शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर,दि.१६ ऑक्टोबर-
राज्यघटनेप्रमाणे देशात संघराज्य व्यवस्था असून केंद्राइतकेच अधिकार राज्यांना आहेत. राज्यांच्या दैनंदिन कारभारात केंद्राची लुडबुड आणि दडपण नसावे ही भूमिका सर्व राज्यांनी घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या संघराज्यविरोधी कारभाराला आव्हान दिले. तुम्ही अंगावर येत असाल, तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे; पण मर्दासारखे लढा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सच्या मागे लपून वार का करता? हिंमत असेल तर माझे सरकार पाडून दाखवा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला.
तुम्ही चिरकत राहा, माझा वाडा चिरेबंदी आहे, तुमचीच डोकी फुटतील,’ असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. तसेच सत्तांध भाजपशी लढण्यासाठी जात-पात विसरून मराठी माणसाची एकजूट करा आणि मराठी-अमराठी भेद विसरून हिंदूंची एकजूट करा. हिंदू तितुका मेळवावा हिंदुस्थान धर्म वाढवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनी आणि मातांनो अशी हाक देता आली. आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना असल्याचे मत व्यक्त केले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या विकासकामांची माहिती देत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भाजपमधील उपटसुंभ नवहिंदूंमुळे देशात हिंदुत्वाला धोका असल्याची टीका ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाचे तुमचे विचार तुमचीच माणसे ऐकणार नसतील तर काय उपयोग, असा सवालही ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. तुम्ही म्हणता आपले सर्वाचे पूर्वज एक होते. मग उत्तर प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, हे सर्व प्रकार तुम्हाला मान्य आहेत काय, असा सवाल ठाकरे यांनी भागवत यांना केला. सत्तेचे व्यसन हे अमली पदार्थासारखेच घातक असते, याचा बंदोबस्त कोण करणार? अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे ते व्यसन करणाऱ्या माणसाचे घरदार उद्ध्वस्त होते. पण सत्तेचे व्यसन लागलेल्यांमुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अशी टीका भाजपवर करत ते व्यसन देशातून नष्ट केले पाहिजे, असे मतही मुख्ममंत्र्यांनी व्यक्त केले.
मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा ठाकरे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आधी म्हणायचे मी पुन्हा येईन, आता म्हणतात मी गेलोच नाही, मी गेलोच नाही. सत्ता येते आणि जाते पण ती डोक्यात जाता कामा नये. अहंकार असता कामा नये. शिवसेनेला दिलेले वचन पाळले असते तर सत्ता गेली नसती. आज तुम्ही मुख्यमंत्री असता किं वा नंतर मुख्यमंत्री झाला असता.’’ शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवून कदचित मीही राजकारणातून बाजूला झालो असतो. केवळ जबाबदारीच्या भावनेने मी राजकारण आणि मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे. शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे दिलेले वचन मी पाळले. पण त्यांना दिलेला शब्द अजूनही अंमलात आणायचा आहे. तो म्हणजे शिवसेनेची स्वबळावर सत्ता, असे सांगत ठाकरे यांनी शिवसेनेचे १०० टक्के सत्तेचे स्वप्न पुन्हा अधोरेखित केले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

