आयपीएलच्या तेरा वर्षांच्या दिर्घ कालखंडात विक्रमी पाच विजेतेपद मिळवून मुंबई इंडियन्सने क्रिकेट जगतात आपला धाक वजा दराराच निर्माण केला आहे. शिवाय मागील दोन स्पर्धात सलग विजेतेपदे मिळविल्यामुळे त्यांची भिती इतर संघांमध्ये असणे साहजिकच आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईचा संघ खेळाच्या सर्वच क्षेत्रात बलाढय असून कोणत्याही बिकट परिस्थितीत विजय ओढून आणण्यात त्यातील प्रत्येक खेळाडू तरबेज आहे. आक्रमक, संयमी फलंदाज, धारदार जलदगती गोलंदाज व विरोधी फलंदाजांना नाचायला लावणारे फिरकी गोलंदाज. त्याचबरोबर या सर्वांना एक जीवाने घेऊन चालणारा समजदार रोहीत शर्मा सारखा कर्णधार यामुळे मुंबई इंडियन्सची वेगळीच छाप पडून जाते.
या सर्व पार्श्वभूमिवर सन २०२१ चे सत्र सुरू झाले. मागील दोन स्पर्धा जिंकल्यामुळे विजेतेपदाची हॅट्रीक करण्याची दुर्मिळ संधी मुंबई समोर चालून आली होती. परंतु कोणा दृष्टाची नजर लागावी तशी मुंबईची मजबूत फलंदाजी अक्षरशः कोमेजून गेली. रोहीत शर्मा, क्विंटन डिकॉक, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, किरॉन पोलॉर्डसारखे एकाचढ एक मातब्बर फलंदाज वाऱ्यावर उडून जावे त्यागत आल्या पावली बाद होऊन परतू लागले. त्यामुळे या सत्रात सुरुवातीपासूनच मुंबईची गाडी पिछाडीवर पडली होती. युएईत आल्यानंतर पराभव जणू त्यांच्या मागे हातपाय धुवून लागला होता.
या सततच्या पराभवामुळे सर्वांच्या लाडक्या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. नेमक्या अशा बिकट परिस्थितीत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारण्याची खासीयत व क्षमता असलेल्या मुंबई इंडियन्सची सत्व परिक्षा सुरू झाली आणि पहिल्याच प्रयत्नात दिल्ली कॅपीटल्सविरूध्द ते नापास झाले. तेंव्हा प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की, यंदा गतविजेता मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मध्ये जाणार नाही ?
त्यानंतरचे दोन सामने मुंबई इंडियन्सला फार मोठया फरकाने जिंकून आपल्यापेक्षा वरचढ ठरू पाहणाऱ्या संघाना खाली खेचण्यासाठी सरस धावगती राखण्याचे खडतर आव्हान समोर होते. त्याच ओघात ५ ऑक्टोबरला शारजाच्या मैदानावर मुंबईची गाठ पडली राजस्थान रॉयल्स बरोबर ! याच राजस्थानने दोन दिवसांपूर्वीच तेंव्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे १९० धावांचे आव्हान चुटकीसरशी पार करून सीएसकेला जोरदार झटका दिला होता. त्यामुळे फॉर्मात दिसणारे राजस्थानचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांना आस्मान दाखवतील असं वाटणं उचितच होतं.
परंतु मुंबईचे खेळाडू या सामन्यात वेगळ्याच प्रेरणेने उतरलेले दिसले. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानचे फॉर्मात असलेले सगळे फलंदाज एक एक करून माघारी धाडताना राजस्थानची धावसंख्या आपल्या आवाक्याबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली व अवघ्या नव्वद धावाच त्यांना वीस षटकात काढू दिल्या. तसेच प्रत्युत्तरात अवघ्या ८.२ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावा काढून आपली धावगती सुधारली. त्याचबरोबर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली.
मुंबई इंडियन्सच्या राजस्थानवरील रॉयल विजयानंतर प्ले ऑफ मध्ये स्थान मिळविण्याची चुरस जोरात आली आहे. मुंबईचे १३ सामन्यात सहा विजयांसह बारा गुण असून त्यांची धावगती -०.०४८ इतकी असून ते हा लेख लिहीला जाईपर्यंत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होते. तर एवढयाच सामन्यात मुंबई इतकेच गुण मिळविणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सची धावगती + ०.२९४ इतकी सरस असून ते चौथ्या स्थानावर आहेत. आता या दोन्ही संघाना प्रत्येकी सामना खेळायचा बाकी असून त्याच्यातील कामगिरी प्ले ऑफचा चौथा संघ निश्चित करणार आहे.
मुंबईला जर प्ले ऑफ फेरी मिळवायची असेल तर केकेआरला राजस्थान बरोबर मोठया फरकाने हारावे लागेल अथवा जिंकलेच तर कमीत कमी १० धावांनी किंवा एक ते दोन गड्यांनी. तसेच मुंबईला सनरायझर्स हैद्राबादवर ४८ धावांंनी किंवा कमीत कमी ६६ चेंडू राखून विजय मिळवावा लागेल.जर केकेआरने राजस्थानवर मोठा विजय मिळविला आणि मुंबईनेही हैद्राबादला मोठया फरकाने हरविले तर त्या वेळी केकेआर प्ले ऑफ मध्ये जाईल. तर दुसऱ्या सुत्रानुसार केकेआर राजस्थानबरोबर पराभूत झाले आणि मुंबई हैद्राबाद विरुद्ध केवळ जिंकले तर मुंबई प्ले ऑफ मध्ये पोहोचेल.
सध्या आयपीएल मधील वातावरण अतिशय गरम झाले असून मुंबईने राजस्थानला मोठया फरकाने हरविल्याने मुंबईच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहे. एक वेळ स्पर्धेतून बाद व्हायची वेळ आलेल्या मुंबईच्या आशा जिवंत झाल्याने इतर संघांमध्ये खळबळ उडाली असून मुंबई जर प्ले ऑफ मध्ये पोहोचली तर त्यांना विजेतेपदापासून कोणीही रोखू शकणार नाही. यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या संघामध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

