shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामन्याचा तिसरा दिवस मालिकेचे भवितव्य ठरवणार ?



                        ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसी भारताच्या ढिसाळ फलंदाजीने भारताच्या तथाकथीत सर्वोत्तम फलंदाजीचे लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर गोलंदाज असलेल्या शार्दूल ठाकूरने बॅटचा विक्रमी दांडपट्टा फिरवत भारताची लाज राखली. त्यानंतर बुमराहा व उमेश यादवने फॉर्मात असलेला इंग्लिश कर्णधार रूटसह तीन फलंदाज बाद करून पहिल्या दिवसअखेर भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.

                        
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादवने सुरुवातीलाच नाबाद असलेले फलंदाज डेव्हिड मालान व नाईट वॉचमन क्रेग ओव्हरटनला बाद करून इंग्लंडला दबावात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनरागमन करणाऱ्या ओली पोपने ८१ धावांची दमदार खेळी करत भारताची झोपच उडवली. शार्दूल ठाकूर पोपचा कर्दनकाळ ठरला. पोपने प्रथम जॉनी बॅरिअस्टो व नंतर मोईन अलीसह महत्वपूर्ण भागिदाऱ्या केल्या. तरी इंग्लंड भारतावर मोठा पुढावा घेणार नाही असे वाटत असतानाच दुखापतीतून बरा होऊन परतलेला अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स भारतीय गोलंदाजांवर चांगलाच बरसला. साठ चेंडूतील ५० धावांच्या वोक्सच्या खेळीने संतुलीत असलेला सामना इंग्लंडच्या बाजूने झुकविला. आपल्याला आठवत असेलच पहिल्या दिवशी याच वोक्सने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडताना ४ प्रमुख भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पिटाळले होते.
                         
भारताचा कर्णधार विराट कोहली मागील आठ वर्षापासून भारताचं कर्णधारपद भूषवित आहे. मात्र अजूनही त्याला डिआरएस ( डिसीजन रिव्ह्यू सिस्टम ) चा योग्य उपयोग करता येत नसल्याचे सिध्द झाले. इंग्लंडच्या डावात मोईन अली सुंदर फलंदाजी करताना बुमराहाच्या गोलंदाजीवर एक पायचितचे अपिल पंच इलिंगवर्थ यांनी फेटाळले. त्यावेळी रिव्ह्यू शिल्लक असताना पंचांच्या निर्णयाला आव्हान न देता कोहलीने रिव्ह्यू घेतला नाही. परंतु मोईन त्या चेंडूवर चक्क बाद होता. कर्णधाराने निव्वळ कागदोपत्री देशाचा सर्वोत्तम, यशस्वी कर्णधार न बनता परिस्थितीचं गांभिर्य ओळखून निर्णय घ्यायचे असतात. या बाबत धोनी किती चाणाक्ष होता हे आपणास आठवत असेलच, बरे असो.
                        
मागील नऊ महिने संघाबाहेर असलेेल्या उमेश यादवने मिळालेल्या संधीचे सोने करताना या सामन्यात आपल्या धारदार गोलंदाजीने तीन इंग्लिश फलंदाज बाद केले व आपल्या कसोटी बळींची संख्या १५१ वर नेऊन ठेवली. उमेशला सातत्याने संधी दिली तर तो या पेक्षाही जोरदार कामगिरी करून संघाला मदत करू शकतो. परंतु कर्णधार कोहली स्वतःच्या मर्जीतील बोथट झालेल्या आपला दिल्ली निवासी मित्र ईंशात शर्मालाच झुकते माप देत असल्याने परिणामी भारताचेच नुकसान होत आहे. आता तरी कोहलीने यातून काही बोध घेतला तर बरे होईल.
                         
या संपूर्ण मालिकेत कोणत्याही भारतीय फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळ करता न आल्याने भारताची हालत अतिशय खस्ता झाली आहे. या सामन्यातही भारत इंग्लंड पेक्षा ९९ धावांनी पिछाडीवर असल्याने व मालिका ऐन रंगात आली असता सर्वच फलंदाजांना आता जागे होण्याची वेळ आली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवसअखेर कोणतेही नुकसान होऊ न देता आशादायक परिस्थिती निर्माण केली आहे. 
                        
भारताचा सलामीवीर रोहीत शर्मा जिमी अँडरसनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये जवळजवळ बादच झाला होता परंतु रॉरी बर्न्सला तो झेल घेता न आल्याने भारताला कुठलाही धक्का बसला नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांसमोर केवळ आजचा दिवस यशस्वीरित्या खेळून काढायचे आव्हान नसून किमान ३५० फलकावर लावून इंग्लंड समोर किमान २५० धावांचं  लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. 

                        
सामन्याचे अजून तिन दिवस शिल्लक असून सामना शंभर टक्के निकाली निघणार हे निश्चित आहे. हा निकाल भारताच्या बाजूने लावायचा असेल तर भारताकडून कर्णधार कोहली, उपकर्णधार राहाणे, अनुभवी पुजारा, फॉर्मात असलेले रोहीत, राहुल, आत्मविश्वास गमावलेले रिषभ पंत व रवींद्र जडेजाला आपलं सर्वस्व ओतावं लागणार आहे. तरच भारताचे गोलंदाज इंग्लंडला चौथ्या डावात आपला हिसका दाखवू शकतात.
                       
सामन्याचा तिसरा दिवस या कसोटीचाच नव्हे तर संपूर्ण मालिकेचाच निर्णय ठरविणार असल्याने दोन्ही संघ जीव तोडून प्रयत्न करणार आहेत. परंतु भारताला सन २००७ नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच मालिका विजय मिळवायचा असेल तर तिसऱ्या दिवशी डोळ्यात तेल घालून खेळ करणे गरजेचे आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close