सातवी टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या यजमान भारताला तुलनेने दुबळ्या पाकिस्तानने एकतर्फी ठरलेल्या सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव करत भारतीय खेळाडूंच्या गर्वाचा फुगाच फोडला. त्याचा परिणाम असा झाला की, कोणाच्याही खिजगणतित नसलेल्या पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला व त्यांनी भारतापाठोपाठ बलाढय गणल्या जात असलेल्या न्यूझिलंडचाही फडशा पाडला व त्रासदायक ठरू पाहणाऱ्या अफगाणिस्तानलाही मार्गातून दूर करत उपांत्य फेेरीतील आपले स्थान जवळ जवळ पक्के केले.
अगदी याच्या उलट भारत स्पर्धेत आतापर्यंत फक्त पाकिस्तान विरूद्धच एकमेव सामना खेळले व त्यातही पराभूत झाल्यामुळे संघाचा आत्मविश्वास खचलाच शिवाय भारतीय संघावर असलेला क्रिकेट चाहत्यांचा विश्वासही उडाला आहे. तसे बघाल तर भारताचे अजून चार साखळी सामने बाकी असून ते सर्व जिंकून भारत उपांत्य फेरीत जाऊ शकतो. त्यासाठी एकतीस ऑक्टोबर रोजी दुबई येथे भारताला न्यूझिलंडशी कडवा प्रतिकार करावा लागणार आहे. कारण न्यूझिलंडचा आयसीसी स्पर्धात भारताविरूद्धचा रेकॉर्ड अतिशय चांगला असून खास करून टि ट्वेंटी विश्वचषकाचा विचार केला तर ते भारताविरूद्ध अपराजित आहेत. परंतु न्यूझिलंडचा संघही या स्पर्धेत स्वतःच्या पहिल्या सामन्यात भारताप्रमाणेच पाकिस्तानविरूध्द पराभूत झाला आहे. परंतु किवीजने पाकला विजयासाठी झुंजविले होते. तर भारताने सफसेल लोटांगण घातले होते.
याच पार्श्वभूमिवर दोन्ही संघासाठी करो अथवा मरोची स्थिती बनलेल्या या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचे स्पर्धेतील अस्तित्व टिकून राहील व जो हरेल त्याच्यासाठी सदर स्पर्धा संपल्यासारखीच असेल.
टि ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात डोकविले तर एक गोष्ट लक्षात येते की भारताची न्यूझिलंड विरूध्द विजयाची पाटी कोरी आहे. हे दोन संघ आतापर्यंत दोन वेळा आपसात भिडले, पण दोन्ही वेळेस न्यूझिलंडनेच बाजी मारली. सन दोन हजार सातच्या दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत न्यूझिलंडने भारताला दहा धावांनी हरविले होते. त्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या भारताला हरविणारा त्या स्पर्धेतला एकमेव संघ होता न्यूझिलंड !
सन दोन हजार सोळाची स्पर्धा भारतात झाली. त्या स्पर्धेत न्यूझिलंडने भारताला अगदी एकतर्फी झालेल्या सामन्यात सत्तेचाळीस धावांनी हरवून भारताविरूध्द आपले वर्चस्व सिद्ध केले. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकापूर्वीच्या स्पर्धांत भारताने पाकिस्तानला पाच वेळा हरविले होते. तर वेस्ट इंडिजनेही इंग्लंडचा पाच वेळा फडशा पाडला होता. परंतु यावेळी पाकिस्तान व इंग्लंडने इतिहास बदलून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चित केले व त्यांच्या विरूध्द विश्वचषकात आपल्या विजयाचे खाते उघडले. अगदी तशीच संध्या भारतालाही चालून आली आहे. भारतही इंग्लंड व पाकिस्तान प्रमाणे चमत्कार करेल अशी तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा असणार यात कुठलेही दुमत नसेल.
भारतासाठी चिंता वाढविणारी दुसरी बाब म्हणजे न्यूझिलंंडची भारताविरूद्ध केवळ टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतच सरस कामगिरी नाही तर आयसीच्या चॅॅंपियन्स ट्रॉफी, वनडे विश्वचषक व कसोटी विश्व अजिंक्य स्पर्धेतही ते भारताला भारी पडले आहेत. सन दोन हजार तीनच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझिलंडला हरविले होते. त्यानंतर भारत आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत त्यांना हरवू शकले नाही. चार महिन्यापूर्वीच न्यूझिलंडने वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप भारताला हरवूनच जिंकली आहे. शिवाय त्यांच्या संघात टिट्वेंटीला साजेसे बरेच खेळाडू संघात आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या तुलनेत त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंचा भरणाही जास्त आहे. एकंदर विचार केला तर न्यूझिलंडचे पारडे भारतापेक्षा सरस दिसते.
परंतु न्यूझिलंड विद्यमान स्पर्धेत आपला सलामीचा सामना भारताप्रमाणे पाकिस्तान विरूध्दच हरल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास काहीसा खचलेला असणार. त्यामुळे भारताला न्यूझिलंडविरूद्ध मागील सर्व पराभवांचा बदला घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी असूच शकणार नाही. भारताने या सुवर्णसंधीचा अचूक लाभ उठविल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहीलच शिवाय विजेतेपदाचे स्वप्नही साकार करता येईल. पण हे सर्व तोंडाने बोलण्या इतके सोपे नसून न्यूझिलंडने विजयासाठी कसून तयारी केली असणारच ! त्यामुळे भारतालाही आपले सर्वस्व झोकून खेळ करण्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

