शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता यांच्या नियमित जामिनावरील सरकारी पक्ष व आरोपीच्या वतीचा युक्तीवाद गुरूवारी (दि.१८) पूर्ण झाला असून, या अर्जावर लवकरच निर्णय दिला जाणार आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर डॉ. शिंदे, परिचारिका पठारे, शेख, आनंता या चौघी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
सरकार पक्षाच्या वतीने ॲड. अनिल ढगे यांनी बाजू मांडली. जिल्हा रुग्णालयास ता. 6 डिसेंबर रोजी अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉ. विशाखा शिंदे आणि परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता या आगीच्या वेळेस आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर नव्हत्या. रुग्णालयातील सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामध्ये ही बाब नोंदविली गेली आहे. या विभागातील जखमी रुग्णांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मयत रुग्णांच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. डॉक्टर आणि परिचारिका अतिदक्षता विभागात गैरहजर असल्याचे जबाबात नमूद केलेले आहे. आग लागल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होत्या तर एवढे मृत्यू झाले नसते. त्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूला त्या जबाबदार आहेत. त्यांना जामीन देऊ नये, असे म्हणणे सादर करण्यात आले.
आरोपींच्या वतीने ॲड. महेश तवले यांनी बचाव केला. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यावर डॉक्टर आणि परिचारिकांनी रुग्ण वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच काही रुग्णांचे प्राण वाचले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. डॉ. विशाखा शिंदे या शासकीय सेवेत नाहीत. त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे सर्वांना नियमित जामीन द्यावा, असे म्हणणे सादर केले.
न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

