shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंजाबचा अडचणींवर मात करत विजय ;केकेआरच्या संकटात भर !



                     तेरावे आयपीएल जसजसे पुढे सरकत आहे तसतसे त्याचा रोमांच वाढत आहे. शुक्रवारी विद्यमान सत्रातील ४३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्ज यांच्यात अतिशय रंगतदार स्थितीत संपला. जिंकलेला सामना हरण्यात पटाईत असलेल्या पंजाबने प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके वाढविण्याची कोणतीही संधी सोडली नाही. मात्र या वेळेस त्यांच्या फलंदाजांनी हाती आलेला विजय निसटू दिला नाही व केकेआरवर पाच गडी राखून विजय मिळवित प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

                      
केकेआरच्या १६५ धावांचे लक्ष गाठताना पंजाबने १९.३ षटकात पाच गडयांच्या मोबदल्यात १६७ धावा ठोकून एक शानदार विजय मिळविला. पंजाबच्या या विजयात सलामीवीर कर्णधार केएल राहुल ६७, मयंक अग्रवाल ४०, शाहरूख खान ९ चेंडूत नाबाद २२ व एडन मार्करमच्या १८ धावांचा वाटा होता. तर निकोलस पुरननेही यामध्ये १२ धावांचे अल्पसे योगदान दिले.
                       
नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या केकेआरने एक अतिरिक्त फलंदाज खेळवूनही त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. मात्र वेंकटेश अय्यर केकेआरसाठी यंदा देवदूतच ठरत आहे. त्याच्या ६७, राहुल त्रिपाठी ३४ व नितेश राणाच्या ३१ धावांमुळे केकेआरने ७ बाद १६५ धावा बनविल्या. पंजाबकडून अर्शदिपने ३ बळी मिळवत प्रभावी कामगिरी केली.
                  
युएईमध्ये आयपीएल -१३ चे दुसरे पर्व सुरु झाल्यापासून आपला खेळ कमालीचा उंचावलेल्या केकेआरने यापूर्वी दिल्ली, मुंबई, बेंगलोर या बलाढय संघाना पराभवाचा डोस पाजला परंतु धोनीच्या सीएसकेने शेवटच्या चेंडूवर केकेआरचा हा प्रयत्न हाणून पाडला. मात्र पंजाब किंग्जने वरील संघांच्या तुलनेत जरासा सरस खेळ केला व विजय मिळवून केकेआरसाठी प्लेऑफ मध्ये पोहोचणे अवघड बनवून टाकले. पंजाबच्या विजयाने केकेआरचेही १२ सामन्यात १० गुण झाले असून उर्वरीत दोन सामन्यात जरी त्यांनी विजय मिळवले तरी त्यांचे १६ गुण होणार नाहीत. कारण चेन्नई व दिल्ली प्ले ऑफ साठी पात्र ठरले असून ११ सामन्यात १४ गुणांसह आरसीबी तिसऱ्या स्थानी असून एक विजय त्यांना थेट प्ले ऑफचे तिकीट देऊ शकतो. तर गतविजेता मुंबई इंडियन्स सध्या दहा गुणांसह सहाव्या स्थानी असले तरी त्यांचे तिन सामने शिल्लक असून त्यात ते विजय मिळवून १६ गुणांसह अंतिम चार संघात स्थान मिळवू शकतात.
                  
केकेआर आजच्या सामन्यात पराभूत होण्याच्या कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे सदोष संघ निवड. या सामन्यात ते केवळ चारच प्रमुख गोलंदाजांसह खेळले. तर प्रमुख गोलंदाज वरूण चक्रवर्तीचे चार षटके अकराव्या षटतकाच संपवून टाकले. लॉकी फर्ग्युसनला बाहेर बसवून केकेआरने फार मोठी घोडचूक केली. शिवाय शेवटचे व निर्णायक षटक आपला अवघा पाचवाच सामना खेळणाऱ्या सलामीचा फलंदाज व्यंकटेश अय्यरला देणे व तेही केवळ पाच धावांचा बचाव करण्यासाठी केकेआरला चांगलेच भोवले. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे केकेआर कडून अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण झाले व तेही खास करून हातातले झेल सोडून ! केएल राहुलचा अंतिम टप्प्यात झेल सुटला. मयंक अग्रवाल, निकोलस पुरन व शाहरूख खानला शुन्यावर जिवदान देणे केकेआरला भलतेच महागात गेले, आणि अति महत्वाचे म्हणजे संघात एक गोलंदाज कमी करून एक फलंदाज जास्त खेळविला ही चालही रास आली नाही. कारण त्यांच्या पहिल्या दहा षटकात १ बाद ८९ व दुसऱ्या दहा षटकात ६ बाद ७७ धावाच झाल्या. शिवाय पंजाबला कमी लेखण्याची चुकही त्यांना संकटात टाकून गेली. 
                    
केकेआरचा विश्वविजेता इंग्लिश कर्णधार ओएन मॉर्गन फलंदाज म्हणून सफसेल अपयशी ठरत असून तो संघासाठी असून अडचण व नसून खोळंबा ठरत आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून त्याच्या चालीही बऱ्याच वेळा चुकतात. परंतु नवोदित व्यंकटेश अय्यर बॅट व बॉलने कमालीचा यशस्वी ठरत आहे, राहुल त्रिपाठीही बॅटने करामत करतो तर मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती प्रभावी मारा करत असल्याने मॉर्गनच्या चुंकावर पांघरून पडत आहे. आता मात्र मॉर्गनलाच आराम देण्याची वेळ आली असून वेळीच निर्णय झाला नाही तर कमीत कमी प्ले ऑफ मध्ये जाण्याची हाती आलेली नामी संधी केकेआरला गमवावी लागेल.

 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close