चौदावे आयपीएल सत्र सनरायझर्स हैद्राबादसाठी भले अतिशय खराब गेले असेल पण जाता जाता याच सन रायझर्सने भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज जगासमोर सादर केला. मुळचा जम्मू काशीरचा असलेल्या या वेगवान गोलदाजांचे नाव उमरान मलिक. सहा ऑक्टोबर २०२१ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध गोलंदाजी करताना मलिकने एक चेंडू ताशी १५२.९५ किलोमिटर वेगाने फेकून विद्यमान आयपीएल सत्रातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने फेकलेला तो आजवरचा सर्वात वेगवान चेंडू ठरला.
वास्तविक पाहाता ३ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरूध्द खेळून आपल्या आयपीएल कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या उमरान मलिकने त्याच सामन्यास ताशी १५१.०३ कि.मी. वेगाने चेंडू फेकून सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम स्वतःच्या नावे नोंदविला होता. बुधवारी ताशी १५३ कि. मी. वेगाने चेंडू फेकून स्वतःच्याच कामगिरीत सुधारणा करत विक्रमही आपल्याच नावे केला. उमरानचा हा वेगवान चेंडू खेळण्याचा मान मिळाला तो आरसीबीचा डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला !त्याचबरोबर उमरान मलिकच पहिला आयपीएल बळी ठरला आरसीबीचाच यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत. आनंदाची गोष्ट म्हणजे या सामन्यात सन रायझर्स हैद्राबादने आरसीबीचा आश्चर्यजनक पराभव करून आरसीबीच्या गोटात खळबळ उडवली होती.
उमरान मलिकच्या अगोदर सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा भारतीय विक्रम आरसीबीकडून खेळणारा जलदगती गोलंदाज नवदिपसिंग सैनीच्या नावावर होता. सैनीने १५२.८५ कि.मी ताशी वेगाने चेंडू फेकला होता. आयपीएल मधील आजपर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर हा मान जातो दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनरीच नॉर्खियाला. त्याने १५६.२२ कि.मी वेगवान चेंडू फेकून विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयपीएल मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्यात आघाडीवर दक्षिण आफ्रिकेचेच गोलंदाज आहेत. त्यात डेल स्टेन १५४.४० कि मी. प्रति तास तर तिसऱ्या स्थानावर कॅगिसो रबाडा १५४.२३ कि.मी प्रतिघंटा यांचा क्रम लागतो.श्रीनगर येथे जन्मलेला उमरान मालिक सध्या २१ वर्षांचा असून देशांतर्गत स्पर्धेत तो जम्मू काश्मिरकडून खेळतो. आपल्या वेगवान चेंडू फेकण्याच्या क्षमतेमुळे प्रकाशझोतात आलेला उमरान मलिक आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी केवळ एक लिस्ट ए व एक टि २० सामना खेळला असून याच वर्षी झालेल्या सैय्यद मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धेत त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. तेथील प्रभावी कामगिरी त्याच्यासाठी आयपीएलचा दरवाजा उघडा करण्यास पुरेशी ठरली.
चालू आयपीएल सत्रात दुसरा सर्वात वेगवान चेंडू केकेआरकडून खेळणारा न्यूझिलंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनच्या नावावर असून त्याने १५२.७५ कि. मी ताशी वेगाने चेंडू फेकला आहे. आयपीएलच्या विद्यमान सत्रात जगभरातील अनेक नामांकित वेगवान गोलंदाज विविध फ्रॅंचाईजीकडून खेळत असून उमरान मलिक सारखा नवोदित गोलंदाज सर्वात प्रभावशाली ठरावा हि केवळ त्याच्यासाठीच नसून तमाम भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे.
उमराम मालिकचा हैद्राबादच्या मुळ संघात समावेश नव्हता. तो एक नेट गोलंदाज म्हणून हैद्राबाद संघाचा सदस्य होता. मात्र युएईतील आयपीएल सत्र सुरू होताच हैद्राबाद संघातील टि नटराजन व विजय शंकर तसेच सपोर्टींग स्टाफमधील ४ सदस्य कोरोना बाधीत झाल्याने तसेच विंडीजचा अष्टपैलू खेळाडू रूदरफोर्ड वडिलांच्या निधनामुळे मायदेशी परतल्याने ऐनवेळी उमरानला सनरायझर्सच्या मुख्य संघात घेतले. या मोसमात हैद्राबादची कामगिरी अतिशय सुमार होत असताना सर्व खेळाडूंना संधी दिली जात होती व ते अपयशी ठरत होते. याच प्रयोगापोटी मलिकला संधी मिळाली व त्याने आपले कौशल्य जगासमोर सादर केले.
एकेकाळी वेगवान गोलंदाज भारतात औषधालाही नव्हते. परंतु आजमितीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज भारताकडे आहे. त्यात उमरान मलिकची आणखी भर पडल्याने भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याचेच संकेत मिळत आहेत.उमरानची धारदार गोलंदाजी बघून जगभरातील आजी माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले असून उमरानला या पेक्षा प्रभावी कामगिरी करण्यासाठी उत्तम प्रशिक्षण, भरपूर संधी व शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून क्रिकेटकडे आकर्षित झालेला छोटासा उमरान मोठा क्रिकेटपटू व्हावा म्हणून परिस्थिती गरीबीची असतानाही त्याच्या वडिलांनी भाजीपाला व फळे विकण्याचा व्यवसाय सांभाळत उमरानला सक्षम बनविले.
उमरानची कामगिरी बघून भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रभावित झाला आहे. तर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उमरानने डोक्यात कोणतीही हवा जाऊ न देता अपार मेहनत सुरू ठेवणे गरजेचे आहे. हे सर्व त्याने प्रामाणिक पणे केले तर तो एक दिवस भारताच्या वेगवान गोलंदाजीचा महामेरू नक्कीच बनेल आणि देशाचं व माता पित्याचं स्वप्न साकार करेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

