आयपीएलच्या चौदाव्या सत्राचा अंतिम सामना खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. मात्र सर्वांना अपेक्षित असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ या दोन संघात नसल्याने अंतिम फेरीत पोहोचलेले सीएसके व केकेआर हे दोन संघ सोडून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहेत. कारण याच दोन्ही संघांनी दिल्लीचे आव्हान अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात संपुष्टात आणले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर खेळ करत १४ सामन्यात १० विजयांसह २० गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले. आयपीएलची बाद फेरी इतर स्पर्धांपेक्षा वेगळी असून यामध्ये गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी उपलब्ध होतात. त्याचाच एक भाग असलेल्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या षटकात दिल्लीच्या तोंडातला घास पळविला. त्यामुळे दिल्लीला पराभूत होऊनही स्पर्धेच्या नियमाप्रमाणे दुसरा क्वॉलिफायर सामना खेळण्याची संधी मिळाली. परंतु तेथेही दिल्लीच्या पदरी अपयश आहे. या सामन्यात फरक इतकाच होता की, संपूर्ण सामन्यावर केकेआरची पकड होती पण अंतिम टप्प्यात दिल्लीने आशा निर्माण केल्या होत्या परंतु उपलब्ध झालेली विजयाची संधीही दिल्लीने गमावली.
बुधवारी रात्री शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेला आयपीएल -२०२१ चा दुसरा क्वॉलिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स व रडतखडत प्ले ऑफ मध्ये पोहोचलेल्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. जेमतेम १३५ धावाच त्यांना २० षटकात जमा करता आल्याने सध्या तुफान फॉर्मात असलेल्या केकेआरच्या फलंदाजांसाठी ते काम अतिशय सोपे वाटत होते.
युएईत आल्यापासून केकेआरच्या फलंदाजीचा कणा बनलेल्या नवोदित व्यंकटेश अय्यरने या सामन्यातही दिल्लीच्या धारदार गोलंदाजीला बोथट करताना पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली व शुभमन गिलसह शानदार सलामी दिली. १२१ धावांपर्यंत केकेआरचा एकच गडी बाद झाला होता. परंतु या दोघांच्या पतनानंतर अचानक केकेआर समोर पराभव उभा राहिला. त्या दरम्यान दिल्लीच्या गोलंदाजांनीही जीव तोडून मारा केला.
केकेआरची होत असलेली पडझड दुसऱ्या टोकावरून राहुल त्रिपाठी हताशपणे बघत होता. मात्र त्याला नॉन स्ट्राईकींग एंडला जखडून ठेवण्यात दिल्लीचे गोलंदाज बऱ्याच प्रमाणात यशस्वीही ठरले होते. शेवटच्या दोन चेंडूवर सहा धावा हव्या असताना व आश्विन चढून मारा करत असताना केकेआरच्या सुदैवाने राहुलला स्ट्राईक मिळाला व त्याने आपले सर्वस्व पणाला लावून चेंडू सरळ सिमारेषेबाहेर भिरकावून दिला. त्याचबरोबर केकेआर अंतिम फेरीत पोहोचले व दिल्ली स्पर्धेबाहेर !
साखळीत अव्वल राहीलेल्या दिल्लीला या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण व ढिसाळ फलंदाजीने दगा दिला. तर कर्णधार म्हणून रिषभ पंत अजून पोरगळ असल्याचेच सिद्ध झाले. महत्वाचे निर्णय घेताना त्याच्याकडून बऱ्याचदा चुकाच झाल्या. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये शेवटचं षटक अनुभवी कागिसो रबाडाला न देता टॉम करनला देणे दिल्लीला भोवले तर दुसऱ्या क्वॉलिफायरमध्येही त्याचे बरेच निर्णय संघासाठी घातक ठरले. दोन वेळा ऑस्ट्रेलियाला वनडेचे विश्वविजेतेपद मिळवून देणारा पंटर उर्फ रिकी पाँटीगसारखा अनुभवी प्रशिक्षक देखील आपल्या कर्तव्यात कमी पडला. येथे एक गोष्ट मुद्दाम नमून करावीशी वाटते ती म्हणजे कर्णधार रिषभ पंत पेक्षा प्रशिक्षक रिकी पाँटींगच्या चुकीच्या रणनितीमुळेच दिल्लीला करंडकाविनाच रडत रडत स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
आयपीएलमध्ये साखळीत गुणतालिकेत अव्वल दोन संघात असलेला संघ अंतिम फेरीत न पोहोचण्याचा तिसरा प्रसंग घडला. विशेष म्हणजे या तिन पैकी दोन वेळा तर दिल्लीचाच संघ होता. सन २०१२ मध्ये दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होते. तर यंदा अव्वल स्थानावर असूनही पहिल्या दोन स्थानावर असल्याचा लाभ दिल्लीला घेता आला नाही. हिच गत सन २०१६ मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात लायन्सची झाली होती. गुजरातचा संघ साखळीत अव्वल होता पण दोन्ही क्वॉलिफायरमध्ये पराभूत झाल्याने विजेतेपदाची संधी गमावली.
सन २०२० मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली उपविजेते ठरले होते. यंदाच्या सत्राच्या सुरुवातीपूर्वी इंग्लंडविरूध्द वनडे सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयस जखमी झाला होता. त्यामुळे तो भारतात खेळलेल्या पहिल्या पर्वात खेळू न शकल्याने दिल्ली संघ प्रबंधनाने रिषभला हंगामी कर्णधार केले. त्यानंतर श्रेयस तंदुरूस्त होऊन परतल्या नंतर श्रेयसला कर्णधारपद परत न देता रिषभलाच कायम ठेवले. ही गोष्ट श्रेयसचे अंतःकरण नक्कीच दुखावूण गेली असणार ? परंतु श्रेयसने याबाबत एक चकार शब्दही काढला नाही. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याने जोरदार फलंदाजीही केली. मात्र निर्णायक सामन्यात त्याची फलंदाजी अपेक्षेनुरूप झाली नाही. या मागे श्रेयसचे दुःखावलेले मनही असू शकते ना ? पण एक गोष्ट दिल्लीच्या मॅनेजमेंटची चुकली ती म्हणजे त्यांनी गौतम गंभीरच्या अचानक नेतृत्व सोडण्याच्या घटनेनंतर दिल्लीची विस्कटलेली घडी निट करणाऱ्या श्रेयस अय्यरला कर्णधार पदावरून हटवायला नको होते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

