कर्मवीर शंकरराव काळेसाहेब यांचे आज पुण्यस्मरण करताना एका तपस्वी व त्यागमूर्ती विभूतीचे स्मरण होते.काळेसाहेब हे बहुपेढी बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.आपल्या मराठी मातीची जाण ठेवून सामाजिक बांधिलकी जपली खऱ्याअर्थाने ग्रामीण जनतेतील उपेक्षित व बहुजन समाजाला दिशा देण्यासाठी शैक्षणिक व राजकीय दृष्टीने कार्यरत राहून त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी समरस होऊन कामं कले .
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श व शैक्षणिक तत्त्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून सामाजिक व शैक्षणिक प्रगतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली . कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणाचे स्वप्न झोपडीपर्यंत कसे जाईल याचे पाईककत्व स्वीकारले. निरलस भावनेने रयत शिक्षण संस्थेची धुरा दोन तपाहून अधिक काळ सांभाळून संस्था व तिचे सर्वांगीण वेगळेपण सिद्ध केले. गोरगरीब व सुशिक्षित मुलामुलींना शिक्षकी पेशात आणून त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आधार तर दिलाच पण रयतनिष्ठ पिढी निर्माण केली यातून रयत हा एक विचार एक संस्कार व संस्कृती म्हणून पुढे आणण्यात काळे साहेबांचे योगदान निर्विवाद सर्वश्रुत आहे . खेड्यातील कोणतीही शाळा बंद पडणार नाही तसेच वाढीव विद्यार्थी संख्या होताच वाढीव तुकड्यांना मंजुरी आणली . मुलींचं महाविद्यालयीन शिक्षण मध्येच बंद न होईल असे पाहिले .अशा वेळी तेथे ज्यूनियर काॅलेज उभी करून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागापासून शैक्षणिक उठाव केला व म्हणूनच आज आशिया खंडातील सर्वात मोठी व आदर्श शिक्षण संस्था म्हणून रयत आजही बदलत्या शासकीय सामाजिक शैक्षणिक व आर्थिक काळातही गुणवत्ता व प्रतिष्ठा टिकवून आहे .रयत ही एकमेव शिक्षण संस्था आहे जी बहुजनांच्या शिक्षणाचे व्रत अंगिकारून शतकपूर्ती करत आहे. जिला महात्मा जोतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची बैठक आहे.
सहकार व शेती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाहिलेले परिवर्तनाचे स्वप्न . महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायीत्व स्वीकारून अवघा महाराष्ट्र सहकारी शेती व संस्थांनी जोडला यातूनच हरित क्रांती धवल क्रांती व अन्नधान्याची गरज पूर्ण झाली . काळे साहेबांनी हा सहकारी तत्वांचा वसा शेतकरी व कष्टकरी यांचा उद्धारकर्ता झाला.अशी नेतृत्व संपन्नता त्यांच्याकडे होती .
त्यांचे राजकारण हे समाजकार्याची एकरूप होते ज्यात समाज हित आहे तेच सकारात्मक बदलाचे व परिपुष्ठतेचे मानक बनू शकते व याच त्यागी भावनेतून त्यांनी तळागाळापर्यंत आपले नेतृत्व सिद्ध केले . यातूनच समाज परिवर्तन घडत गेले .जनतेने स्वयंस्फूर्तपणे त्यांचा कर्मवीर म्हणून गौरव केला .
काळेसाहेबांनी आपल्यात माणूस पाहिला खऱ्या अर्थाने आपल्या आतील माणूस शोधला भलेही आपल्या मर्यादा व समोरच्याचा विरोध याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करीत राहिले त्यामुळे विरोधही मेणाहून मऊ होत गेला असे अजातशत्रू पण त्यांठायी होते शंकरराव काळे कोल्हे हा वैचारिक वाद सर्वपरिचित आहे तसे त्यांच्यातील अतूट व अभेद्य मैत्री ही अनघ्या राज्याने पाहिली आहे .
खरे तर काळेसाहेबांच्या कर्तृत्व व दातृत्वाचा आवाका शब्दांच्या चिमटीत पकडून ठेवता येणार नाही कारण त्यांचे कार्य सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी समुद्र असे आहे .पण समाजसेवा हाच स्थायीभाव असल्याने कीर्ती प्रसिद्धीमध्ये ते कधीच अडकून पडले नाहीत गजांत लक्ष्मीपुत्र असूनही अहंकाराचा वाराही लागू शकला नाही की राजकीय संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्यही भोगले नाही उलट मदत करत गेले गरीब शाखा आहेत त्यांना आर्थिक आधार दिला आईच्या नावाने पण रयतेशी संलग्न शाखांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी स्वत: देणग्या दिल्या घरी आलेला कधीच रिकाम्या हाताने व रिकाम्या पोटी परत गेला नाही कोट्यवधींच्या मदती त्यांनी आपल्या हयातीत केलेल्या पण प्रसिद्धीपराङ्मुख होऊन
अहमदनगर शहराच्या मध्यभागी असलेले लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय शहराच्या ह्रदयस्थानी व कापडबाजारात व्यापारी पेठेत आहे या जागेचा वाद वीस वर्षे कोर्टात चालला व्यापारी या जागेवर आपला मालकी हक्क सिद्ध करूं पाहत होते संस्थाही या कोर्ट कचेरीच्या तारखेला जेरीस आली होती आशा वेळी काही संस्था पदाअधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव काळेसाहेबांसमोर मांडला की ही जागा विकून टाकावी व हायस्कूल बंद करावे पण काळेसाबांनी एकाच भाषेत निक्षून सांगितले की रयत माउली लक्ष्मीबाई या नावाशी माझं भावनिक नातं जोडलेलं आहे लक्ष्मीबाई ह्या रयतेच्या माउली आहेत व नगर जिल्ह्यात ही त्यांच्या नावाची एकमेव शाखा आहे मी पाण्यासारखा पैसा ओतीन प्रसंगी स्वत:ला गहाण ठेवीन पण ही जागाही जाणार नाही आणि कुणाच्या सांगण्यावरून विद्यालयही विकले जाणार किंवा बंदही होणार नाही .व हे त्यांचे बोल त्यांनी खरे केले कोर्ट केससाठी संस्थेचा नाही तर स्वत: वीस बावीस वर्षे खर्च केला .
अहमदनगर मध्ये महिला महाविद्यालय सुरू केले याचा फायदा आज ग्रामीण व शहरी मुलींना होत आहे एवढा मोठा विस्तार या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचा असून सुरक्षितही आहे यासाठीही काळे साहेबांनी जमिनीपासून ते महाविद्यालय स्थापनेपर्यंत तन मन धनाने व समर्पित भावनेने मदत केली पण आजही अनेकांना काळे साहेबांचा हा पैलू माहिती नाही .
खरे तर प्रसिद्धीपराङ्मुख कर्णौदार्य असलेले से दानशूर व्यक्तीमत्व महाराष्ट्रासाठी वरदान होते
आज काळे साहेब यांचे पुण्यस्मरण आहे अशा त्यागमूर्ती थोर दानशूर आधुनिक कर्णास विनम्र अभिवादन 🌹
© काकासाहेब वाळुंजकर

