केंद्र सरकार विरोधात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा इंदापूर बंद चा निर्धार..
इंदापूर प्रतिनिधी:शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतकरी बांधवांच्या मागण्यांची कोणतीही दखल न घेता उलटपक्षी उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलन करणा-या शेतक-यांना भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने स्वताच्या गाडीखाली अत्यंत क्रुर पध्दतीने चिरडून शेतक-यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्नं केला आहे. या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा सोमवार दि. ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी इंदापूर बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकरी बांधवांसह सर्वच घटकांवर अन्याय होत असून हुकूमशाही पध्दतीने सामान्यांचा आवाज दाबण्याचा मोदी सरकारचा आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस सह इतर घटक पक्षांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी बांधवांवरच्या वाढत्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवार दि. १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी भारत बंद ची हाक दिली आहे.
यांस अनुसरून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना व इतर घटक पक्षाच्या वतीने सोमवार दि. ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली.
यावेळी काँगेस चे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, काका देवकर, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महादेव सोमवंशी, चमणभाई बागवान, उमाताई इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

