हेच या आरोग्य मंदिराच्या यशाचे गमक म्हणावे लागेल !
करोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर आ. लंके यांनी पहिल्या लाटेमध्ये कर्जुल हर्या येथे एक हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करून तेथे ४ हजार ७६८ रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर दुसऱ्या लाटेने घातलेल्या थैमानामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. इतक्या मोठया संख्येने रूग्णांची सोय कशी करणार असा प्रशासनापुढेही प्रश्न होती. जिल्हयापुरता विचार केला तर विविध साखर कारखानदारांकडे पायाभुत सुविधा असतानाही सुरूवातीच्या काळात करोनाच्या भितीने कोव्हिड सेंटर सुरू करण्यास कोणीही पुढे आले नाही. आ. नीलेश लंके यांच्यापुढे प्रशासनाने लोकसहभागातून कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठबळावर त्यास तात्काळ होकार दिला. दररोज एक हजार रूग्णांना उपचारासह जेवण, नास्ता तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे मोठे आव्हान होते. तरीही न डगमगता आ. लंके यांनी भाळवणी येथे आरोग्य मंदीर सुरू करण्याचा शब्द दिला. दोनच दिवसांत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या सेंटरचा शुभारंभही करण्यात आला. दररोजच्या लाखो रूपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी आ. लंके यांच्या सहकायांनी उर्त्फुतपणे यथाशक्ती देणग्या जमा केल्या व हे काम मोठया जोमाने सुरू झाले. आ. लंके समर्थक १५० कार्यकर्त्यांनी तेथे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला. भाळवणी येथील भुजबळ कुटूंबियांनी त्यांचे प्रशस्त मंगल कार्यालय कोव्हीड सेंटरसाठी मोफत उपलब्ध करून दिले. शिवाय या कुटूंबातील सदस्य आजही तेथील रूग्णांची सेवा करीत आहेत.
करोनाने सर्वत्र हाहाकार माजविलेला असताना सामान्य घरातून आलेल्या, जवळ कोणतेही साधन संपत्ती नसताना एक आमदार केवळ कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तब्बल १ हजार १०० रूग्णांसाठी सर्वसोयींनी कोव्हिड सेंटर सुरू करतो याची चर्चा जिल्हयासह राज्यभर सुरू झाली. माध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून लंके यांचे हे काम देशाबरोबरच जगभर पोहचले. त्यानंतर मात्र या सेेंटरसाठी देशासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. स्थानिक नागरीकांना धान्य, फळे, किराणा वस्तूंची मदत केली. मदतीचा हा ओघ सुरूच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले. सेंटरसाठी मदत हवी असेल तर हक्काने सांगा असे निरोपही प्रत्येकाकडून देण्यात आले. शरद पवार यांनी रूग्णांसाठी अद्यावत रूग्णवाहीकाही भेट दिली. उत्तरप्रदेश सरकारनेरही या सेंटरमधील सुविधांची दखल घेतली. तेथील मुख्य सचिवांनी थेट आ. लंके यांच्याशी संपर्क साधून कशा पध्दतीने सुविधा पुरविल्या जातात याची माहीती घेतली. राष्ट्रवादी पक्षाबरोबरच सर्वपक्षीय नेते मंडळींनी भाळवणीस भेट देत आ. लंके यांच्या कामाची पाहणी करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
शरद पवार आरोग्य मंदीरात दाखल झालेल्या प्रत्येक रूग्णावर प्रशासनाने घालून दिलेल्या पध्दतीप्रमाणे उपचार करण्यात आलेच शिवाय नॅचरोपॅथीचाही वापर करून रूग्णांवर उपचार करण्यात आले. रूग्णांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांच्या मनातील करोनाची भीती दुर करण्याचे महत्वाचे काम स्वतः आ. लंके यांनी केले. या सेंटरमध्ये एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही त्या यशाचे हेच प्रमुख्य गमक म्हणावे लागेल. रूग्णांसाठी दररोज सकाळी योगासने, मानसिक तसेच शारीरीक दृष्टया सक्षम करण्यासाठी व्यायाम करून घेण्यात येतो. सकाळी दुध आंडी, सुक्यामेव्यासह नास्ता, दोन्ही वेळेला सकस व पोष्टीक भोजन देण्यात येते. मांसाहार करणारांना दोन्ही जेवणात मांसाहारी जेवण देण्यात येउन रूग्णाला लवकरात लवकर करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेे जातात.
रूग्णांच्या मनोरंजनासाठी भजन, किर्तन, प्रवचन, भारूड, ऑके्रस्ट्रा अशा कार्यक्रमांचे दररोज आयोजन करण्यात येते. दाखल झाल्यापासून रूग्णाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात असल्यामुळे तेथून बरा होउन परतणारा रूग्ण हासतमुखाने घरी जातो यातच आम्हाला समाधान असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
राज्यभरातील रुग्णांनी घेतला लाभ !
केवळ मतदार संघातील रुग्ण नव्हे तर तेथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोणत्याही अटीशीवाय उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्यात आले.
स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष ।
१ हजार १०० रूग्णसंख्येमुळे दररोेजच्या कचऱ्याची योग्य विल्हेेवाट लावण्याची जबाबदारीही आ. लंके यांच्या कार्यकर्त्यांनी चोखपणे बजावली. औषधोपचारानंतरच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून संसर्ग होऊ नये याचीही काळजी घेतली गेली. दररोज सकाळी व संध्याकाळी आ. लंके यांचेे कार्यकर्ते आरोग्य मंदीराची सफाई करतात. शौचालयांचीही सफाई करण्यासाठीही त्यांनी कधीच संकोच बाळगला नाही, हे देखील विशेष ।
रुग्णांच्या सेवेचा आनंद
सकाळी आठ वाजताच फोन वाजला व पलीकडून आवाज आला अजित पवार बोलतोय ! शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे कौतुक करून पवार यांनी 'काळजी घे रे नीलेश' असा अधिकारवाणीचा सल्ल्ला दिला. रूग्णांची सेवा करतोय यात आनंद आहे मात्र सामाजिक अंतर, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायजर आदींच्या वापराकडे दुर्लक्ष होत असल्याबददल अजित पवार यांनी कानपिचक्या देत त्याकडे लक्ष देण्याच्या सुचना केल्या तुझ्या जनतेसाठी तुझं आरोग्य ठणठणीत असलं पाहिजे.
अजित पवार उपमुख्यमंत्री
नीलेश भाऊंच्या कामाला मनाचा मुजरा !
अडचणीच्या काळात ज्या पध्दतीने आ. नीलेश लंके व त्यांच्या सहकायांनी काम केले आहे हे महराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत पाहतोय. हे पाहताना माइया अंगावर काटा येतोय ! ज्या कोव्हिडला पाहून लोक आपल्या घराबाहेर पडत नाहीत. कुटूंबाला सोडून लोक पळून जात होते. त्यांचा अंत्यविधी करायलाही कोणी जात नव्हते असे असताना नीलेश भाऊंनी जे काम केले आहे त्याला माझा मानाची मुजरा ! आता मी डॉ. रॅम्बो लंके असे त्यांना संबोधणार आहे ! लोकप्रतिनिधी कसा असावा ? एक भाऊ, एक अधिकाराचा हक्काचा माणूस कसा असावा हे त्यांनी कृतीतून सिध्द केले आहे.
सुप्रिया सुळे खासदार
आ. लंके सेवेचं नवं युग दाखवतील !
जिथे संकटं येतात तिथं धावून जाण्याचे काम शरद पवार नेहमीच करतात. आमदार नीलेश लंके यांनी पवार यांच्या पावलावर पाऊल ठेउऊन करोना रूग्णांसाठी ते धावून गेले आहेत. पारनेर अण्णा हजारे यांच्या सेवेसाठी प्रसिध्द आहे. आता हजारे यांच्या पाठोपाठ आ. लंके हे सेवेचं नवं युग पारनेरकरांना दाखवितील.
जयंत पाटील : प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री
लोकप्रतिनिधी कसे काम करू शकतो याचे उत्तम उदाहरण
लोकप्रतिनिधी जिव धोक्यात घालून कसे काम करू शकतो ? आमदार लोकांच्या कल्याणासाठी पेटून उठला तर कसे काम उभे राहू शकते ? असे काम आमदार नीलेश लंके यांनी राज्यालाच नव्हे तर देशाला दाखवून दिले आहे.
हसन मुश्रीफ पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री
जनतेसाठी नीलेश भाऊंनी घरावर तुळशीवृंदावन ठेवले !
करोना संकटात आ. नीलेश लंके यांनी हजारो रूग्णांसाठी केलेल्या कामाची जगभराने दखल घेतली आहे. जागतीक ओळख असलेल्या या आमदारांच्या मदतारसंघात येऊन विकास कामांचा शुभारंभ करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. एकीकडे करोना संकटात काम करताना दुसरीकडे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना जे जमले नाही ते काम आ. लंके यांनी दोन वर्षात विकास कामांचा डोंगर उभा करून दाखविले. समाजाचे काम करताना लोक घरावर तुळशीपत्र ठेवतात हे ऐकले होते. ज्यावेळी त्यांच्या घरी भेट देऊन सदस्यांची चर्चा केली त्यावेळी या माणसाने समाजासाठी घरावर तुळशीपत्र नव्हे तर तुळशीवृंदावनच ठेवल्याची जाणीव झाली. सामान्य कुटुंबातील आ. लंके हे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील असा मला विश्वास आहे.
आ. अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य
आ. लंके यांच्यावरील विश्वास हीच आरोग्य मंदिराची सक्सेस स्टोरी !
फेसबुक, व्टिटर, व्हॉटस अॅप् किंवा इन्टाग्राम काहीही उघडा, तुम्हाला एकच नाव दिसेल ते म्हणजे आमदार नीलेश लंके ! करोना महामारीच्या काळात आ. लंके देत असलेली सेवा अतिशय कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. आम्हाला अभिमान आहे, आमचा विधानसभेतील सहकारी जो डॉक्टर नाहीये, जो वैद्यकिय क्षेत्रातील जाणकारही नाहीये. असे असतानाही त्यांनी सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये मतदारसंघच काय मतदारसंघाबाहेरील रूग्णही मोठया आशेने दाखल होत आहेत. त्यांचा लंके यांच्यावर हाच विश्वास आहे की येथे आल्यावर करोनावर आपण हमखास मात करणार आहोत. आ. लंके यांच्यावरील नागरीकांचा असलेला विश्वास हीच या कोव्हिड सेंटरची सक्सेस स्टोरी आहे.
श्वेता महाले, भाजपा आमदार चिखली मतदार संघ बुलढाणा
अशी आहे रुग्ण संख्या
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कर्जुलेहर्या : ४ हजार ७६८
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर भाळवणी : २३ हजार ७३८
ऑक्सिजन उपचार घेतलेले रुग्ण : ४ हजार २७५
मान्यवरांच्या भेटी
आ. सुनील शेळके, आ. राजूभैया नवघरे, आ. डॉ. किरण लहामटे, डॉ. विश्वरूप राय चौधरी, मेहबूब शेख, भाजप नेते हाजी आराफत शेख, माजी आ. रमेश थोरात, मा. आ. शरद सोनवणे, उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, युवती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान, युनायटेड किंगडमचे डॉ.रमेश भोईटे, डॉ. नरेंद्र काळे, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड ,जालना, जळगाव इतर जिल्ह्यातील अनेकांनी आरोग्य केंद्रास भेटी दिल्या.

