राहुरी : विद्युत कायदा २००३ च्या कलम ५६ अन्वये नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याने कायद्यातील तरतुदीनुसार प्रति तास ५०/- रूपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी राहुरीचे नायब तहसीलदार दंडिले मॅडम यांना निवेदन देण्यात आले तसेच राहुरी व देवळाली प्रवरा येथील महावितरणचे उपअभियंता उपस्थित नसल्याने त्यांच्या कार्यालयास अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनी कडुन शेती पंपाचे वीज रोहीत्र बंद करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले जात आहे. वीज कायद्यातील तरतुदीनुसार थकीत वीज बिलाच्या मागणीसाठी वीज ग्राहकांना प्रथम नियम ५६ ( १ ) नुसार नोटीसीद्वारे अवगत करणे गरजेचे आहे. यासंबंधी शेतकरी संघटनेच्या एका रिट याचिकेत मुंबई न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. परंतु, महावितरण कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केले आहे. तरी रोहीत्र बंद करून सक्तीची वसुली धोरण राबविण्याची महावितरणची कृती मनमानी स्वरुपाची व बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना वेठीस धरणारी आहे.
१५ ते २० दिवसांपासून तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज रोहीत्र बंद केल्याने सद्यस्थितीत शेतकरी रब्बीची पिके उभी करण्याच्या विवंचनेत आहे. यात आणखी भर म्हणून महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हुकल्यास होणा-या नुकसानीची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना खिंडीत गाठून त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा उठवण्याचा महावितरणकडून चाललेला प्रकार निंदयनीय व संतापजनक असून वीज रोहीत्र बंद करण्याची बेकायदेशीर मोहीम महावितरणने तात्काळ स्थगित करावी व विद्युत कायदा २००३ च्या तरतुदीनुसार ज्या दिवशी रोहीत्र बंद केले त्या दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रति तास ५०/- रूपये नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी. अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल. यातुन निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील.
यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिलेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच डॉ. पांडुरंग म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, तालुकाध्यक्ष संदीप उंडे, शेखर पवार, सचिन गागरे,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, बाबासाहेब माळवदे, परशुराम कोळसे, भगवान पेरणे, अनिल म्हसे, भास्कर तागड, किरण भांड, भाऊराव पवार, राहुल हिवाळे, खंडु तांबे, भास्कर तागड, महेश भांड, सुनिल काचोळे, संदीप भांड, विठ्ठल म्हसे आदी उपस्थित होते.
ऊर्जामंत्र्यानी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी...
ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांच्या मतदार संघात महावितरण कंपनीने बेकायदेशीर शेती पंपाचा पुरवठा खंडित केला आहे. त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले. त्यामुळे ना. तनपुरे यांनी कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला राजकीय दृष्ट्या पराभवाला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याची शेतकर्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
महावितरण कंपनीला वीज रोहीत्र बंद करण्याचे वरिष्ठांचे लेखी आदेश नसताना नुसते तोंडी आदेशावरून वीज बिलाची पठाणी वसुली चालु आहे. शेतकऱ्यांचे वीज रोहीत्र बंद करणे हे बेकायदेशीर आहे. महावितरण कंपनीने कायदेशीर बाबींचे पालन करावे.
बाळासाहेब पटारे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, शेतकरी संघटना

