shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नी आमदार संग्राम जगताप आक्रमक;निरीक्षक भोसलेंचे अवजड वाहतूक बंद करण्याचे आश्वासन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

शुक्रवार,29 ऑक्टोबर , 2021
अहमदनगर : नगर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार संग्राम जगताप पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आ. जगताप यांनी बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे कार्यालय गाठत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले, मात्र आ. जगताप आंदोलन करण्यावर ठाम होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप  यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नगरसेवक कुमार वाकळे, अभिजीत खोसे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार, पप्पू पाटील, अजिंक्य भिंगारदिवे, ऋषिकेश ताठे आदी उपस्थित होते. अवजड वाहतूक शहरातून जात असल्याने शहरात वाहतूक कोंडी होते. नगरकरांसाठी ही नित्याची बाब बनली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे शहर वाहतूक शाखेचा कार्यभार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार जगताप यांनी शहरात अवजड वाहतूक येत असल्याने सक्कर चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शहर वाहतूक शाखेने त्यांना शहरातून पुन्हा अवजड वाहतूक होणार नाही, असे आश्वासन दिले होते. आश्वासनानंतर आ. जगताप यांनी आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर देखील शहरातील अवजड वाहतूक बंद झाली नसल्याने आमदार जगताप यांनी पुन्हा पत्रकार चौकात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आ. जगताप आंदोलन करण्यासाठी बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान पत्रकार चौकात पोहोचले. त्याठिकाणी असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आ. जगताप यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. यावेळी निरीक्षक भोसले यांनी अवजड वाहतूक बंद करण्याचे आश्वासन पुन्हा आ. जगताप यांना दिले. मात्र आ. जगताप यांनी कोणतेही आश्वासन न घेता आंदोलन करण्याचे ठरविले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक भोसलेंचा कारभारच कारणीभूत

शहरातून अवजड वाहतूक होत असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. शहरात सध्या उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहतुकीच्या मार्गातील बदलाचे प्रसिद्धपत्र शहर वाहतूक शाखा फक्त नावापुरते काढते आणि त्यावर कोणतेही उपाय करत नाही. त्यामुळे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या कारभारामुळे शहरात वाहतूकीची समस्या नित्याची बाब बनली असल्याच्या तक्रारी आहेत.


वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली

नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थित झालेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीमध्ये झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी आदेशही बजावले होते. आज दोन महिने होऊन गेले तरीही त्याची अंलबजावणी व्हायला तयार नाही. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केराची टोपली दाखवल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. तसेच भोसले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close