सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा शनिवारी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीद्वारे अधिकृतरित्या सुरू होणार असून त्याच दिवशी गतस्पर्धेचे फायनालिस्ट वेस्ट इंडिज व इंग्लंड आमने सामने ठाकणार आहे. वास्तविक पाहता विंडीज - इंग्लंड सामन्याने स्पर्धेला सुरूवात व्हायला हवी होती. परंतु कार्यक्रम आयोजन समितीने नियोजनात चूक केली असते. कारण बऱ्याच स्पर्धात गत विजेते -उपविजेते उद्घाटनाचा सामना खेळताना आपण बऱ्याच स्पर्धात बघितले आहे.
शुक्रवारी श्रीलंका व नामिबियाने बारा संघांच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश केला असून अ गटात- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व बांगलादेश यांचा समावेश आहे. तर ब गटात भारत, पाकिस्तान, न्युझिलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांचा सहभाग असेल. वरील दोन्ही गटांचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की, अ गट ब गटाच्या तुलनेत अधिक कठीण दिसतो. अ गटात बांगलादेश व श्रीलंका हे संघ जरी पात्रता फेरीतून आले असले तरी त्यांचा जागतिक क्रिकेट मध्ये मोठा दरारा आहे. श्रीलंका तर सन दोन हजार चौदाच्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा विजेता असून वनडेचे एक विश्वविजेतेपदही त्यांच्या खात्यात जमा आहे. बांगलादेशचा विचार केला तर या संघातही भल्या भल्यांना लोळविण्याची क्षमता असून त्यांनी त्यांचे उपद्रवमूल्य अनेकदा सिध्दही करून दाखविले आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या संघांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला दबदबा सर्वश्रूत आहे. त्यामुळे या गटात उपांत्य फेरीत पोहोचण्यास मोठी चढाओढ होणार हे निश्चित ! हि स्पर्धा होत असलेल्या युएईतील खेळपट्टया फिरकी गोलंदाजांना मोठया प्रमाणात मदत करत असल्याचा इतिहास असल्याने जागतिक क्रिकेटमध्ये नावाजलेले फिरकी गोलंदाज श्रीलंका व बांगलादेश संघात असल्याने हे दोन्ही संघ जरी पात्रता फेरीतून आले असले तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या चार संघांना संकटात टाकण्याचे काम ते करू शकतात.
ब गटाचा विचार केला तर पात्रता फेरीतून आलेले स्कॉटलंड व नामिबीया त्रासदायक ठरण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारत, न्युझिलंड पाकिस्तान व अफगाणिस्तान या चार संघातच गटातून अव्वल दोन क्रमांक मिळविण्यात जुगलबंदी होणार आहे. भारताचा विचार केला तर भारताला पाकिस्तान व न्युझिलंड विरूध्दचे सामने जड जाऊ शकतात तर आफगाणिस्तानला हरविताना जरा जास्त कस लावावा लागणार आहे.
मागील सर्व टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धांचा विचार केला तर भारताविरूध्द पाकिस्तान अजून कधीही जिंकले नाही तर तिच गत भारताची न्यूझिलंड विरूध्द असून भारताला या स्पर्धेत न्यूझिलंडविरूध्द आपले रेकॉर्ड बदलण्याची संधी आहे. कारण कागदोपत्री तरी भारताचा संघ न्युझिलंड पेक्षा वरचढ दिसतो. त्यातच दोन्ही सराव सामन्यात जसे भारत सहज जिंकले अगदी तसेच न्यूझिलंड आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून सहज हरले आहे. परंतु आयसीसी स्पर्धांचा विचार केला तर न्युझिलंडची कामगिरी भारताविरूद्ध कमालीची बहरते. त्यामुळे न्यूझिलंडचे आव्हान परतविणे हेच भारतापुढे मोठे आव्हान असणार आहे.
राहाता राहील पाकिस्तान विरूध्दचा भारताचा सामना, तर भारताचा पाकविरूध्दचा टि ट्वेंटीतील रेकॉर्ड निर्भेळ आहे. परंतु खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळला जातो कागदावर नाही. भारताचा संघ पाकपेक्षा वरचढ दिसत असला तरी पाकिस्तानही भारताबरोबर मागचे पुढचे हिशोब मिटण्याच्या तयारीनेच आले असणार ? त्यामुळे पाककडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा ठेवूनच भारताला मैदानात उतरावे लागेल.
ब गटाचा विचार केला तर भारताला उपांत्य फेरी गाठण्यात कोणतीही अडचण येऊ नये. परंतु भारतीय खेळाडू कोणत्या मानसिकतेने खेळतात ? तसेच खेळाडूंचे स्पर्धेदरम्यान अंतर्गत संबंध कसे राहतात यावरच भारताचे विजेतेपदाचे गणित अवलंबून आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

