मागील काही दिवसात भारतीय क्रिकेटने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दोन देशां दरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकांत भले ती वनडे, टि ट्वेंटी असो वा कसोटी टिम इंडियाने आपला जलवा सर्व ठिकाणी दाखविला. मात्र आयसीसी स्पर्धा म्हंटले की भारतीय संघ साखळी सामन्यात गुणतालिकेत टॉप करायचा व निर्णायक सामन्यात फेल व्हायचा. युएईत झालेल्या टिट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत टिम इंडिया विजेतेपदासाठी जवळ जवळ सर्वांच्या पसंतीची टिम होती. मात्र यावेळी टिम इंडियाची डाळ साखळीतच खदखदली. म्हणजे टिम इंडियाची अवस्था अश्या शाळकरी मुलासारखी होती की, शाळेत वर्षभर होणाऱ्या चाचणी परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवायचा व वार्षिक परीक्षेत चक्क नापास व्हायचा !
आयसीसी स्पर्धांतील टिम इंडियांच्या पराभवांविषयी या लेखमालेत आपण अनेकदा चर्चाही केली आहे. परंतु युएईत संघाला आलेल्या साफ अपयशाची दखल घेत बीसीसीआयने त्यावर तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने प्रथम टिट्वेंटीमध्ये नवा कर्णधार आणला. आगामी स्पर्धांसाठी नव्या खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीच्या दिशेने प्रभावी पाऊल टाकले आहे.
युएईतील टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर न्यूझिलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात तीन टि ट्वेंटी सामन्यांची मालिका व दोन कसोटी सामने खेळले जाणार असून ही कसोटी मालिका दुसऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे कसोटीचे विद्यमान विजेते न्यूझिलंड भारतातील वातावरण व खेळपट्टयांचा अनुभव बघता पाच फिरकी गोलंदाज घेऊन येत आहे.
भारतातील खेळपट्ट्या फिरकीला धार्जिण्या असतात. परदेशी संघ येथे खेळताना लोंबकळतात परंतु पुर्वीसारखे सध्याचे भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात फारसे पटाईत नाहीत. भारतातील काही सामन्यात टिम इंडियाची फिरकी खेळण्यात झालेली तरांबळ आपण बघितली आहेच. त्यामुळे न्यूझिलंडही काटयाने काटा काढण्याच्या तयारीने आले तर त्यात नवल कुठले ?
कोविड -१९ च्या संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या क्रिकेटनेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यास संबंधीत क्रिकेट मंडळांस भाग पाडले. त्याचाच एक भाग म्हणून बायोबबल
(जैव सुरक्षा कवच) ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जाऊ लागली. आपल्या माहिती आहेच की, या बायबोबल मध्ये संबंधीत खेळाडू, सपोर्टींग स्टाफ व अत्यावश्यक लोक सोडून कोणीही जाऊ शकत नाही. सुरुवातीला हे बबल सर्वांना मजेशीर वाटायचे. मात्र क्रिकेटचा अतिरेक व सतत होणाऱ्या सामन्यांमुळे खेळाडूंना याचा उबग आला. त्याचा दुष्परीणाम खेळाडूंच्या मानसिकतेसह त्यांच्या खेळावरही होऊ लागला. त्यामुळे काही देशांचे खेळाडू संघापासून बाजूला होऊ लागले. इंग्लंडचा बेन स्टोक्स याच कारणांमुळे संध्या संघाबाहेर आहे.
युएईतील स्पर्धेत भारताचा संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. याचेही कारण बायोबबल हेच सांगितले जाते. परंतु हे सरळ सरळ खोटे व चुकीचे आहे. कारण बायो बबलमुळे भारताचा संघ फक्त पाकिस्तान व न्यूझिलंड विरूद्धच कसा हरू शकतो ? अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबीया विरुद्ध मोठमोठे विजय मिळविले तेंव्हा भारताचा संघ फुटपाथवर होता का ?
तरीही बीसीसीआयने मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरूण, जसप्रित बुमराहा व तत्कालीन कर्णधार कोहलीने स्पर्धा संपल्यानंतर केवळ पराभवाची जबाबदारी झाकण्यासाठी सांगितलेल्या सबबीलाही गांभिर्याने घेत इंग्लिश क्रिकेट बोर्ड राबविते तशी रोटेशन पॉलिसी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त भारही पडणार नाही. शिवाय इतर खेळाडूंनाही संधी मिळेल.
त्याच अनुषंगाने बीसीसीआयने टि- ट्वेंटीसाठी संघात मोठे बदल केले व नवोदितांना संधी दिली. तर कसोटी मालिकेतही कोहली, रोहीत, बुमराहा, शमी, ठाकूर, पंत यांना विश्रांती देत आगामी द. आफ्रिका दौऱ्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्टया ताजेतवाने ठेवण्यासाठी न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली आहे. मात्र कर्णधार कोहली मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वाटते.
ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने त्याऐवजी संघाचे नेतृत्व गोल्डन आर्म असलेला लकी कर्णधार अजिंक्य राहाणे करणार आहे. या संघात मोठे बदल करण्यात आले असून संघात श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा व केएस भरत हे नवे चेहरे आहेत. काही तज्ञांच्या मते तगड्या न्यूझिलंड विरूध्द हा संघ आव्हान उभे करू शकणार नाही. मात्र सदर मालिका भारतात असून नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे संघाला मार्गदर्शन मिळणार असल्याने उपलब्ध खेळाडू संधीचे सोने करणार असून हा संघ मायदेशातील आपली विजयी मालिका अबाधीत राखू शकतो. शिवाय हंगामी कर्णधार अजिंक्य राहाणे टिकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या बॅटला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चांगलीच धार लावून आला आहे.
पहिल्या कसोटीसाठी निवडलेला भारतीय संघ असा असेल ----
अजिंक्य रहाणे (कप्तान), चेतेश्वर पुजारा (उपकप्तान), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर) केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

