शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
देवळाली प्रवरा : नुकताच दिल्लीत राष्ट्पतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देवळाली प्रवरासह राज्यातील ६४ नगरपरिषदांना प्रदान करण्यात आले. त्यात
लातूर महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षनात देशात ३८ वा क्रमांक मिळाला आहे, त्याचा सत्कार स्विकारणेसाठी लातूरचे महापौर विक्रम गोजमगुंडे यांनी लातूर महापालिकेतील महिला स्वच्छता कर्मचारीला दिल्ली येथे स्वखर्चाने सत्कार सोहळ्याला नेऊन या भगिणीच्या हस्ते सत्कार स्वीकारला. त्यामुळे लातूरचे महापौर विक्रम गोजमगुंडे यांचा महिलांप्रति असलेला आदर आणि स्वच्छतेचा पुरस्कार स्वीकारताना स्वच्छता कर्मचारी यांना दिलेले पुरस्काराचे श्रेय यामुळे लातूरचे महापौर विक्रम गोजमगुंडे हे सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या मोठेपणाचे आणि दिलदार व्यक्तिमत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेने मात्र अजब गोष्ट केली. सफाई कामगार महिलांना वा नगरसेवीकांना हा मान देण्याऐवजी नगरसेवीकेचे पतीराज पालीकेच्या खर्चाने या सोहळ्यात मिरवुन आले. देवळाली प्रवरा शहराला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुरस्कार की मानांकन मिळाले हा जरी वादाचा विषय असला तरी जे काही मिळाले ते स्विकारणेसाठी दिल्लीला जाताना गाव कारभार्याना स्वच्छतेत १००% सहभाग असलेल्या महिलांचा चक्क विसर पडला आहे.
दिल्ली येथे बक्षीस स्वीकारतानाचे, चषकासोबतचे तसेच शिर्डी विमानतळावर शाल गळ्यात टाकून काढलेले फोटो पाहिल्यावर समजते की, गावातील ५१ टक्के महिलांचा कोणी प्रतिनिधी त्यात नव्हता. नगरपालिकेचे रजेवर असलेले मुख्याधिकारी अजित निकत तसेच पंख्याखाली बसून नगरपालिकेचे गाडा ओढणारे अधिकारी आणि नगरसेवीकेंचे पती तिकडे मिरविताना दिसले.
हा पुरस्कार की नामांकन काय ते स्विकारणेसाठी जर सध्याच्या मुख्याधिकारी IAS नेहा भोसले मॅडम तसेच खरोखर स्वच्छतेचे काम करणारी एखादी महिला सफाई कर्मचारी आणि नगरसेविका यांचा सहभाग असता तर हा पुरस्कार आणखी शोभून दिसला असता.
परंतु देवळालीच्या कारभार्याना गावातील महिलांना असे मानाचे स्थान सहजासहजी मिळुन द्यायचे नसावे. म्हणूनच त्यांनी गावातील एकही महिला हा सन्मान स्विकारणेसाठी नेली नसावी. तसंहि गावांतील महिलांचे आरोग्य, शिक्षण न् रोजगार हे प्रश्न दुर्लक्षित आहेत.
खुर्चीवर असलेल्या महिला मुख्याधिकारी नेहा भोसले यांना डावलून रजेवर असलेले मुख्याधिकारी अजित निकत दिल्लीत सन्मान स्वीकारायला गेल्याने नागरसेविकेंचे पती यांचे सोबत देवळालीचे मुधिकारीही महिलांना डावलण्यात मागे नाहीत हेच यातून स्पस्ट होते.
वास्तविक पाहता खरी स्वच्छता कोण करतो तर घरातील महिला व सार्वजनीक ठिकाणी सफाई कामगार. घाण आपण करायची न् सफाई कर्मचार्याने ती काढायची. तो कमी दर्जाचा न् आपण ए सी त मिरवतो म्हणुन श्रेष्ठ. तो घाणीत राबणार अन तुम्ही बक्षीसे घेणार. एखाद दुसरा मैला गटार साफ करणारा किंवा झाडु मारणारी मायभगिनी तिथे नेली असती स्टेजवर तर तो पुरस्कार शोभून दिसला असता. ते कमीपणाचे वाटत असले तर मग किमान नगरसेवींकांना त्यात महिलांचे प्रतीनिधीत्व दिले असते तर लातूर सारखे देवळाली प्रवरा गावचे नाव झाले असते.
याबाबत देवळाली प्रवरा शहरात नाराजी पसरली असुन महिलांच्या या अपमानाबद्दल नागरिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत समस्त महिला वर्गाची गाव कारभारी माफी मागणार आहेत किंवा कसे याकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन राहिले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

