शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: डीवायएसपी संदिप मिटकेंवर गोळीबार; निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा वैशाली नांन्नौर यांच्या बंगल्यात दोन तास थरार, एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्याच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले. तसेच पोलिस उपअधीक्षक मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे की, सुनिल लक्ष्मण लोखंडे हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. तो पहाटे पासून नान्नोर यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसला होता. त्याने आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नान्नोर यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी नान्नोर या बेडरूममधे होत्या. आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून नान्नोर यांच्या लहान मुलांना डांबून ठेवले. त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरत वैशाली नान्नोर यांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र नान्नोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून आपल्या परिचितांना या घटनेची माहिती दिली.
घटणास्थळी थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिस उपअधिक्षक मिटके घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. ती मिटके यांचा डोक्याजवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. संपूर्ण डिग्रस गावाला जणु काय पोलीस छावणीचे स्वरूपच प्राप्त झाले. दरम्यान, आरोपीने मागील आठवड्यात तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता वैशाली नान्नोर यांना राहुरी शहराजवळ अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. त्यांना शरीर संबंधाची मागणी करून, आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी घटनेच्या रात्री नान्नोर यांनी आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अपहरण, आर्म ॲक्ट, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने आजचे कृत्य केल्याचे समजते. दरम्यान, आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी डिग्रस येथे घटनास्थळी पाहणी केली.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

