शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२१.
मानव जन्म हा प्रपंच साधून परमार्थ करण्याचा व यातूनच राष्ट्रीय आरोग्य व पर्यावरण रक्षण करण्याचा राजमार्ग आहे. पर्यावरणाचे रक्षण केले तरच आरोग्याचे रक्षण होणार आहे हे तत्व प्रत्येकाने आचरणात आणले तर तो एक आदर्श राष्ट्रधर्म, पुरुषार्थ ठरेल
मानवीजिवनात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. याची आचरण पद्धती प्रथम धर्म, यानंतर २)मोक्ष यानंतर ३)अर्थ या नंतर ४)काम. अशी आहे.
याचे आचरण करताना प्रथमतः आपले आचरण हे निसर्गधर्मानुसार म्हणजेच निसर्ग नियमानुसार असायला हवे, आणि ते आचरण करताना मोक्ष म्हणजे राजमान्यता, सामाजिक प्रतिष्ठा, गौरव मिळवणे हे ध्येय असायला हवे. हे साधण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, नियोजन करावे लागते यासाठी अर्थ म्हणजे पैशाची आवश्यकता असते. तो मिळणे अपरिहार्य आहे व मानवी जीवनामध्ये पुढील पिढी सशक्त, राष्ट्रीय विचारांचे आचरण करणारी व्हावी यासाठी प्रपंच म्हणजे (काम), दैनंदिन जीवनात सुखसोयींचा उपभोग घेणे हे तत्व आचरणात आणणे हे क्रमप्राप्त असते.
*तर मानवाने प्रथमतः निसर्गधर्म(धर्म)साधत त्यातून समाजाकडून लोकमान्यता (मोक्ष)मिळविणे व हे करताना अर्थार्जन (अर्थ)करणे आणि सर्वात शेवटी स्वतःचे आयुष्य जीवनमान प्रपंच यात रममाण होत उपभोग घेणे(काम) अशाप्रकारे मानवधर्माची, मानवी जन्माची सार्थकता करणे गरजेचे आहे.
पण सद्यस्थितीत आपल्या आचरण पद्धतीत आम्ही प्रथमतः(प्रथम अर्थ) अर्थार्जन कसे होईल? यातून आपल्या प्रपंचाला विविध सुखसोयींचा उपभोग(द्वितीय काम) कसा मिळवता येईल? याचाच विचार करतो. आपल्या मुलांना याचाच संस्कार देतो. यानंतर निसर्गधर्माचा, सामाजिक बांधिलकीचा सामाजिक ऋण फेडण्याचा राष्ट्रभक्तीचा राष्ट्रधर्माचा (तृतीय धर्म) विचार करतो आणि नंतर जमलेच तर लोकमान्यता, समाजसेवा, कीर्ती (चतुर्थ मोक्ष) याचा विचार करतो.
या आचरण पद्धतीमधील पुरुषार्थाची क्रमवारी चुकल्यामुळे सहाजिकच आपण विकार वासनांच्या, प्रलोभनांच्या, स्वार्थांधतेच्या आहारी जातो आणि सामाजिक बांधिलकीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवले, प्रेम दिले त्यांचा आपल्याला विसर पडतो आणि रोज नवीन क्षितिजे शोधत आपण भ्रामक, अशाश्वताचा शोध घेत मेटाकुटीला येतो. समाधानाला पारखे होतो. आणि यामुळेच सामाजिक पर्यावरण पूर्णत: फसविले जाते. समाधान मिळतच नाही. अतृप्त भावनांचा परिपाक होतो आणि त्यातून अनेक रोग, चिंता, निद्रानाश, व्यसने, दुष्प्रवृत्ती, द्वेष, शत्रु यांच्या भोवर्यात स्वतःला घुमवीत राहतो. असंख्य रोगांचे बळी ठरतो आणि आयुष्यभर कमविले धन स्वास्थ्यासाठी, आजारपणावर खर्ची घालतो.
पुरुषार्थाच्या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आपली जीवन पद्धतीच दूषित होते व अनेक समस्या, संकटे, आव्हाने, नैराश्य यांना सामोरे जात आपण काळाच्या पडद्याआड कधी जातो ते समजत देखील नाही.
यासाठी पुरुषार्थ जपा. चिंतन करा. परस्पर मतभेद गाडून टाका आणि सामाजिक समरसता, बंधुभाव, पर्यावरण रक्षणाच्या जाणिवेतून राष्ट्रीय सामाजिक हीत वृद्धिंगत करण्यासाठी पर्यावरण रक्षणाची कास धरा.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहीमेंतर्गत प्रकाशित,
लेखक चंद्रकांत शहासने.
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५ कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता मोहीमेंतर्गत प्रकाशित,
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

