shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाकिस्तानविरूध्द भारताचा विजयीरथ सुरूच राहणार ?



                  रविवारी २४ ऑक्टोबरला टि२० विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी लढत दोन सख्खे शेजारी पण पक्के वैरी असलेल्या भारत व पाकिस्तान यांच्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर होणार आहे. भारत व पाकिस्तान या दोन देशातील राजकीय संबंध सुरळीत नसल्याने या दोन देशात परस्पर व्यवहार बंद असून क्रिकेटचे द्विपक्षीय सामने / मालिका  सन २०१२ नंतर बंदच आहेत. आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धातच हे दोन्ही देश एकमेकांविरूध्द खेळून आपली क्रिकेटची हौस पूर्ण करतात.

                   या दोन देशातील क्रिकेट भयंकर त्वेषाने खेळले जात असल्याने त्यांच्यातील सामन्याला रणांगणातील युद्धाचेच स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे भारत - पाकिस्तान मध्येच नव्हे तर संपूर्ण जगात या सामन्याला मोठया संख्येने बघितले जाते. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. सन १९९२ पासून सन २०१९ पर्यंत वनडे व टि२० च्या एकूण १२ सामन्यात हे दोन संघ एकमेकांपुढे उभे ठाकले असून प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे. त्यापैकी ७ वेळा वनडे विश्वचषकात व ५ वेळा टि२० विश्वचषकात भारताला यश मिळाले आहे.
                   
प्रत्येक वेळी पाकिस्तानचा संघ कमजोर होता असेही नाही. इम्रान खान, जावेद मियाँदाद, वासिम अक्रम, वकार युनुस, मोहम्मद युसुफ, मिसबाह उल हक, इंझमाम उल हक, बाबर आझम, युनुस खान हे व इतरही अनेक रथी महारथी पाककडून खेळले मात्र त्या सर्वांनाच भारता विरूध्द खेळताना दबावाचा सामना न करता आल्याने पाकची विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध विजयाची पाटी अजूनही कोरीच आहे. पाकिस्तानने यावेळी भारताविरूध्द जिंकण्यासाठी सर्वतोपरी कंबर कसली आहे. खास या सामन्यासाठी पाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षच बदलून टाकले. एहसान मनीच्या जागेवर अध्यक्ष म्हणून आलेल्या रमिज राजाने टि २० विश्वचषक स्पर्धा अवघ्या एक महिना दूर असताना संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनुस यांना पदावर न राजीनामा देण्यास भाग पाडले व त्यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वतःच्या मर्जीतील सकलेन मुश्ताक, फलंदाजी सल्लागार म्हणून ऑस्ट्रेलिया माजी तडाखेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन व गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून द.आफ्रिकेचा वर्नान फिलँडर यांची नियुक्ती केली. इतकेच नाही तर तत्कालीन निवड समितीने निवडलेल्या संघात बदल करून अनुभवी तीन खेळाडूंना संघात घुसविले. शिवाय पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मानधनात प्रत्येकी एक लाख रुपयांची वाढ केली. शिवाय कोणा अज्ञात उद्योगपतीच्या हवाल्यानुसार भारताविरूध्द पाकिस्तान जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला कोरा चेक देण्याची घोषणा केली आहे.
                   
हे सर्व सुरू असले तरी भारतीय संघाचा विचार केला तर भारताचा संघ कागदोपत्री पाक पेक्षा अनेक पट वरचढ दिसतोय. शिवाय विश्वचषक स्पर्धा ज्या शारजा, दुबई व अबुधाबीच्या मैदानावर होणार आहे त्याच ठिकाणी नुकतीच आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्याने भारतीय खेळाडूंना तेथील मैदानावर खेळण्याचा ताजाताजा अनुभवही आहे. शिवाय एक हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीचा प्रश्न सोडता भारताचे सगळेच खेळाडू पुर्णपणे फिट तर आहेच शिवाय चांगल्या फॉर्मातही आहेत. त्याचे प्रत्यंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सराव सामन्यात आले आहेच. भारताने हे दोन्ही सामने अगदी सफाईदार पणे जिंकून आपल्या तयारीचा नमुनाच जगासमोर सादर केला आहे.
                    
भारताचे सर्वच खेळाडू जोरदार फॉर्मात असून अंतिम संघात नेमके कोणाला खेळवायचे हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे पडला आहे. कर्णधार कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मदतीला बीसीसीआयने खास मेटॉंर म्हणून नेमलेल्या महेंद्रसिंग धोनीमुळे ड्रेसिंग रूममध्ये चैतन्य पसरले असून धोनी प्रत्येक खेळाडूशी व्यक्तीगत संपर्कात असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवाय खेळाडूंना विश्वासात घेवून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्याची हातोटी धोनीला चांगल्या प्रकारे अवगत असल्याने त्याचा लाभ भारताला होणार आहेच, शिवाय धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने सात वेळा विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केल्याने खास करून या स्पर्धेत पाकविरूद्ध भारताचा संघ मोठया आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.
                        
पाक कर्णधार बाबर आझमसह पाकचे आजी माजी खेळाडू भारताला हरविण्याच्या वल्गना करत असले तर त्यांचे अंतर्मन भारतच जिंकणार असल्याचे त्यांच्या पाक टिव्हीवर, युट्यूब चॅनेल्सवर सध्या झडत असलेल्या चर्चासत्रातून जाणवत आहे.
                    
भारताने अजूनही या सामन्यासाठी आपली रणनिती स्पष्ट केली नसल्याने पाकच्या गोटात भितीचे वातावरण आहे. सन २०१७ च्या चॅंपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकने भारताला हरवून विजेतेपद मिळविले असून तीच एकमेव बाब त्यांना भारताविरूद्ध लढण्याचे बळ देऊ शकते.
                       
शेवटी प्रत्येक सामना नवा असतो तेंव्हा भारताने मागचे सगळे विसरून पाकिस्तानला कोणत्याही बाबीत हलके न घेता आपला नैसर्गिक खेळ केला तर विश्वचषकात बारा -शुन्य असलेली आघाडी तेरा -शुन्य अशी वाढायला वेळ लागणार नाही.


लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close