एकही शेतकरी शासकीय मदतीपासुन वंचीत राहणार नाही-ना.धनजंय मुंडे
प्रतिनिधी: शेख सिराज
आष्टी: दि .2 / बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे पिक वाया गेले.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मा.धनजंय मुंडे यांनी पाहणी केली.
आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथुन पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना. धनजंय मुंडें यांनी मराठवाडी येथिल शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली.
यावेळी आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर, माजी आ. साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, शिवाजी नाकाडे, रामभाऊ खाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री धंनजय मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आता नुकसानीचे पुर्वी प्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तिनही अधिकारी यांनी संयुक्त पणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता, सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान यांची देखील पाहणी करून ना. मुंडे यांनी गंगादेवी येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

