shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टर अभावी मृतदेह तब्बल चौदा तास पडून;शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार,२७ ऑक्टोबर , २०२१
शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील आरोग्य सुविधा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे चक्क एक मृतदेह बारा तास शवविच्छेदन विना पडून असल्याचे दिसून आले आहे.
        शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरु केल्याने येथील इतर सर्व सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या परिसरात कोणतेही लसीकरण, तपासणी, उपचार तसेच शवविच्छेदन असल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यासाठी जावे लागते आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला होता. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन शवविच्छेदन करुन देणे गरजेचे असताना येथे वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने सदर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना तसेच पोलिसांना रात्रभर रुग्णालयात ताटकळत उभे रहावे लागले.
          दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणे गरजेचे असताना देखील अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. त्यांनतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार राजेंद्र बनकर, राहुल वाघमोडे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी दोन नंतर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले. त्यानंतर सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटर सध्या बंद करुन येथील सर्व सुविधा पूर्ववत केल्यास नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नसून, सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

          शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय मध्ये सध्या फक्त तीन कोविड रुग्ण असून, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या पत्रानंतर लवकरच ग्रामीण रुग्णालय जनरल केले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.         
       शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर मुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. सध्या कोविड रुग्ण देखील फार कमी झालेले असून, लवकरच शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून ग्रामीण रुग्णालय पूर्ववत सुरु करून येथील सर्व वैद्यकीय सुविधा सुरु करु, असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close