एके काळी अखंड भारताचा अतूट भाग असलेला पाकिस्तान इंग्रजांच्या तोडफोड नितीमुळे भारताआधीच एक दिवस इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त झाला. आजमितीला जेमतेम २२ कोटी लोकसंख्या असलेला पाकिस्तान १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची एकतर बरोबरी करायला पाहतो नाही तर वरचढ होण्याचा आततायी प्रयत्न करतो. पाकिसान राजकारणात तर भारताची कधी बरोबरी करू शकले नाहीच परंतु क्रिडा क्षेत्रातही आज ते भारताच्या खूप मागे पडले आहेत. त्यातल्या त्यात क्रिकेटमध्ये त्यांची झालेली पिछेहाट तेथील क्रिकेट रसिकांच्या काळजाची लाहीलाही करत आहे.
सन १९९० च्या दशकात पाकिस्तान क्रिकेटमध्ये भारतापेक्षा वरचढ होते. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची फौजच होती तर फलंदाजीत त्यांची बाजू भक्कम होती. पाकचा फिरकी माराही भारताच्या तोडीस तोड होता. परंतु इम्रान खान, जावेद मियाँदाद, सलिम मलिक, इंझमाम उल हक, वासिम अक्रम, अकीब जावेद, वकार युनूस, अब्दुल कादीर , मुश्ताक अहमद, सकलेन मुश्ताक यांच्या नंतर त्यांच्या तोडीचे सोडा त्यांच्या वीस टक्के गुणवत्ते इतकाही खेळाडू आजच्या घडीला पाककडे नाही. पाकमधील शालेय क्रिकेट, डिपार्टमेंटल क्रिकेट, क्लब क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट तेथील गलिच्छ राजकारणामुळे अक्षरशः मोडकळीस आले असून नवीन गुणवाण क्रिकेटपटू तेथे तयार होणेचे बंद झाले आहे. केवळ पाकिस्तान सुपर लिग (पीएसएल) एवढीच काय सक्रीय क्रिकेट स्पर्धा तेथे सुरू असून त्यामध्येही केवळ सहा संघच सहभागी होतात. पाकिस्तानकडे वर्तमान परिस्थितीत फक्त १९२ क्रिकेटपटू नोंदणीकृत असून त्याच्यातही मुख्य संघात आपला पठ्ठया निवडण्यात तेथील सत्ताधाऱ्यांचा मोठा कल असल्याने जागतिक दर्जाचा संघ बनण्यात तोच फार मोठा अडथळा ठरत आहे.
त्यांच्या आजच्या संघात बाबर आझम व यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हेच काय ते दोन भरवशाचे फलंदाज असून त्या दोघांच्या कामगिरीवरच पाकच्या फलंदाजीचं गणित अवलंबून असतं. त्यांची गोलंदाजी खास करून केवळ दोनच गोलंदाजांवर अवलंबून आहे. शाहीन शहा आफ्रिदी व हसन अली सोडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडेल असा एकही वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे नाही. फिरकी गोलंदाजातही त्यांच्याकडे नाव घ्यावा असा प्रभावशाली गोलंदाज नाही. त्यामुळे सन २०१७ च्या चॅंपियन्स ट्रॉफी विजेतेपदानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठया प्रमाणात घसरण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी भरारी मारली असून क्रिकेटच्या वनडे, टि-२० व कसोटी या तिनही प्रारूपात भारताचा संघ आघाडीच्या संघात गणला जातो. शिवाय आयसीसीच्या स्पर्धात नेहमी शेवटच्या चार संघात असतो. तसेच भारताचे बरेच खेळाडू आयसीसी रँकींग मध्ये सातत्याने असल्याने पाकिस्तानमध्ये आणखी तिळपापड उडतो.
भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगती व आयसीसीमध्ये सुधारत असलेली पत बघून पाकमधील क्रिकेट रसिक, प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया, माजी क्रिकेटपटू, विरोधक यांनी तेथील सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवून पाकिस्तानमध्ये क्रिकेटची संपूर्ण संरचना बदलवण्यास भाग पाडले आहे.
त्याचा परिपाक म्हणजे पाकिस्तान क्रिकेटचा तेथील कायद्यान्वये मुख्य आश्रयदाता असलेल्या पंतप्रधान इम्रानखानने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) पासून कोच, खेळाडू यांच्यात अमूलाग्र बदल केले. राजकारण करण्यात मश्गुल असलेल्या पीसीबी अध्यक्षांना बदलून रमिझ हसन राजा या माजी कर्णधार, कॉमेंट्रेटर, क्रिकेटचा गाढा अभ्यासक असलेल्या व्यक्तीस पीसीबीच्या अध्यक्षपदी आणले. रमिझनेही आल्या आल्या क्रिकेट सरंचनेत मोठे बदल करताना मिसबाह उल हक, वकार युनुस या जुनाट विचारांच्या प्रशिक्षकांना राजीनामा देण्यास प्रवृत्त केले. मॅथ्यू हेडन, वर्नान फिलँडर या सारख्या माजी परदेशी खेळाडूंना अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी आणले. तर आपला विश्वासू सहकारी सकलेन मुश्ताकला मुख्य प्रशिक्षकपदी नेमले. तसेच खेळाडूंच्या मानधनातही भरीव वाढ केली. नवोदित व होतकरू संघात निवडले.
त्याचबरोबर खेळाडूंना मोटीव्हेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजनही सुरू केले आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तान सन २०१७ चा चॅंपियन्स ट्रॉफी अपवाद वगळता सातत्याने भारताविरूध्द पराभूत होत आहे. हा त्यांच्या पुढे असलेल सर्वात मोठा पेच असून त्यातून मार्ग काढण्यासाठी ते युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे.
येत्या २४ ऑक्टोबर रोजी भारत व पाकिस्तान यांच्यात टि२० वर्ल्ड कपचा एक महत्वपूर्ण सामना होणार असून या सामन्यात भारताला हरविण्यासाठी ते कंबर कसत आहेत. आज या क्षणाला भारताला हरविणे हेच त्यांचे मुख्य टारगेट आहे. त्यांचा कर्णधार बाबर आझम, अष्टपैलू खेळाडू हसन अली व काही माजी खेळाडूंनी भारताला हरविण्याच्या वल्गना सुरू केल्या असून स्वत:वरच असलेला दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारत हेच पाकचे प्रमख दुखणे असून भारताचा संघ खेळाच्या सर्वच क्षेत्रात पाकपेक्षा कागदोपत्री मजबूत दिसत असला तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ तर आहेच परंतु टि२० हा अतिशय विचित्र प्रकार आहे. यामध्ये प्रत्यक्ष मैदानात जो संधीचा अचूक लाभ घेईल तो बाजी मारून जाईल. त्यासाठी भारतानेही पाकला कमी लेखण्याची चुक करणे अंगलट येऊ शकते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com.

