जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला परतवून लावण्यापासून ते रस्त्यावरची आंदोलने आणि हजारोंच्या गर्दीत विषयांची मुद्देसूद मांडणी करत भव्य व्यासपीठ गाजवण्यासाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात झाली होती ती बचत गटांपासून.
दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले आणि पुढे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. पण लग्नानंतर त्यांचा करिअरला कलाटणी मिळाली. लग्नानंतर सासरकडील चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपालीताई चाकणकर यांचाही आपसूकच राजकीय प्रवेश झाला. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातूनच रुपाली यांनी बचत गटांच्या कामाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करुन त्यांनी महिलांचे संघटन करण्यास सुरूवात केली.
2009 ला सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे राष्ट्रवादी महिला पुणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद आणि आता हा प्रवास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदापर्यंत येवून पोहोचलाय.

