आयपीएलचे विक्रमी पाच वेळा विजेतेपद मिळविणारा व सर्वात लोकप्रिय संघ असलेला मुंबई इंडियन्स मागील दोन वर्षांपासून विजेता आहे. यंदाच्या सत्रात सलग तिसरे विजेतेपद मिळवून हॅट्रीकसह सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दावेदारी सांगणारा मुंबई इंडियन्स आयपीएलचे तेरावे सत्र भारतात स्थगित झाले तेंव्हा ७ सामन्यात ४ विजय, तीन पराभव मिळवून ८ गुणांसह चौथ्या स्थानावर होते. लेट चार्जर्स असलेले मुंबई इंडियन्स हळूहळू चार्ज होऊन विजेतेपद मिळविण्यात प्रसिध्द आहे.
परंतु युएईत आल्या पासून या गोल्डन ग्लॅमर असलेल्या संघाला काय झाले ? असा प्रश्न मुंबईच्या प्रशंसंकासह जग भरातील तमाम क्रिकेट रसिक व पंडितांना पडला आहे.चेन्नईविरूध्दचा सामना हरले तेंव्हा मुंबईच्या समर्थकांना इतके वाईट वाटले नव्हते. कारण मुंबईचे गुणतालिकेतील चौथे स्थान त्या पराभवानंतरही कायम होते. शिवाय मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा कर्णधार रोहीत शर्मा त्या सामन्यात तंदुरूस्ती अभावी खेळू शकला नव्हता. त्यामुळे तो पराभव म्हणावा इतका कोणी मनावर घेतला नव्हता. कारण सर्वांना वाटत होते की, मुंबई या पराभवातून सावरून पुन्हा पूर्वपदावर येईल. शिवाय कर्णधार रोहीत शर्मा संघात आल्यावर सर्व काही सुरळीत होईल अशी भाबडी आशा मुंबईला मानणाऱ्या भोळ्या क्रिकेटरसिकांची होती. परंतु केकेआर विरूध्दच्या अनपेक्षित पराभवानंतर मुंबई चक्क सहाव्या स्थानावर घसरली आहे.
गुरुवारी अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडीयमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूध्दच्या सामन्यासाठी कर्णधार रोहीत शर्मा संघात परतला तेव्हा सर्वांनाच हायसं वाटलं. मागच्या चेन्नईविरूध्द सामन्यात अपयशी ठरलेला क्विंटन डीकॉक रोहित सोबतीला असल्याने खुलून खेळत होता. त्याच बरोबर रोहीतही लयीत आल्यासारखे वाटत होते आणि नेमका त्याच वेळी त्याचा तोल गेला. सुनिल नारायणचा एक चेंडू व्यवस्थित न समजल्याने त्याचा फटका चुकला व तो झेलबाद झाला आणि मुंबईच्या डावालाच नव्हे तर खेळालाच ग्रहण लागले. ९ षटकात ७७ धावा करणारा संघ नंतर ११ षटकात जेमतेम ८८ धावाच काढू शकला. विशेष म्हणजे त्यात रोहीतच्या ३० चेंडूत ३३ व डिकॉकच्या ५५ धावांचा समावेश होता.
मजबूत फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात मधल्या फळीने मोठा दगा दिला आहे. ज्या सुर्यकुमार यादवला मुंबईचा आधारस्तंभ म्हणून गणले जाते तो सुर्यकुमार ९ सामन्यात केवळ एक अर्धशतक ठोकू शकला असल्याने त्याचे अपयश मुंबईसाठी पराभवाची कबर बनली आहे. या पराभवानंतर मुंबई चक्क सहाव्या स्थानावर घसरली आहे.
हिच गत ईशान किशन, कृणाल पांङ्या व किरॉन पोलॉर्डची झाली आहे. हे तिघेही आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत नसल्याने मुंबईला संकटाचा सामना करावा लागत आहे.मुंबईचे प्रमुख फलंदाजच अपयशी ठरत असल्याने त्यांच्या खात्यात गोलंदाजांना पाठबळ ठरतील अशा धावाच होत नसल्याने त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागत आहे. शिवाय अष्टपैलू हार्दिक पांडयाची अनुपस्थिती मुंबईसाठी घातक ठरत आहे. मुंबईने चेन्नईविरूध्द सर्वाधिक नाबाद ५० धावांची खेळी करणाऱ्या सौरव तिवारीला फार उशिरा फलंदाजीला पाठविले. एक फॉर्मात असलेल्या खेळाडूला योग्य ठिकाणी व योग्य वेळी फलंदाजीला न पाठविणे मुंबईच्याच चांगलच अंगलट आले.
मुंबईला चेन्नई विरूद्ध ऋतूराज गायकवाड तर केकेआर विरूध्द राहुल त्रिपाठी नडले. विशेष म्हणजे हे दोन्ही फलंदाज महाराष्ट्राचे आहेत व मुंबई इंडियन्स हा संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा आयपीएलमधील एकमेव संघ आहे.सुर्यकुमार यादव व ईशान किशन यांची टि२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असून त्यांना येत असलेले अपयश बघता भारतीय संघातून वगळण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कदाचित उर्वरीत सामन्यात त्यांच्या खेळात सुधारणा झाल्या नाही तर त्यांच्यावर ती संक्रांतही येऊ शकते. शिवाय कर्णधार कोहली टि२० विश्वचषकानंतर भारताचं नेतृत्व सोडणार असून रोहीत शर्मा कर्णधार पदाचा मोठा दावेदार असून मुंबईला जर विजेतेपद राखण्यात अपयश आले तर बीसीसीआय त्यावर पुनर्विचार देखील करू शकते.
त्यामुळे मुंबईला उर्वरीत पाच सामन्यात मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल. त्यासाठी सुर्यकुमार, ईशान किशन, कृणाल पांडया, किरॉन पोलॉर्ड, डिकॉक व स्वतः रोहितला जीव तोडून फलंदाजी करावी लागेल. शिवाय हार्दिक पांड्याला देखील संघाची गरज ओळखून लवकरच स्वतःला मॅच फिट करावं लागेल. फलंदाजांचं यश त्यांच्या गोलंदाजांना बळ देणार असून मुंबईचं विजेतेपदाची हॅट्रीक करण्याचं स्वप्न त्यामुळेच साकार होऊ शकेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

