तब्बल सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर चौदाव्या आयपीएल सत्रात प्ले ऑफ मध्ये खेळणारे चार संघ एकदाचे मिळाले. दिल्ली कॅपिटल्स २०, चेन्नई सुपर किंग्ज १८ व आरसीबी १८ गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहीले. सीएसके व आरसीबीचे समान गुण असले तरी मिळालासीएसकेची धावगती सरस असल्याचा लाभ त्यांना . हि परिस्थिती चौथ्या व पाचव्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्सची होती. दोघांचेही १४-१४ असे सारखेच गुण होते, परंतु येथेही केकेआरची सरस धावगती केकेआरला लाभदायक ठरली व त्यांनी अंतिम चार संघात चौथे स्थान मिळवून तीन वर्षानंतर प्रथमच प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळविला.
संपूर्ण स्पर्धेत आयपीएलचे विक्रमी पाच विजेतेपदं मिळविणारा व मागील सलग दोन वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आपल्या लौकीकाला साजेसा न खेळल्याने त्यांना विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले. शेवटच्या साखळी सामन्यात गळ्यावर सुरी असल्यासारखी परिस्थिती मुंबई इंडियन्स समोर असताना त्यांनी फलंदाजीत सर्वस्व ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातीलही केवळ ईशान किशन व सुर्यकुमार यादव हे दोघेच अपेक्षेनुरूप खेळल्याने मुंबईला बऱ्यापैकी धावसंख्या जमविता आली. परंतु केकेआरची धावगती मागे टाकेल इतकी ती मोठी नव्हती.
कर्णधार रोहीत शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलॉर्ड चांगल्या सुरुवातीचा लाभ न उठवू शकल्याने मुंबई हैद्राबादला फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर डांबून ठेवेल एवढी धावसंख्या उभी करू न शकल्याने मुंबईच्या गोलंदाजांनाही हैद्राबादला २३५ मधून १७१ धावा वजा करता निर्धारीत ६५ धावांच्या आत रोखता आले नाही. प्रत्यक्ष सामन्यात मुंबई इंडियन्स ४२ धावांनी विजयी झाले असले तरी इप्सित धावगती प्राप्त न झाल्याने मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आणि मुंबई इंडियन्सचे जगभरातील करोडो चाहते निराश झाले.
अबुधाबीत सनरायझर्स व मुंबई यांच्यातील सामना सुरू असतानाच दुबईत दिल्ली व आरसीबी यांच्यातील लढतही चुरसीची झाली. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहून अंतिम फेरीत खेळण्याची संधी दोनदा मिळविण्या करीता आरसीबीला दिल्लीवर १०० चेंडू राखून विजय मिळविणे गरजेचे होते. परंतु ते डावाच्या शेवटच्या चेंडूवर कसाबसा विजय मिळवू शकले. अपेक्षित विजय न मिळाल्याने आरसीबीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता त्यांना ११ ऑक्टोबरला केकेआर बरोबर एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. एलिमिनेटर मध्ये विजयी होणारा संघ १० तारखेला होणाऱ्या पहिल्या क्वॉलीफायर मधील दिल्ली व चेन्नई यांच्यातील पराभूत संघाशी १३ ऑक्टोबरला दुसरा क्वॉलीफायर खेळेल व विजय मिळाल्यास पहिल्या क्वॉलिफायरमधील विजेत्याशी १५ ऑक्टोबरला विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात भिडेल.
मुंबई इंडियन्स भले विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला, त्यांची फलंदाजी त्यांच्या या वाताहतीची कारण असली तरी मुंबई इंडियन्सचा आयपीएल वरील वचक कायम राहीला. ईशान किशन व सुर्यकुमार यादवने जी तोडफोड फलंदाजी केली, ती बघीतल्यानंतर मुंबईची दहशत कमी झाल्याचे जाणवले नाही.
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर ओमान व युएईतच टि-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी भारताच्या संघात याच मुंबई इंडियन्सचे सहा फलंदाज आहेत. सुर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांडया, रोहीत शर्मा, जसप्रित बुमराहा व राहुल चहार यांचा त्यात समावेश आहे. आयपीएलमध्ये बुमराहा वगळता यातील एकालाही सातत्यपूर्ण व प्रभावी खेळ करता आला नाही. त्यामुळे मुंबईला स्पर्धेतून बाद व्हावे लागले. एवढेच नाही तर यातील ईशान किशन व राहुल चहार यांना काही सामन्यातून वगळण्यातही आले होते. तर हार्दिक फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यात सफसेल फेल जात असल्याने रोहीत व बुमराहा या दोघांना सोडून इतर चार जणांना विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघातून वगळण्याची मागणीही जोर धरू लागली होती. मात्र स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ईशान किशन व सुर्यकुमार यादव पुन्हा आपल्या जुन्या लयीत आल्याने त्यांच्यावरील संकट टळले. मात्र राहुल चहार शेवटपर्यंत संघाबाहेरच राहिल्याने त्याच्या विषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. तर हार्दिक विषयीही संशयाचं वातावरण आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारत आपला पहिला सामना पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत २४ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

