अहमदनगर प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची व कर्मचारी यांची महाविकास आघाडी सरकारकडून पिळवणूक होत असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव दीपक आगळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यामध्ये १२ हजार १४९ ग्रंथालये हे अनुदानित असून, त्या ग्रंथालयांत एकूण कर्मचारी २१ हजार ६१५ आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारकडून ग्रंथालयांना वेळेवर अनुदान दिले जात नाही. जे अनुदान दिले जाते.
तेही पन्नास टक्क्यांपेक्षा दिले जाते. त्यामुळे ग्रंथालयांचा खर्च भागवितांना चालकांचे नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या शासनमान्य ग्रंथालयांत सुमारे दोन वर्षांपासून एकरकमी अनुदान दिले जात नाही व अजून मागील काही अनुदान देणे बाकी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळतो की नाही, याची जाणीव राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नाही, हे महाराष्ट्रातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. सरकारकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनदेखील राज्य सरकार लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारमधील काही मंत्री हे अनुदान देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, अशी टीका आगळे यांनी केले आहे. सरकारने ग्रंथालय चळवळ टिकविण्यासाठी अनुदान वेळेवर देण्याची गरज आहे.

